सरपण
पप्पा कामावर गेले की घराची सगळी जबाबदारी आईच्या खांद्यावर असायची. घरची सगळी कामं आवरली की दुपारच्या पुढे आई जळण शोधायला घराबाहेर पडायची. तसं रेशनकार्डावर रॉकेल मिळायचं, पण ते ही फारच कमी आणि शेकडो लोकांच्या लाईनीत तासभर थांबून. कधी कधी तर नेमका आईचा नंबर यायला अन् ते रॉकेलचं डबडं संपायला, असंही व्हायचं. मग आई तिथून चक्क रडत रडत घरी यायची. रॉकेल मिळालं तर, या आशेवर सजवलेली स्वप्नं क्षणार्धात जमीनदोस्त व्हायची आणि पुन्हा तिच्या डोळ्यांपुढे तो चुलीचा धूर दाटू लागायचा. मोकळ्या कॅनने रडत घरी आल्यावर सर्वात आधी माझी आजी आईच्या नावाने शिमगा करायची, तिचं झालं की मग आजोबा ही तेच करायचे. संध्याकाळी पप्पा कामावरून घरी परतले की पुन्हा तेच. पंधरा दिवसांनी पुन्हा रॉकेलचं डबडं यायचं, त्यात नंबर लागला तर ठीक, नाहीतर पुन्हा सगळं तेच ते आईला ऐकून घ्यावं लागायचं. तसं गावात खूप वखारी होत्या आणि अजूनही आहेत. पण तेव्हा जळ...