माझ्याकडे तिचे शेकडो फोटो आहेत, काही अगदी तिच्या नकळत घेतलेले तर काही तिने स्वतः पाठविलेले. पण जेव्हा जेव्हा मी मोबाईलची गॅलरी स्क्रोल करतो तेव्हा मात्र प्रत्येक फोटो एक वेगळीच गोष्ट सांगत असतो. तरीही दिवसातून कितीतरी वेळा माझं बोट नकळत व्हॉट्सॲपवर जातं आणि तिचं ते छोटंसं गोल प्रोफाईल पिक्चर, तिचा तो 'DP' उघडून मी तासन् तास पाहत राहतो.
ती सध्या काय करते आहे, तिच्या आयुष्यात काय चाललंय, हे जाणून घेण्याची ही जी धडपड आहे ना, तीच कदाचित माणसाच्या अतृप्त मनाची लक्षणं असावीत. माणूस फोटोंमध्ये भूतकाळ शोधतो, पण माणसाला हवा असतो तो त्याचा वर्तमानकाळ. गॅलरीमधले फोटो हे गोठलेले क्षण आहेत. ते सुंदर आहेत, पण ते होऊन गेलेले आहेत. त्या फोटोंना इतिहास आहे, पण त्यात आजचा जिवंतपणा नाही. आणि व्हॉट्सॲपचा तो डीपी..? तो तिचा 'आज' असतो. तो तिचा 'आत्ता' असतो. ती आज कशी दिसतेय, तिचा मूड कसा आहे, तिने स्वतःला जगासमोर कसं मांडलंय, हे त्या एका छोट्या वर्तुळातून थोडं का होईना, पण जाणवतं. आणि दररोज हे पहायला भारी वाटतं.
कधीकधी वाटतं की ही सवय आहे की एक अनामिक हुरहूर.? माझ्याकडे तिच्या असलेल्या शेकडो फोटोंमध्ये ती माझी असते, माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालेली. पण व्हॉट्सॲपवर ती तिची स्वतःची असते. तिथे ती जगाला सामोरी जात असते. आणि मी.? मी त्या डिजिटल जगाच्या गर्दीत उभा असलेला एक पांथस्थ, जो तिच्याकडे चोरून पाहतो आहे, जो तिच्या त्या छोट्याशा खिडकीतून तिचं जगणं, तिचं आयुष्य अगदी दररोज न चुकता न्याहाळतो आहे.
एखाद्या माणसाला हा वेडेपणा वाटेल ही कदाचित, आणि वेडेपणा असेलही. या तंत्रज्ञानाने आपल्याला जवळ आणलं असं म्हणतात, पण खरं तर या डीपी पाहण्याच्या सवयीने माणसांमधलं अंतर आणखी गडद केलं आहे. समोरून बोलण्याचं धाडस संपतं, तेव्हा माणूस अशा आभासी खिडक्यांवर रेंगाळू लागतो. प्रेमळ माणसं कधीच बदलत नाहीत, बदलतात ते फक्त त्यांचे प्राधान्यक्रम. कदाचित तिच्या प्राधान्यक्रमात मी नेमका कुठे आहे.? हे शोधण्याचा हा माझा एक केविलवाणा प्रयत्न असावा.
तिचा डीपी बदलला की काळजात चर्र होतं. नवीन फोटो आला की मन सुखावतं, आणि जर अधेमध्ये अचानक फोटो गायब झाला, फक्त ते पांढरं मानवी चिन्ह दिसू लागलं, तर मात्र आभाळ फाटल्यासारखं वाटतं. तिचे शेकडो फोटो मोबाईलच्या गॅलरीत असूनही एका डीपीसाठी मन इतकं व्याकुळ व्हावं, यासारखा दुसरा विरोधाभास नाही. पण बहुतेक हेच तर खरं मानवी मन आहे. आपल्याला जे हक्काने मिळालंय त्यापेक्षा, जे आपल्या हातातून निसटतंय किंवा ज्याच्यावर आपला पूर्ण ताबा नाही, त्याच गोष्टीची ओढ जास्त असते.
हा व्हॉट्सॲपचा डीपी म्हणजे जणू एका बंद दाराची किल्ली आहे. दार उघडणार नाही हे माहीत असूनही, फक्त त्या किल्लीकडे पाहत राहण्यात एक वेगळंच सुख आहे. अजूनही जेव्हा जेव्हा मी व्हॉट्सॲप उघडतो, तिचं प्रोफाईल शोधतो आणि त्या गोल चित्रावर क्लिक करतो, तेव्हा मन अगदी काही सेकंदांसाठी तृप्त तृप्त होऊन जातं, आणि पुन्हा एकदा त्याच व्याकुळतेच्या प्रवासाला निघण्यासाठी सज्ज होतं.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂