मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..

आज एक गोष्ट लक्षात आली काय गं तुझ्या.?
आज माझा सकाळचा मेसेज तुला पहाटे पहाटे जवळपास साडेचार वाजता आलाय.‌तो आज इतक्या लवकर का आला माहिती आहे. कारण तू स्वप्नात आली होती.‌ काहीतरी बोलायचं आहे म्हणून, मला वाडीवर भेटायला बोलावली होती. तिथं आपण भेटल्यावर...

तू - कडू.. हाणला पाहिजे रे तुला. काय झालंय एकदमच. खूप वेगळा वेगळा वागत आहेस, आणि वाटतही आहेस.

मी - काय कुठं.! उगाचच काहीतरी विचार करत बसू नकोस.

तू - मी खुळी नाहीये, सगळं कळतं मला. तुझं तूच विचार करून बघ.

मी - अगं., खरंच तसं काही नाहीये,
अगदी नॉर्मलच आहे मी.

तू - हेच हेच तर तुझं वागणं खटकते आहे मला. आधी असा नव्हता तू.‌ आधी असं पलटून उत्तर देत नव्हता मला. आणि उगाच मला बोलायला लावू नकोस हं. तुझं काय चुकते आहे ते तुझं तूच कबूल कर पाहू पटकन, नाहीतर हाणते बघ बुक्का..!

मी - अगं, आता कसं समजावू तुला. तसं काहीच नाहीये.

तू - ऐ, उगाच तापवू नकोस हं मला. मग मार खाशिल ते वेगळं आणि बोलून ही खूप घ्यावं लागेल हं श-या..!

मी - हसत हसत, आहाहा... तुझ्या तोंडून माझं नांव ऐकायला कित्ती मस्त वाटतं मला....

तू - कडू.. विषय बदलू नकोस.‌ आता मी काय सांगते ते नीट ऐकून उत्तरं दे, आणि खोटं बोललास तर इथं तुडव तुडव तुडवणार आहे तुला आज.

मी - खूप खूप जोरजोरात हसत दोन पावलं मागे सरकलो.

तू - हसत हसत.. कित्ती घाबरतो रे तू मला अजूनही. मी बोलून दाखवत नाही, म्हणजे मला काहीच कळतं नाही किंवा लक्षात येत नाही असं नाही रे. एका वेळेला एका नावेत स्वार हो रे.  तू उगाच कसरत करत स्वतच्या जीवाचं हाल का करून घेत आहेस.

मी - अगं, तू काय बोलते आहेस मला काहीच कळत नाहीये.

तू - कडू.. नाटकं करू नकोस. मला माहीत आहे, तुला सगळं काही माझ्या तोंडूनच ऐकायचं आहे. बरोबर ना.?

मी - खरंच तसं काही नाही गं.. सच्ची.!

तू - ए चुप रे.. चुप म्हणजे चुप.! गप्पगुमान ऐक आता.
गेल्या काही दिवसांपासून मी बघते आहे तुझ्या मनाची चलबिचल सुरू आहे, बरोबर ना.! आपणा दोघांनाही माहीत आहे की, आपण दोघं एकमेकांना हवं आहोत, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, बरोबर ना.! तरीही तुला अजूनही कळत नाहीये की नेमक्या कुठल्या मार्गाने पुढे जावं, म्हणून तुझं मन खूप द्विधा मनःस्थितीत अडकले आहे, बरोबर ना.! मी तुला नेहमीच सांगत आली आहे की, तू माझ्याकडे आलेला नाहीयेस, मी तुझ्याकडे आलीय, आणि मी तुला कधीही सोडणार नाही अथवा अंतर देणार नाही. पण तरीही कधी कधी का कुणास ठाऊक तुला भिती वाटत असते की मी तुला सोडून जाईल. एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला हवा आहेस, that's it.!

मी - हो गं., मला ही तू हवी आहेसच. पण ते एका नावेत स्वार होणं वगैरे काय म्हणत होतीस तू, मला ते काहीच कळलं नाही अजूनही.

तू - वेडेपणाचे सोंग घेऊ नकोस हं श-या..

मी - पुन्हा हसू लागलो.

तू - उगाच मला तापवून दात दाखवू नकोस रे कडू..

मी - आणखी जास्त हसू लागलो.

तू - हसत हसत.., येडा झाला आहेस रे, पार कामातून गेला आहेस तू. ऐक आता, एका नावेत स्वार हो म्हणजे, मनात काहीतरी एक भावना घेऊन वाटचाल सुरू ठेव रे. मला माहीत आहे की तुझं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पण आता तुझ्या मनाला याही गोष्टीची जाणीव आहे की, मी आता एका मुलाची आई आहे, म्हणून तू नेहमी एक मर्यादा राखूनच माझ्याशी वागतोस. पण तुझ्या मनात नेहमीच जे एक युद्ध सुरू असतं ना, त्यात तुलाच खूप खूप इजा होत आहे. बरोबर ना. श-या.., मला तुझं प्रेमही हवं आहे, आणि तुझी मैत्रीही हवी आहे. तुझ्याकडून मिळणाऱ्या या दोन्ही गोष्टी मला प्रियच आहेत. पण या सगळ्यात तुझ्या मनाच्या बाजूने विचार करताना कधी कधी खूप वाईट वाटतं रे.!
कडू... काय बघतो आहेस एकटक. मी काय बोलते आहे तिकडे लक्ष आहे की नाही तुझ,? की पुन्हा हरवलास तुझ्या जगात आणि माझ्या आठवणीत.
तुझ्या या वाक्यानंतर आपण दोघे खूप खूप हसलो. तितक्यात नकळत जवळ येऊन, तू मला दोन चार बुक्के हाणले होतेसच.

तू - असा कसा रे वेडा तू. मी समोर असतानाही आणि माझ्याशी बोलत असतानाही तू माझ्या आठवणीत कसं काय हरवून जातोस.

मी - माझी खूप जुनी सवय आहे गं ही. तुला चोरुन चोरुन बघायचो ना, तेव्हाही ब-याचदा तू पुढे निघून गेली, तरीही मी खूप खूप वेळ तिथंच थांबून असायचो.

तू - ए चुप रे.. चुप म्हणजे चुप.! हां तर कुठं आले होते मगाशी मी.!?

मी - हसत हसत.., अगं.,‌ वाडीत आहोत गं आपण.

तू - कडू... हस तू हस.! मी सिरियसली काहीतरी सागंते आहे आणि तू हस.

मी - sorry... Sorry...

तू - हं sorry sorry..! आधी चुकायचं आणि मग sorry sorry म्हणायचं. वेड्या, मी काय सांगते आहे ते लक्षात आलं की नाही तुझ्या.?

मी - नाही गं.. सच्ची.

तू - अरे, तू कोणताही स्टॅंड घे. मग ते प्रेम असो वा मैत्री, मला काहीच तक्रार नाही. फक्त माझ्याशी वागताना तू अगदी मोकळेपणाने वाग.

मी - हो.‌ बरोबर आहे तुझं. कसं काय कुणास ठाऊक, पण नेहमीच तू माझ्या मनातलं अचूकपणे ओळखतेस.
खरंच गं, मी गेल्या काही दिवसांपासून याच द्विधा मनःस्थितीत अडकलो आहे. अगं पण तुला काय वाटतंय ते सांग ना.

तू - कडू.. इतका वेळ काय सांगते आहे मी. तू मैत्रीचं नातं ठेव किंवा प्रेमाचं, ते सगळं काही तुझ्या मनात असेल. बरोबर ना.! मला त्याच्याशी काहीही तक्रार नाहीये. हां. पण नातं कोणतंही असो, मला तू हवा आहेस, अगदी शेवटपर्यंत...बस्स.! हां पण, मैत्री की प्रेम.?
ते मात्र तुझं तू ठरवायचं आहेस, त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. तुला मी नेहमीच सांगत आलीय त्याप्रमाणे मी तुझ्याकडे आलीय, त्यामुळे मी तुला कधीच सोडून जाणार नाही. मला माहीत आहे, तू वेडा आहेसच,
म्हणून तुला नेहमीच सांभाळून घेईन.

मी - अगं.. असं असेल तर मग मला मैत्रीचं नातं महत्त्वाचं वाटतंय गं. कारण त्यात आपण पुर्णपणे स्वतंत्र असू.
प्रेम वगैरे म्हटलं की कालांतराने हक्क गाजवणं,
ऐकमेकांचं उणदुणं काढणं, जुन्या आणाभाका आठवून एकमेकांना टोमणे मारणं, त्यातून मन दुखावलं जाणं, आणि नको नको त्या वेडपट अपेक्षाही वाढू शकतात गं. त्यापेक्षा हे आपलं निखळ,निस्वार्थ आणि काळवेळ न पाहता, नेहमीच एकमेकांच्या सोबतीला उभं राहणारं, मैत्रीच्या पलीकडचं आणि प्रेमाच्या अलीकडचं नातं, केव्हाही कैकपटीने चांगलंच ना गं.!

तू - कडू.. तू कसाही वाग, मैत्रीच्या नात्याने बोल किंवा प्रेमाच्या वाग, मला काहीच तक्रार नाही.
मी नेहमी सांगते ना,
माझा स्वभाव कसा आहे, ते माहीत आहेच तुला.
एकदा माणूस आपला म्हटला, की विषय संपला.

मी - ओके दोस्त. छान वाटलं तुला इथं भेटून.
माझं स्वप्नं होतं की, तुझ्याशी इथं नदीकाठी बसून बोलावं, तुझ्यासोबत फिरावं, आणि ते स्वप्नं आज तू पुर्ण केलंस.
तू - कडू.. जा आता. स्वप्नातच आहेस तू.
स्वप्नातून जागा हो.

मी - अगं..‌ खरंच आपण स्वप्नात आहोत काय.?
आणि तितक्यात जवळपास पहाटे साडेचार वाजता मला जाग आली आणि लागलीच मी तुला good morning चा मेसेज केला.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#वेड 🌼🌼🌼
#गंध_आठवणींचा 🏃‍♀️________🏃‍♂️

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..