आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी वर्ष अगदी मनापासून, मराठीतल्या शब्दांची पुंजी रिकामी करूनही जेव्हा तिच्या मनाचा उंबरठा मला ओलांडता आला नाही, तेव्हा वाटलं की कदाचित भाषेचा पोत बदलला तर भावनांचे रंग बदलतील. माझा एक भाबडा प्रयत्न होता तो. सहज बदल म्हणून करून पाहिलेला. पण पलीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. नेहमीसारखीच एक सुन्न करणारी शांतता, आणि त्या शांततेने मला एका क्षणात जमिनीवर आणलं.
तेव्हा कुठे माझ्या मनात लख्ख प्रकाश पडला अन् मला उमगलं की, अरे... हा विषय भाषेचा कधी नव्हताच मुळी..! आपण उगाच शब्दांच्या पाठीमागे धावत होतो, वाक्यरचना दुरुस्त करत होतो. पण मूळ अडचण तर तिच्या मनातल्या भावनांची होती, ज्या भावना माझ्यासाठी तिच्या मनात कधीच अस्तित्वात नव्हत्या. माणूस भाषेने जवळ येत नाही, तो भावनेने जवळ येतो. जिथे मनाला पाझरच फुटायचा नसेल, तिथे तुम्ही ज्ञानेश्वरीची ओवी म्हणा किंवा शेक्सपिअरचं स्वगत, कुणाला काय फरक पडतो..? समोरच्याला जर ऐकायचंच नसेल, तर तुमचे शब्द कितीही सोन्याचे असले तरी ते त्याच्यासाठी दगडच ठरतात.
कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीच्या शांततेचाही आपल्याला हवा तसा किती सोयीस्कर अर्थ लावतो ना..! कधी वाटतं ती व्यस्त असेल, कधी वाटतं तिला वेळ मिळाला नसेल. पण खरं तर माणूस कधीच व्यस्त नसतो, विषय फक्त प्राधान्याचा असतो. संवादासाठी लागते ती आतून जडलेली ओढ, आणि ओढ ही जबरदस्तीने किंवा भाषेचा पोषाख बदलून निर्माण करता येत नाही. आणि हा गुंता नेमका लक्षात न आल्यामुळे किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत राहिल्याने मी मात्र माझ्या बाजूने अपेक्षांचं एक प्रचंड मोठं साम्राज्य उभं केलं होतं. काहीच परत मिळणार नाही, हे पुरतं ठाऊक असूनही मी देत गेलो, भावनांची उधळण करत गेलो. पण प्रेम ही काही गणिताची मांडणी नाही की तुम्ही डाव्या बाजूला इतकं दिलं म्हणजे उजव्या बाजूला तितकं परत मिळालंच पाहिजे. ते एकतर्फी असलं की असाच शब्दांचा सुकाळ होतो.
आता मात्र आयुष्याच्या या एका विशिष्ट वळणावर मागे वळून पाहताना स्वतःचीच थोडी कीव येते आहे आणि थोडं हसूही येतं आहे. तिच्या सुखाची, आरोग्याची प्रार्थना करून, तशा शुभेच्छा देऊन मी त्या मेसेजचा शेवट केला. पण तो फक्त एक निरोपाचा मेसेज नव्हता, ते माझ्या बाजूने चाललेल्या एका अनामिक प्रवासाचं कायमस्वरूपी केलेलं विसर्जन होतं. त्या मेसेजच्या शेवटी 'Take Care' म्हणताना माझ्या मनात तिच्याबद्दलची काळजी नक्कीच होती, पण त्याहूनही जास्त स्वतःला त्या भावनिक गुंत्यातून शिताफीने सोडवून घेण्याची एक केविलवाणी धडपड होती. आपण एखाद्याकडे क्षमा मागतो तेव्हा आपण त्याला दोषमुक्त करत नाही, तर स्वतःला त्या विचारांच्या कैदेतून मुक्त करत असतो.
तिने प्रतिसाद दिला नाही, हेच तिचं सर्वात स्पष्ट आणि प्रामाणिक उत्तर आहे. हे उत्तर स्वीकारणं सुखावह नसलं तरीही ते स्वीकारणं निदान आता तरी फार फार गरजेचं आहे. कारण कधी कधी नातं संपल्याचं किंवा ते कधी सुरूच झालं नव्हतं हे मान्य करणं, हेच स्वतःला जपण्याचं पहिलं पाऊल असतं. खरंच... सुख ही माणसाच्या मनाची एक अवस्था आहे. आणि आता मला माझ्या मनाची ती अवस्था पुन्हा मिळवायची आहे, जिथे कुठलीही अपेक्षा नसेल, कुठलाही भाषेचा अट्टाहास नसेल. आणि हो.., पुन्हा कधीही न मिळणाऱ्या प्रतिसादाची आस तर अजिबात नसेल.! 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂