बंड्या
मी स्वतः चालत दवाखान्यात आलो होतो. आता मला इथं येऊन आठवडा झाला होता, पण इथं आल्यापासून माझी तब्येत खालावतच चालली होती. शरीर औषधोपचाराला प्रतिसाद देत नव्हतं. हळूहळू श्वास घ्यायलाही जड जात होतं. रात्रीच्या वेळी माझी खूप तडफड व्हायची. मी हात पाय वगैरे खूप झाडायचो. म्हणून माझं हात पाय बांधून ठेवलं होतं. तरीही माझी तडफड सुरुच होती. श्वास आत घेताना माझं शरीर अगदी एखाद्या बेडकासारखं फुगत होतं, आणि श्वास सोडला की एखाद्या हवा निघून गेलेल्या फुग्यासारखी माझी अवस्था होत होती. गेल्या कित्येक दिवसांपासून मी तोंड आणि डोळे उघडलेच नव्हते. अन्न पाणी औषधं वगैरे सगळं काही बंद. म्हणून मग नाईलाजाने डॉक्टरांनी मला घरी घेउन जायला सांगितलं होतं. मी घरी येऊन आता मला दोनेक दिवसच झाले असतील. पण मला जास्त झालंय आणि मी आता फारच कमी क्षणांचा सोबती आहे, हे कळाल्यापासून माझ्या ओळखीच्या लोकांचा राबता एकसारखा सुरूच होता.
माझी बायको नेहमी माझ्या उशाशी बसून असायची. आल्या गेल्या सगळ्यांशी तीच बोलायची. माझी तडफड बघवत नाही असं म्हणायची, पण का कुणास ठाऊक तिच्या डोळ्यात पाण्याचा एक साधा टिपूस ही नव्हता. बाहेरचं बोलणं ऐकून आतल्या खोलीत बसलेली आई थांबून थांबून सारखी रडायची. माझं पोरगं.. माझं पोरगं... माझा बंड्या.. माझा बंड्या... फक्त हेच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडत होते. त्या खोलीतल्या तुळईला बांधलेल्या एका सुंदर पाळण्यात माझं छोटंसं लेकरू निवांत झोपलं होतं. माझ्या अजून दोन लेकी बाहेर अंगणात लंगडी खेळत होत्या. आपल्या घरात नेमकं काय चाललंय आणि आपला बाप आता फक्त काही क्षणांचाच सोबती आहे याची त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती, आणि बहुतेक त्यातच त्यांचं सुख सामावलेलं होतं. माझा घात तसा व्यसनानेच केला होता, पण धोका वेळीच ओळखूनही मी सावध न झाल्यामुळे आज माझी ही अवस्था झाली होती. रक्तापेक्षा जास्त दारूच माझ्या अंगात धावत असल्यामुळे तिच्याशिवाय मला तसा पर्याय नव्हताच. बाहेर इतकी रडारड आणि गंभीर वातावरण असतानाही माझा बाप आत स्वयंपाकघरात बसून जेवण करत होता. त्याचा एक पाय मोडलेला असल्यामुळे त्याला तो पाय लांब करून बसावं लागायचं. त्याच्या त्या मोडक्या पायाला लागूनच त्याच्या आधाराची, ती एक काठी पडली होती. त्या सगळ्या कोलाहलात मी शेवटचा श्वास कधीचा घेतलाय, हे कुणाच्या लक्षातही आलं नाही. थोड्या वेळाने लक्षात आलं तेव्हा मग एकच कल्लोळ उठला. आत आई छाती बडवून घेऊ लागली. माझा बंड्या... माझा बंड्या...! दगड झालेली माझी बायको दोन्ही लेकींना कवटाळून गप्प बसून होती. आत पाळण्यात असलेलं बाळही आता एकसारखं रडत होतं, पण कुणीतरी सतत त्या पाळण्याला झुलवत होतं. बाहेरचा कालवा ऐकून बापानं जेवणाचं ताट बाजूला सारलं आणि तिथेच बसून ढसाढसा रडू लागला.
गेल्या तीनेक वर्षात पाऊस तसा कमीच होता, पण यंदा मात्र चांगलाच जोर धरला होता. अंगणात जमलेली बरीचशी माणसं मिळेल त्या जागी छत्री वगैरे घेऊन पुढचे सोपस्कार लवकर पार पडायची वाट पाहत उभी होती. त्यातच नेमका रात्रीच्या वेळीच मी शेवटचा श्वास घेतल्यामुळे ब-याच जणांची गैरसोय झाली होती, त्यात भरीस भर म्हणून हा पाऊस. मला बाहेर अंगणात आणलं, त्या रिमझिम पावसातच मला शेवटची आंघोळ घातली गेली. मग पुन्हा मस्त घासून पुसून, नवीन कपडे घालून, मला तिरडीवर मांडी घालून बसवून करकचून बांधण्यात आलं. माझी मान हलायला नको, म्हणून तोंडावर एक रूमाल गुंडाळून तो सुद्धा करकचून बांधला गेला. आता माझा शेवटचा प्रवास सुरू झाला होता.
पावसाची रिपरिप एकसारखी सुरूच होती. आमचं स्मशान घरापासून जवळच तरीही अडीच तीन किलोमीटर होतंच. म्हणून मग बरीचशी मंडळी आपापली वाहनं घेऊन पुढे जाऊन थांबली, आणि बाकी लोकं मला खांद्यावरून घेऊन तिकडं निघाली होती. मी धान्याच्या दुकानात मापाडी म्हणून कामाला होतो, त्यामुळे गावात ब-यापैकी सगळीजण मला ओळखायची. त्यामुळे मला शेवटचा निरोप द्यायला भरपूर माणसं जमली होती.
आता आम्ही स्मशानात पोहोचलो होतो. तिथंला एकुलता एक मोठा लाईट अधेमध्ये बंद चालू होत होता. म्हणून ब-यापैकी सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅट-या सुरू केल्या होत्या. पावसाची रिपरिप अद्यापही सुरू होतीच. आजूबाजूला चाललेली चर्चा मला पुसटशी ऐकू येत होती. तो खड्डा काढणारा जेसीबी वाला येऊन दोन तास उलटलं होतं म्हणं, पण तो सुद्धा फुल्ल टाईट. त्यामुळे त्याला खड्डा नीटसा काढता येत नव्हतं. आता रात्रीचे दोन वाजून गेले होते. हळूहळू एकेक माणसं वैतागून निघून जात होती. तरीही माझ्या कामावरची, शेजारची आणि दारूच्या गुत्त्यावर कायम गाठ पडणारी मंडळी अजूनही थांबून होती. ती मंडळी आजही पिऊनच आलेली होती. माझा बाप पावसात भिजत अगदी निर्विकार उभा होता. शेवटी त्या गुत्त्यावर गाठ पडणारी दोन माणसंच खड्ड्यात उतरली, आणि त्यांनी माती, चिखल, पाणी, पटापट बाहेर काढत खड्ड्यात एक दिवळी काढून त्यात मला बसवलं. माझ्या कपाळाला विभूती लावली. तोंडात पाणी सोडलं. आणि मग उरलेलं काम तेवढं जेसीबी वाल्यानं अगदी निवांत पार पाडलं.
आता मात्र अगदी बोटावर मोजण्याइतपतच माणसं उरली होती. शेवटी माझ्या थडग्यावर एक मोठा दगड ठेवून, त्यावर भरपूर गुलाल ओतून, उरलेल्यांनी घराची वाट धरली. मी त्या दगडाखाली, त्या खड्ड्यातल्या दिवळीत बसून होतो. माझ्या आजूबाजूला ओतलेलं भरपूर मीठ, माझ्या अंगावरचे कपडे, माझ्या कपाळावर लावलेला गुलाल, तोंडात सोडलेलं शेवटचं पाणी, हे सगळं काही मला जाणवत होतं. पण आता माझ्या जवळ कुणीच नव्हतं. हे स्मशानच आता माझं नवीन घर होतं. मी माझ्या आजा आजीला कधी भेटलो, पाहिलो नव्हतो. ती दोघं माझ्या जन्माआधीच निघून गेली होती. आता मी सुद्धा त्यांच्या जगात आलो होतो. आता इथं मी त्यांचा शोध घेणार होतो.!🎭
#आयुष्य_वगैरे #अडगळ #गावाकडच्या_गोष्टी