शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

बंड्या

                 मी स्वतः चालत दवाखान्यात आलो होतो.‌ आता मला इथं येऊन आठवडा झाला होता, पण इथं आल्यापासून माझी तब्येत खालावतच चालली होती. शरीर औषधोपचाराला प्रतिसाद देत नव्हतं. हळूहळू श्वास घ्यायलाही जड जात होतं. रात्रीच्या वेळी माझी खूप तडफड व्हायची. मी हात पाय वगैरे खूप झाडायचो. म्हणून माझं हात पाय बांधून ठेवलं होतं. तरीही माझी तडफड सुरुच होती. श्वास आत घेताना माझं शरीर अगदी एखाद्या बेडकासारखं फुगत होतं, आणि श्वास सोडला की एखाद्या हवा निघून गेलेल्या फुग्यासारखी माझी अवस्था होत होती. गेल्या कित्येक दिवसांपासून मी तोंड आणि डोळे उघडलेच नव्हते. अन्न पाणी औषधं वगैरे सगळं काही बंद. म्हणून मग नाईलाजाने डॉक्टरांनी मला घरी घेउन जायला सांगितलं होतं. मी घरी येऊन आता मला दोनेक दिवसच झाले असतील. पण मला जास्त झालंय आणि मी आता फारच कमी क्षणांचा सोबती आहे, हे कळाल्यापासून माझ्या ओळखीच्या लोकांचा राबता एकसारखा सुरूच होता. 

                 माझी बायको नेहमी माझ्या उशाशी बसून असायची. आल्या गेल्या सगळ्यांशी तीच बोलायची. माझी तडफड बघवत नाही असं म्हणायची, पण  का कुणास ठाऊक तिच्या डोळ्यात पाण्याचा एक साधा टिपूस ही नव्हता. बाहेरचं बोलणं ऐकून आतल्या खोलीत बसलेली आई थांबून थांबून सारखी रडायची. माझं पोरगं.. माझं पोरगं... माझा बंड्या.. माझा बंड्या... फक्त हेच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडत होते. त्या खोलीतल्या तुळईला बांधलेल्या एका सुंदर पाळण्यात माझं छोटंसं लेकरू निवांत झोपलं होतं. माझ्या अजून दोन लेकी बाहेर अंगणात लंगडी खेळत होत्या. आपल्या घरात नेमकं काय चाललंय आणि आपला बाप आता फक्त काही क्षणांचाच सोबती आहे याची त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती, आणि बहुतेक त्यातच त्यांचं सुख सामावलेलं होतं. माझा घात तसा व्यसनानेच केला होता, पण धोका वेळीच ओळखूनही मी सावध न झाल्यामुळे आज माझी ही अवस्था झाली होती. रक्तापेक्षा जास्त दारूच माझ्या अंगात धावत असल्यामुळे तिच्याशिवाय मला तसा पर्याय नव्हताच. बाहेर इतकी रडारड आणि गंभीर वातावरण असतानाही माझा बाप आत स्वयंपाकघरात बसून जेवण करत होता. त्याचा एक पाय मोडलेला असल्यामुळे त्याला तो पाय लांब करून बसावं लागायचं. त्याच्या त्या मोडक्या पायाला लागूनच त्याच्या आधाराची, ती एक काठी पडली होती. त्या सगळ्या कोलाहलात मी शेवटचा श्वास कधीचा घेतलाय, हे कुणाच्या लक्षातही आलं नाही. थोड्या वेळाने लक्षात आलं तेव्हा मग एकच कल्लोळ उठला. आत आई छाती बडवून घेऊ लागली. माझा बंड्या... माझा बंड्या...! दगड झालेली माझी बायको दोन्ही लेकींना कवटाळून गप्प बसून होती. आत पाळण्यात असलेलं बाळही आता एकसारखं रडत होतं, पण कुणीतरी सतत त्या पाळण्याला झुलवत होतं. बाहेरचा कालवा ऐकून बापानं जेवणाचं ताट बाजूला सारलं आणि तिथेच बसून ढसाढसा रडू लागला. 

                 गेल्या तीनेक वर्षात पाऊस तसा कमीच होता, पण यंदा मात्र चांगलाच जोर धरला होता. अंगणात जमलेली बरीचशी माणसं मिळेल त्या जागी छत्री वगैरे घेऊन पुढचे सोपस्कार लवकर पार पडायची वाट पाहत उभी होती. त्यातच नेमका रात्रीच्या वेळीच मी शेवटचा श्वास घेतल्यामुळे ब-याच जणांची गैरसोय झाली होती, त्यात भरीस भर म्हणून हा पाऊस. मला बाहेर अंगणात आणलं, त्या रिमझिम पावसातच मला शेवटची आंघोळ घातली गेली. मग पुन्हा मस्त घासून पुसून, नवीन कपडे घालून, मला तिरडीवर मांडी घालून बसवून करकचून बांधण्यात आलं. माझी मान हलायला नको, म्हणून तोंडावर एक रूमाल गुंडाळून तो सुद्धा करकचून बांधला गेला. आता माझा शेवटचा प्रवास सुरू झाला होता. 

                 पावसाची रिपरिप एकसारखी सुरूच होती. आमचं स्मशान घरापासून जवळच तरीही अडीच तीन किलोमीटर होतंच. म्हणून मग बरीचशी मंडळी आपापली वाहनं घेऊन पुढे जाऊन थांबली, आणि बाकी लोकं मला खांद्यावरून घेऊन तिकडं निघाली होती. मी धान्याच्या दुकानात मापाडी म्हणून कामाला होतो, त्यामुळे गावात ब-यापैकी सगळीजण मला ओळखायची. त्यामुळे मला शेवटचा निरोप द्यायला भरपूर माणसं जमली होती. 

                 आता आम्ही स्मशानात पोहोचलो होतो. तिथंला एकुलता एक मोठा लाईट अधेमध्ये बंद चालू होत होता. म्हणून ब-यापैकी सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅट-या सुरू केल्या होत्या. पावसाची रिपरिप अद्यापही सुरू होतीच. आजूबाजूला चाललेली चर्चा मला पुसटशी ऐकू येत होती. तो खड्डा काढणारा जेसीबी वाला येऊन दोन तास उलटलं होतं म्हणं, पण तो सुद्धा फुल्ल टाईट. त्यामुळे त्याला खड्डा नीटसा काढता येत नव्हतं. आता रात्रीचे दोन वाजून गेले होते. हळूहळू एकेक माणसं वैतागून निघून जात होती. तरीही माझ्या कामावरची, शेजारची आणि दारूच्या गुत्त्यावर कायम गाठ पडणारी मंडळी अजूनही थांबून होती. ती मंडळी आजही पिऊनच आलेली होती. माझा बाप पावसात भिजत अगदी निर्विकार उभा होता. शेवटी त्या गुत्त्यावर गाठ पडणारी दोन माणसंच खड्ड्यात उतरली, आणि त्यांनी माती, चिखल, पाणी, पटापट बाहेर काढत खड्ड्यात एक दिवळी काढून त्यात मला बसवलं. माझ्या कपाळाला विभूती लावली. तोंडात पाणी सोडलं. आणि मग उरलेलं काम तेवढं जेसीबी वाल्यानं अगदी निवांत पार पाडलं. 

                 आता मात्र अगदी बोटावर मोजण्याइतपतच माणसं उरली होती. शेवटी माझ्या थडग्यावर एक मोठा दगड ठेवून, त्यावर भरपूर गुलाल ओतून, उरलेल्यांनी घराची वाट धरली. मी त्या दगडाखाली, त्या खड्ड्यातल्या दिवळीत बसून होतो. माझ्या आजूबाजूला ओतलेलं भरपूर मीठ, माझ्या अंगावरचे कपडे, माझ्या कपाळावर लावलेला गुलाल, तोंडात सोडलेलं शेवटचं पाणी, हे सगळं काही मला जाणवत होतं. पण आता माझ्या जवळ कुणीच नव्हतं. हे स्मशानच आता माझं नवीन घर होतं. मी माझ्या आजा आजीला कधी भेटलो, पाहिलो नव्हतो. ती दोघं माझ्या जन्माआधीच निघून गेली होती. आता मी सुद्धा त्यांच्या जगात आलो होतो. आता इथं मी त्यांचा शोध घेणार होतो.!🎭

#आयुष्य_वगैरे #अडगळ #गावाकडच्या_गोष्टी 

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

वेळ... चांगली वाईट.!

त्यांचं घर तसं गावात खूप नावाजलेलं, पण एकदा का वाईट वेळ सुरू झाली की मग त्यापुढे कुणाचेही काहीच चालत नाही. मुलं बाळं लहान होती तोवर ठीक होतं, पण घरातलं नेमकं मोठ्ठं पोरगचं वाईट संगतीला लागलं आणि त्या घराची पार रया गेली. मोठ्या लेकराला सावरण्यात बापानं सगळी संपत्ती, ताकद पणाला लावली. पण त्या पोराची व्यसनं आणि वाईट संगत काही केल्या सुटली नाही. एकुलती एक मुलगी तशी सुखाने नांदत होती, हेच काय ते एकमेव सुख. या सगळ्याला कंटाळून सगळ्यात लहान मुलगा शिक्षण अर्धवट सोडून पुण्यात कामाला लागला होता, गेल्या वर्षभरापासून आयुष्याची गाडी सुरळीत सुरू होती, पण तितक्यात त्या लहान मुलाचाही कामावरून घरी परतताना अपघाती मृत्यू व्हावा, हे त्या मायबापाचं दुर्दैवच. अंत्यविधीसाठी जेव्हा पुण्याहून त्याचं प्रेत त्याच्या गावी आणलं, तेव्हा सगळ्या गावकऱ्यांच्या तोंडी एकच चर्चा सुरू होती की, याच्या जागी देवानं त्याच्या मोठ्या भावाला उचललं असतं तर बरं झालं असतं, आणि मोठा भाऊ नेहमीप्रमाणेच फुल्ल टाईट होऊन कुठंतरी लोळत पडला होता.!🎭

#आयुष्य_वगैरे #गावाकडच्या_गोष्टी #अडगळ 💔

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

तहान

        घरी कुणी वाट पाहणारं नसतं त्यांच्यासाठी कामावरून घरी परतताना वाटेत लागणा-या काही जागा या अगदी घरच्यासारख्या झालेल्या असतात. म्हणूनच काम सुटलं की पावलं आपसूकच इकडं वळतात. या जागा प्रत्येकासाठी तशा वेगवेगळ्या असतात, पण हक्काच्या, आपल्या वाटणा-या अशा असतात. 

        एखाद्या वळणावरचा एखादा विशाल वृक्ष, एखादं चहाचं खोकं, पानाची टपरी, एखादा मोडकातोडका बाक, एखादं छोटं हॉटेल वगैरे वगैरे. तिथला चहावाला पो-या असो वा फडकं मारणारा काका, कौंटरवरचा मालक असो वा बाहेर भांडी धुणारी मावशी, सगळी कशी आपली वाटत असतात. तिथं कधी कधी ही मंडळी दिसली नाहीत की आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, तर तिथं नेहमीच जाणारे आपण एखादा दिवस नाही गेलो तर पुढल्या दिवशी हमखास ठरलेला प्रश्न.. काल कुठे गायब होता.? आला नाहीत चहाला वगैरे.! 

        नातीगोती हरवलेली ही दिवसभर भटकत राहणारी माणसं, या अशा छोट्या जागेत, छोट्याशा प्रसंगात आपलं हरवलेलं आयुष्य शोधत जगत असतात, आणि त्यांची आपलेपणाची तहान भागवत असतात. आणि तसंही घरी परतल्यावर तो सवयीचा एकांत वाट पाहत उभा असतोच ना.!🎭

#आयुष्य_वगैरे #अडगळ #गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

घरटं

        काही भावंडांत इतकं कमालीचं understanding दिसून येत की, आपल्या त्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. सगळं काही scripted आहे असं वाटू लागतं, पण तसं काही नसतंच.‌ सगळं खरं असतं, ख-याखु-या माणसांनी जगलेलं, भोगलेलं..

        "तेव्हा सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण वडिलांनी अचानक अकाली एक्झिट घेतली. मी ब-यापैकी मोठा आणि माझी दोन लहान भावंडं, यांना कवेत घेऊन आई दिवसभर रडत बसलेली असायची. महिने दोन महिने असेच निघून गेले. आईला अशा अवस्थेत घरी ठेवून शाळेत माझं मन लागत नव्हतं. काय झालं होतं काय माहित, पण आईला दिवसरात्रीचं ही भान उरलं नव्हतं. सारखं एकटक फक्त घराच्या चौकटीकडे नजर लावून बसलेली असायची." 

        "वडील गेल्यापासून शेतीकडं दुर्लक्ष होत होतं. काकाच्या सोबतीने मी  हळूहळू तिकडं लक्ष वाढवलं. काकानंही कधी काही तक्रार केली नाही. वर्षामागून वर्षे सरत जात होती, पण आईच्या वागण्यात तसा काही फारसा फरक पडलेला नव्हता. दररोज सकाळ दुपार संध्याकाळ काकू येऊन आईचं सगळं काही आवरून जायची. माझी धडधाकट आई गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतःहून जागची हलली नव्हती. मधल्या मुलानं शेतात भरपूर प्रगती केली, सगळ्यात लहान मुलगा प्राध्यापक झाला, घरी दोन सुना आल्या, नातवंडं झाली, या सगळ्याचं आईला काहीच सोयरसुतक नव्हतं. तिची नजर नेहमीप्रमाणेच घराच्या चौकटीला भिडलेली.!"

        "जुनं घर मी माझ्याकडे ठेवून घेतलं होतं. अगदी त्याला लागूनच मुख्य रस्त्याच्या वाटेला मधल्याचा टुमदार बंगला आणि मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला सगळ्यात लहान भावाचं घर. मी काहीही न सांगता अगदी खूप आधीपासूनच भावंडांनी जबाबदा-या वाटून घेतल्या होत्या. सगळ्यात लहान प्राध्यापक असलेल्या भावाने कुटुंबातील सगळ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. मधल्या भावाने शेतीचं आव्हान स्वीकारून ते पेललं ही होतं, आणि त्याला आधुनिकतेची साथ देत आणखी ३ एकर जमीन विकत घेतली होती. कुटुंबाचा बाकी सर्व खर्च तो लिलया पार पाडायचा. मी तसा एकटाच, अगदी मागच्या वडिलोपार्जित जुन्या घरात आईसोबत रहायचो. लग्नाची कधी इच्छा झालीच नाही, आणि तसा विषय कधी कुणापुढे काढला ही नाही. आपलं वडील नाहीत, आपल्याला खूप जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, सगळं सुरळीत सुरू ठेवायचं आहे, ही खूणगाठ खूप लहानपणीच मनाशी बांधली होती, म्हणून बहुतेक. पण मी आणि आई अगदी मागच्या जुन्या घरात आहोत म्हणून एकटे पडले होते असेही काही नव्हते. येणाजाणा-या सगळ्या माणसांचा राबता, सुना, नातवंडं या सगळ्याचं बस्तान दिवसभर आमच्यापाशीच असायचं." 

        "जुन्या घराचा दरवाजा गेल्या कित्येक वर्षांपासून कधीच बंद केला नव्हता. त्यामुळे तिथं चिमण्यांचं येणं जाणं खूप असायचं. आणि काही चिमण्यांनी तर घरच्या तुळईवर, कौलांच्या फटीत आपली घरटी घातलेली होती. दिवसभर त्यांचं ते चिवचिव सुरूच असायचं, आणि सतत ते भुर्रकन बाहेर उडून जाणं, आणि क्षणार्धात परतून येणं. घरी येणाजाणारी मंडळी ही नेहमीच कौतुक करायची, की भारी आहे राव तुमचं. या चिमण्यांपायी तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा कधीही बंद करत नाही, आणि हे ऐकत असताना बाजूच्या भिंतीला टेकून बसलेली आई एकटक चौकटीवर नजर रोखून पाहत असायची.!"

#आयुष्य_वगैरे #गंध_आठवणींचा #गावाकडच्या_गोष्टी  ❤️

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

समुद्र

प्रिय सखी

सप्रेम नमस्कार.!


        पत्रास तसं विशेष काही कारण नाही, पण ब-याच गोष्टी ज्या मी कॉलवर बोलू शकत नाही, किंवा मला बोलायचं असूनही मी तुझा आवाज ऐकण्यात हरवून गेल्यावर बोलायच्या राहून जातात, त्या माझ्या सुप्त भावनांना वाट करून द्यायचा माझा हा छोटासा प्रयत्न.


        तुझ्या आयुष्यात येणाऱ्या कडू गोड अनुभवांनी तू समृद्ध होत, हळूहळू बदलत जात असताना, तुझं हे बदलणं म्हणजे माझ्यासाठी नेमकं काय याचा उलगडा मला कधी होतच नाही. कारण कधीकधी तुझ्या मागं मागं फिरायचो, कुठंतरी कोपऱ्यावर थांबायचो तेव्हा मला तू समुद्रासारखी वाटायचीस, आणि मी एक नदी. आणि प्रत्येक नदीला जन्मजातच समुद्राला भेटायची ओढ असते. पण माझ्या बाबतीत मात्र वेगळंच घडलं ना गं. समुद्राच्या भेटीच्या ओढीनं माझी नदी कोरडी पडते आहे, हे कळल्यावर समुद्र स्वतःच माझ्याकडे आला. कित्ती नशीबवान ना मी. म्हणूनच तर आपल्या पहिल्या भेटीत मी म्हणालो होतो की, 

"दिलेस तू एवढे की, 

आता काय मागू सांग.?

एका भेटीतच फेडलेस तू

माझ्या वेड्या प्रेमाचे पांग.!"

बस्स.. आता आणखी काय नको. 

उरलं आयुष्य जगायला हा इतका आधार ही पुरेसा आहे, असं वाटलं.


        पण आपली ओळख वाढत गेली तसतसं हळूहळू मला उमगू लागलं की, समुद्र असणं ही सोप्पं नाहीये. हा विशाल असा पसरलेला समुद्र आतून खूप रिता आहे आणि कोरडा पडत चालला आहे. सगळ्यांना सामावून घेऊन स्वतः इतकं रितं राहणं, या समुद्राला कसं बरं जमत असेल.? ना कुठली तक्रार, ना काही मागणं.! जे काही वाट्याला येईल ते हसतमुखाने स्वीकारायचं, आणि प्रेमळ लाटांच्या तुषारांनी सर्वांना चिंब भिजवत, सतत कडकडून भेटायचं. कितीही मुसळधार पाऊस पडला तरीही त्या पावसात ढगाला भिजता येत नाही ना ,तसंच काहीसं या समुद्राचं झालं आहे. सगळं काही आहे, पण काहीच नाही. सुखदुःख, आशा-अभिलाषा यांच्या सीमेपलीकडे जाणं तसं खूप अवघडच. सगळं काही स्वीकारत समुद्र स्वतःच अस्तित्व पार विसरून गेला आहे, आणि ते हरवलेलं अस्तित्व शोधायला समुद्राला वेळही नाहीये. ना सुख, ना दुःख, ना प्रेम, ना तिरस्कार.! 


        या अवस्थेत पोहचायला तसं सगळ्यांना आवडतं, पण हा प्रवास किती जीवघेणा असतो, हे ज्यानं भोगलयं त्यालाच ठाऊक असतं. रितेपणा म्हणजे काय असतं, ते समुद्राला आता चांगलंच उमगलं आहे. म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची पर्वा न करता, स्वतःकडे जे काही आहे, ते तो मुक्तहस्ते उधळतो आहे. कारण समुद्राला वाटतं की, हे रितेपण आणखी कुणाच्याही वाट्याला यायला नको. इतकंच सांगेन की, रितं व्हा, पण स्वतःच अस्तित्व जपा.!

लाडक्या चिमणीस गोड गोड मुका.!😘


        आणि शेवटी 'फक्त तुझाच' वगैरे लिहायची मला काहीच गरज वाटत नाहीये, कारण की आणखी कुणाचा कधी झालोच नाही, किंबहुना तसा प्रयत्न मी केलाच नाही.

#खुशबू #वेड 🌼🌼🌼 #आयुष्य_वगैरे 

#गंध_आठवणींचा ❤️


शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

काव काव..

आज अलार्म वाजण्याच्या आधीपासूनच रमाकांत ची झोप उघडली होती. उत्सवाचं वातावरण आणि त्यातच रविवार सुट्टीचा दिवस, त्यामुळे आज निवांत उशीरापर्यंत झोपायचं, असं त्यानं ठरवलं तर होतं, पण पहाटे साधारण तीन चार वाजल्यापासून सुरू असलेल्या एका कावळ्याच्या कावकावाने त्याच्या झोपेचे खोबरं करून टाकलं होतं. ब-याचदा हुसकावून देखील तो कावळा अजूनही गेला नव्हताच. एकसारखं ते काव काव काव काव...! नुसता वैताग आणला होता. शेवटी नाईलाजाने रमाकांतने बिछाना सोडलाच. अलार्म वाजायला अजूनही अर्धा पाऊण तास बाकी होता. आता झोप मोडलीच आहे, म्हणून मग सर्वात आधी त्याने तो अलार्म बंद केला. नेहमी प्रमाणे रात्री झोपताना बंद करून ठेवलेला मोबाईल हाती घेतला, आणि सुरू केला. लागलीच धडाधड दोन तीन मेल, भरपूर मेसेजेस आणि आईचे खूप सारे पडलेले missed calls रमाकांतला दिसले. तसा तो बावचळलाच. म्हणून मग त्याने लगेचच आईला call back केला, पण तिकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. भरपूर वेळा call करूनही आई call receive करतच नव्हती. तसा मग रमाकांत आणखीनच घाबरला. म्हणून मग त्याने शेजारच्या घरी फोन केला, तेव्हा कुठे मग त्याला हायसे वाटले. रमाकांतची आजी आज पहाटे पहाटे वारली होती. तो निरोप देण्यासाठीच आई फोन करत होती, आणि आता तिची आणि बाकी मंडळींची रडारड सुरू आहे, म्हणून कुणीही माझा फोन रिसिव्ह करत नाहीये. रमाकांतने फोन ठेवला. सगळ्या प्लॅनिंगची वाट लागली आता, म्हणून तो डोकं पकडून बसला. आजची सुट्टी वाया जाणार, आणि आता उद्या परवाही सुट्टी पडणार. स्वतःशी पुटपुटत त्याने भरपूर शिव्या हासडून घेतल्या. त्या कावळ्याची कावकाव अजूनही सुरूच होती. रागारागाने रमाकांत बाहेर पडला, आणि हातात एक भला मोठा दगड घेऊन कावळ्याला शोधू लागला. आवाज तर येत होता, पण कावळा काही केल्या दिसत नव्हता. तितक्यात सोसायटीच्या कंपाऊंड बाहेरच्या कडूनिंबाच्या झाडावर बसलेला तो कावळा रमाकांतच्या नजरेत आला. त्याला फक्त हुसकवायचं असा विचार करून रमाकांतने सहज भिरकावलेला हातातील तो दगड, त्या कावळ्याच्या नेमका वर्मी बसला, आणि क्षणार्धात तो कावळा गतप्राण झाला. आता मात्र रमाकांतचा मूड आणखीनच जास्त ऑफ झाला. तसाच हताशपणे तो रूमवर परतला. सर्वात आधी मॅनेजरला संबंधित गोष्टींचा आणि सुट्टी हवी असल्याचा मेल केला. बाकी सगळी आवराआवर केली, आणि आपल्या आजीच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी तो आपल्या गावी निघाला.

रमाकांत कोल्हापूर जवळच्या चिखली गावचा.! चिखली.! अगदी छोटंसं पण निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव.! गेल्या तीनेक वर्षांपासून रमाकांत कामानिमित्त पुणे येथे. रमाकांत तसा आधीपासूनच एकलकोंडा आणि नास्तिक. त्यामुळे त्याला सोबत कुणी असलं काय किंवा नसलं काय, काही फरक पडत नसायचा. माणसाचा सर्वात चांगला मित्र हा एकांतच आहे, स्वतःला आणि स्वतच्या क्षमतेला योग्य प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर एकांताशिवाय पर्याय नाही, असे तो नेहमीच म्हणायचा. 

क्रमशः 

अपुर्ण 😑

#आयुष्य_वगैरे #अडगळ #गोष्टी_गावाकडच्या

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

मनातलं महाभारत

बाळा, आपण कुणाच्या सोबतीत राहतो, तो कुणाशी कसा वागतो, त्याची विचार करण्याची पध्दत काय आहे, हे सगळं ही खूप महत्त्वाचं असतं. तो जर अप्रत्यक्षपणे आपल्यावर त्याची विचारसरणी लादत असेल आणि आपणही डोळे झाकून ती स्वीकारत असू तर हे खूप भयंकर आहे. कारण आपण जर वाट दाखविणाराच चुकीचा निवडला, तर आपली वाट लागणारच ना.! बाळा, नीट विचार करून पहा, कधी काळी हे निर्णय आपणच तर घेतलेले असतात, ही माणसं आपणच तर स्वीकारलेली असतात. पण काळाची पावलं ओळखून आपण वेळीच सावध न झाल्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढावलेली असते. बाळा, योग्य वेळी योग्य ते शहाणपण येणं खूप गरजेचं आहे. कारण त्यानंतर येणारं शहाणपण हे फक्त जीवघेणा पश्चात्ताप सोबतीला घेऊन येत असतं.!🎭

#आई_म्हणे #आयुष्य_वगैरे #अडगळ 💔

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...