सरपण
पप्पा कामावर गेले की घराची सगळी जबाबदारी आईच्या खांद्यावर असायची. घरची सगळी कामं आवरली की दुपारच्या पुढे आई जळण शोधायला घराबाहेर पडायची. तसं रेशनकार्डावर रॉकेल मिळायचं, पण ते ही फारच कमी आणि शेकडो लोकांच्या लाईनीत तासभर थांबून. कधी कधी तर नेमका आईचा नंबर यायला अन् ते रॉकेलचं डबडं संपायला, असंही व्हायचं. मग आई तिथून चक्क रडत रडत घरी यायची. रॉकेल मिळालं तर, या आशेवर सजवलेली स्वप्नं क्षणार्धात जमीनदोस्त व्हायची आणि पुन्हा तिच्या डोळ्यांपुढे तो चुलीचा धूर दाटू लागायचा. मोकळ्या कॅनने रडत घरी आल्यावर सर्वात आधी माझी आजी आईच्या नावाने शिमगा करायची, तिचं झालं की मग आजोबा ही तेच करायचे. संध्याकाळी पप्पा कामावरून घरी परतले की पुन्हा तेच. पंधरा दिवसांनी पुन्हा रॉकेलचं डबडं यायचं, त्यात नंबर लागला तर ठीक, नाहीतर पुन्हा सगळं तेच ते आईला ऐकून घ्यावं लागायचं.
तसं गावात खूप वखारी होत्या आणि अजूनही आहेत. पण तेव्हा जळण विकत घेणं ही परवडत नसायचं. घरच्या किरकोळ शेणकुटाने ही फारतर फक्त चुलीला हातभार लागायचा. म्हणून मग घरची कामं आवरून झाली की दररोज दुपारच्या पुढे जळण शोधायला आई घराबाहेर पडायचीच. रेल्वे लाईनच्या पलीकडील बाभळीच्या जंगलात एखादं वाळलेलं काटूक मिळतंय का ते पाहण्यात कधी कधी सगळा दिवस निघून जायचा. या सगळ्या उठाठेवीत ही आईचं घराकडं लक्ष लागून असायचं. पोरं शाळेतनं घरी नीट आली असतील का.? आल्यावर त्यांनी भाकरीचा एखादा तुकडा खाल्ला असेल का.? आणि संध्याकाळी पप्पा घरी परतायच्या आधी घरी परतून संध्याकाळच्या जेवणात नेमकं करायचं तरी काय.? कधी तेल असायचं तर डाळ नसायची, कधी भाज्या असायच्या तर तेल मसाल्याचा पत्ता नसायचा. मग अशावेळी भाकरी आणि भाकरीच्या पीठाचाच झुणका यावर भागवायला लागायचं. संध्याकाळच्या वेळी जेवणाच्या ताटात हे असं पाहून सुरूवातीला पप्पा थोडी चिडचिड करायचे, पण नंतर आपोआप शांतपणे जेवून बाहेर सोप्यात जाऊन बसायचे. तसं पप्पाला पण व्याप खूप होते, पण माणूस कधी कामाला मागे हटायचा नाही. दररोज भल्या पहाटे उठून घरापासून ६ किलोमीटरवर असणाऱ्या शेताकडे जायचं, उगाच फेरफटका मारून, घरच्या जितरापासांठी काहीतरी ओलं सुकं अन्न गोळा करून आणायचं, घाईघाईत घरी यायचं आणि ताटात जे काही येईल ते खाऊन थेट मिलवर जाण्यासाठी सायकलवर टांग टाकायची.
तेव्हा घरात वीजेचं कनेक्शन नसल्यामुळे रॉकेल हा ब-यापैकी महत्त्वाचा विषय होता. त्यामुळे ते मिळायचं गणित चुकलं की, रातभर घरात अंधार गुडूप असायचा. अंधार पडायच्या आधी आईला घरी परतावं लागायचं, त्याआधी सगळी काम आवरून घ्यावी लागायची. कधी कधी नाईलाजाने का होईना, पण मग शेजा-याकडून रॉकेल मागून आणावं लागायचं. कारण जेवताना ताटातलं अन्न डोळ्यांना दिसलं तरी पाहिजे. त्यासाठी आई एखाद्याकडे जाऊन हातापाया पडून एक दोन रात्री तरी दिवा लावायला पुरावं, इतकं रॉकेल आणायची. तेव्हा सहज माझ्या बालमनात विचार येऊन जायचा की, हा सुर्य अंधार पडला की दडून का बरं बसत असेल.? अंधार पडल्यावर नेमकी खूप खूप गरज असताना हा त्याच्या जागी नसेल तर त्याच्या असण्याला अर्थ काय.? माझ्या या असल्या बालिश विचारांना कालांतराने आपोआप शाळेत उत्तरं मिळत गेली. आता घरात चोवीस तास लाईट आहे, पाणी तापवायला गिझर आहे. पण अजूनही चुलीचं आणि माझ्या आईचं नातं अतूट आहे. #आई अजूनही नेहमीच म्हणत असते की, बाळा..., चुली शिवाय आणि मुली शिवाय घराला शोभा येत नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️ #गंध_आठवणींचा 🫂