आसू आणि हसू 🎭
आता सारं काही जवळपास संपल्यातच जमा होतं. तरीही का कुणास ठाऊक, पण त्यादिवशीच्या तुझ्या हसण्यामागचं कोडं काही केल्या मला सुटत नव्हतं. त्यादिवशी आपली कोर्टातील ती शेवटची तारीख होती. काही वर्षे का असेना, पण आपण सुखदुःखाचे क्षण एकत्र जगलेले होते. अशा ब-याच कडू गोड क्षणांची मी तिथं उजळणी करत बसलो होतो. त्यावेळी कधी अचानक मला खूप हसू यायचं, तर कधी आतल्या आत माझं मन हंबरडा फोडून रडायचं. पण सहज तुझ्याकडे नजर गेली की, मी सगळं काही विसरून जायचो. आणि तेव्हा वाटायचं की हिला काहीच कसं काय वाटत नाहीये? इतक्या वर्षांचा आपला संसार आज शेवटच्या घटका मोजत असतानाही, ही बाई इतकी निर्विकार आणि हसतमुख कशी काय असू शकते? तो दिवस आणि त्यानंरचे काही दिवस असेच निघून गेले, पण त्या तुझ्या हसण्याचं गूढ मला काही केल्या अजूनही सुटत नव्हतं. आपले नंबर एकमेकांकडे सेव्ह असूनही मध्यंतरी बरीच वर्षे आपलं कसल्याही प्रकारचं बोलणं, वा साधा मेसेज ही नव्हता. तरीही एकदा तरी शेवटचं भेटावं आणि बोलावं म्हणून मी तुला आज इथं भेटायला बोलावलं आहे.
मी - (तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत) अगं, कशी आहेस.?
ती - (माझ्याकडे न बघताच) कशाला बोलावलं आहे आणि काय काम आहे ते पट्कन बोला, मला घाई आहे.
तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष नसलेला मी अजूनही तिला न्याहाळत होतो. आता तिची तब्येत आणखीन जास्तच खालावलेली दिसत होती. डोळ्यांच्या सभोवती डार्क सर्कल आणखी जास्त गडद वाटू लागले होते. शरीराची त्वचा अगदी हाडाला चिकटली होती. तितक्यात पुन्हा तिचा आवाज माझ्या कानावर आला, आणि मी भानावर आलो.
ती - काय ते पट्कन बोला की ओ. पावसाची शक्यता दिसते आहे.
मी - sorry sorry
ती - बोला काय ते पट्कन...
मी - अगं, तसं बोलायचं तर खूप आहे. पण आता ज्या गोष्टींना काही अर्थच उरला नाही, त्यांची उगाच कशाला उजळणी. म्हणून मी मला जे काही विचारायचं आहे ते थेटच विचारतो. आणि आधीच सांगतो की ही आपली शेवटची भेट असेल.
ती - (माझ्याकडे न बघताच) तुम्ही बोलावलं, म्हणून मी आलीय. नाहीतर मला तरी कुठं तुमचं थोबाड पहायची हौस आहे.
मी - (मान हलवत स्वतःशीच हसलो.) अगं, त्यादिवशी कोर्टात तू इतकी हसत का होतीस गं.? तुझ्या हसण्याचा मला राग नाही, आनंदच आहे. तू नेहमीच हसत खेळत आनंदी रहा. पण खरंतर तो दिवस आपल्या कायमच्या ताटातुटीचा, तरीही तू कसं काय हसत होती गं.?
ती - काय ताटातूट? आपण एकत्र होतोच कधी?
मी - अगं, असं का म्हणतेस. ५ वर्षे एकत्र होतो आपण. ब-यापैकी नेटका संसारही केलाय.
ती - (तिचा आवाज भलताच चढला होता) संसार.. कसला संसार.? ती फक्त एक तडजोड होती. आणि ती सुद्धा तुमच्यामुळे माझ्या वाट्याला आली होती.
मी - मला काहीच लक्षात येत नाहीये गं.
ती - तुम्हाला कधीच काहीच लक्षात आलं नाही इथंच तर सगळं चुकलं, नाहीतर कित्येक वर्षे आधीच आपला घटस्फोट झाला असता. मी, एक लहान बहीण, आणि तिच्या पेक्षा लहान एक भाऊ. मी माझ्या कुटुंबातील सगळ्यात मोठी. जन्मताच मी ह्रदयविकाराने त्रस्त आहे, हे माझ्या कुटुंबातील सर्वांना माहीत होतं. डॉक्टरांनी लहानपणातच शस्त्रक्रिया वगैरे शक्य आहे नाहीतर जगेल तेवढं जगेल, विषय सोडून द्या, असं स्पष्ट सांगितलं होतं. तरीही मी अजूनही जिवंत होतेच. माझ्या आजारपणामुळे मला सतत धाप लागायची. खाल्लेलं अंगाला लागत नसल्याने प्रकृती ही नाजूकच. तरीही मी लग्नाच्या वयाची झाल्यावर माझ्या आईवडिलांनी, आजोबांनी लग्नाचा रेटा लावला होता. स्थळं येत होती, जात होती, पण काही केल्या माझं लग्न जुळून येत नव्हतं. या ना त्या कारणास्तव मुलाकडचे मला नाकारत होते, पण ब-यापैकी मूळ कारण माझी अतिशय नाजूक शरीरयष्टी हेच होतं. या सगळ्या खटाटोपात माझी लहान बहीण ही कधी लग्नाच्या वयाची झाली, हे कुणाच्याही लक्षात आलं नाही. पण माझ्या आजोबांचा हट्ट होता की, आपल्या घरची सगळ्यात लाडकी असलेल्या मोठीचं जोपर्यंत लग्न होत नाही, तोवर दुसऱ्या कुणाच्या लग्नाचा विषय काढायचा नाही. आता मुलं बघायला सुरू होऊन ३ वर्षे व्हायला आली होती, पण अजूनही कुणीच मला पसंत करायला तयार नव्हतं. आणि एके दिवशी अचानक याच जून महिन्यात तुम्ही आणि तुमचे निवडक पाहुणे मिळून मला पहायला आला. किरकोळ गप्पा गोष्टी आणि चहापान झाल्यावर जाता जाता तुम्ही लगेचच होकार ही सांगून टाकला. माझ्या छोट्या भावाने आत येऊन मला ही बातमी सांगितल्यावर पहिल्या प्रथम मला विश्वासाच बसला नाही. पण जेव्हा आजोबांनी मला हाक मारली आणि पुन्हा एकदा आपल्या दोघांची उंची वगैरे डोळ्यांखालून घातली, तेव्हा मला वाटलं की खरंच, यंदा बहुतेक माझं लग्न ठरतंय. आपल्या दोघांची उंची जवळपास अगदी सेम टू सेम. उंची वगैरे तपासून पाहत असताना तुम्ही किती गंमतीने वावरत होता, आणि मी तुम्हाला पाहत पाहत विचार करत होते की, हे येडं बिडं आहे की काय.? की याला दृष्टीदोष आहे, म्हणून कमी दिसतं. पण तसं काहीच नव्हतं बहुतेक, अगदी डोळसपणे तुम्ही मला पसंत केलं होतं. त्यानंतर थोड्याच वेळात तुम्ही सर्वजण निघून गेलात आणि लगेचच दुस-याच दिवशी आपल्या लग्नाची तारीख ही ठरली. तसं मला आतल्या आत खूप guilty feel होत होतं. पण आईवडिल आणि आजोबांच्या शब्दांपुढे जायची हिंमत होत नव्हती. आजोबांनी सांगितलं होतं की, लग्नानंतर जमेल तितके दिवस ही गोष्ट लपवून ठेवायची. आणि जेव्हा कधी उघडकीस येईल तेव्हा पुढचं पुढे पाहू. आणि जरी विषय काही कमी जास्त झाला, तर थेट माहेरी निघून यायचं, असं आमचं ठरलं होतं. शेवटी एकदाचं लग्न झालं. जुलै महिना होता तो. माझ्या आईवडिलांच्या आणि आजोबांच्या चेह-यावर पसरलेला आनंद पाहून मला धन्य वाटत होतं. पण खोटेपणाने वागून तुमच्याशी बांधलेली ही लग्न गाठ किती दिवस टिकेल, याचीही काळजी वाटत होती. लग्नाच्या दिवशी, लग्नाच्या काही दिवस आधी आणि लग्नानंतर ही बहुतेक दोन अडीच महिने मी आजारी होते, ते माझ्या या ह्रदयविकारामुळेच. पण ती वेळही मी काहीतरी खोटं सांगून मारून नेली, आणि तुम्ही वा तुमच्या आईवडिलांनी याबाबत मला फार काही विचारणा केली नाही. अजूनही आठवतं मला, आपल्या बेडवर आपल्या मिलनाच्या आधी माझं आजारपण पार पडलं होतं. तरीही तुम्ही कधीच काही तक्रार केली नव्हती. नेहमीसारखं तुम्ही कामावर जायचा, अधेमध्ये फोन करून माझी चौकशी करायचा, रात्री झोपण्यापूर्वी बराच वेळ माझ्या डोक्यावर हात फिरवत रहायचा. सगळं काही अगदी सुरळीतपणे सुरू होतं. तुमच्या प्रेमळ वागण्याचं कधी कधी मला खूप नवल वाटायचं, तर कधी कधी खूप हसू यायचं. बायकोच्या प्रेमात इतकी वेडी असणारी माणसं आजवर मी फक्त टिव्हीवरच्या मालिकेतच पाहिली होती. तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नवल वाटायचं आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी जीवाला खूप लावून घ्यायचा, तर कधी कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टीत ही खूप आनंदी व्हायचा. कधी कधी तर तुमच्या माझ्याकडे पाहण्याचं मला खूप गूढ वाटायचं. आणि प्रश्न पडायचा की, हा माणूस आपल्यात नेमकं काय बरं शोधतो आहे.? पण अगदी शेवटपर्यंत माझा तो शोध अधूराच राहिला. अधेमधे सतत माझे आईवडील आणि आजोबा येऊन भेटून जायचे, आणि तुम्ही याबाबत कधी तक्रार केली नाही. आता आपल्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली होती. पण अजूनही आपल्या संसार वेलीवर फुल उमलले नव्हते. म्हणून मग आपण दोघांनी याबाबतीत दवाखाना वगैरे सुरू केला, आणि त्यात माझा ह्रदयविकार पहिल्यांदाच तुमच्या निदर्शनास आला. ही गोष्ट तुमच्या जीवाला खूप लागली होती. दररोज रात्री तुमचं रडणं माझ्यापासून लपलेलं नव्हतं. एकतर सर्जरी करावी लागणार होती, किंवा स्वतःच्या मुलाबाळाचा विचार सोडून, मूल दत्तक घ्यायला लागणार होतं. किंवा याची देही याची डोळा तुम्हाला मला मरताना पहावं लागणार होतं, आणि ते मरणही कधी येईल हे ही कुणालाही ठाऊक नव्हतं. पण इतकं सारं घडूनही तुम्हाला अजूनही मीच का हवी होती कुणास ठाऊक.? तुम्ही मुलाचा हट्ट सोडून, मूल दत्तक घ्यायला ही तयार झाला होता. माझ्या हार्ट सर्जरीचा हट्टही तुम्ही सोडला होता. मी जितकी काही जगेल, तितकं तुम्हाला माझ्याच सोबत का बरं रहायचं होतं, हे मला कळतच नव्हतं. पण आमचं मात्र सगळं ठरल्याप्रमाणे घडलं होतं आणि घडत ही होतं. लग्नानंतर काही वर्षांनी तुम्हाला माझ्या ह्रदयविकाराबद्दल कळल्यापासून माझा माहेरी जाण्याचा कल सतत वाढत चालला होता. तुमचा हसता खेळता स्वभाव विसरून तुम्हीही आता खूप चिडचिड करत होता. त्यातच आम्ही कोविडची संधी साधली, आणि तुमच्यावर खोटीनाटी कौटुंबिक हिंसाचाराची केस टाकून, चार पैसे आणि लग्नाचा खर्च उकळून तुमच्यापासून कायमचं मोकळं व्हायचं ठरवलं. तरीही तुमचं तुमच्या मित्रांना, लग्नातील मध्यस्थांना घेऊन माझ्या माहेरी येणं सुरूच होतं. आणि मी आहे तसं, आहे त्या परिस्थितीत सासरी यावं, हा तुमचा प्रयत्न होता. पण अगदी आधीच ठरल्याप्रमाणे माझ्या आजोबांनी तुमच्या या प्रयत्नांना यश येऊ दिलं नाही. आम्ही खटला दाखल केला, तशी लगेचच अंतरिम पोटगी ही सुरू झाली. तुमचं फार काही चाललं नाही आणि शेवटी आपला घटस्फोट झालाच.
मी - (एव्हाना मला गदगदून आलं होतं. फक्त हंबरडा फोडून रडायचं बाकी होतं.) तरीही स्वतःला सावरत मी तिला प्रश्न केला की, मला का फसवलं? पैसा मी पुन्हा कमवेन ही कदाचित पण माझ्या आयुष्यातील वाया गेलेली ही आठ नऊ वर्षे मी परत कशी आणू.?
ती - (चिडून, अगदी चढ्या आवाजात) आम्ही फसवलं? हे सगळं तुम्ही ओढवून घेतलं. यात आमचा काय दोष.? शेवटी तुमचं नशिब. आणि जरा चेहरा पाहून घ्या आरशात. मुर्ख तुम्ही आहात. तुम्हालाच लग्नाची घाई झाली होती. होकार सर्वात आधी तुम्ही कळविला होता, आम्ही नाही. आम्हाला सगळं काही माहीत होतं, आणि काय घडलं तर काय करायचं, हे सुद्धा आमचं ठरलेलं होतं. तुम्ही काळजीपूर्वक थोडा वेळ देऊन विचार करून निर्णय घेतला असता, तर मी तुमच्या गळ्यात पडलेच नसते. आणि तुमचा वर्तमान आणि भविष्य सगळं काही खूप चांगलं आणि वेगळं असतं.
मी - sorry.. माफ कर मला. मी खूप वेळ घेतला तुझा. मला माझं नेमकं काय चुकलं, हे चांगलंच लक्षात आलं आहे. तब्येतीची काळजी घे, आणि इथून पुढे मला भेटायचा प्रयत्न करू नकोस. इतकं बोलून मी लगेचच तिथून चालता झालो. तरीही माझ्या माघारी मला तिचा आवाज ऐकू येतच होता की, तुम्ही बोलावलं, म्हणून मी आलीय. नाहीतर मला तरी कुठं तुमचं थोबाड पहायची हौस आहे. आणि इथून पुढे मला फोन करायचं तर लांबच, साधा मेसेज करायचा ही विचार करू नका, आणि जमल्यास तुमचा चेहरा कधीच माझ्यासमोर घेऊन येऊ नका. कारण हे जग खूप छोटं आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔