शनिवार, १० जानेवारी, २०२६

म्हातारपण

आपण लहान असताना आपल्या आईवडिलांनी एका क्षणासाठीही कधी आपल्याला त्यांच्या नजरेपासून दूर होऊ दिलं नव्हतं. पण आता त्यांच्या वृध्दापकाळात, ते जवळपास तशाच काहीशा अवस्थेत असताना, नाईलाजाने का असेना, पण आपल्याला त्यांना घरी एकटं सोडून जावं लागतं. अधेमध्ये एखादा फोन करून थोडीशी विचारपूस केली तरीही, जोपर्यंत संध्याकाळी घरी येऊन त्यांना प्रत्यक्ष पाहत नाही, तोपर्यंत जीवाला चैन पडत नाही. रात्रीचं जेवण आवरून त्यांच्या सोबत गप्पा मारत, त्यांच्याकडे पाहत बसल्यावर सहज वाटून जातं की, कसं काय कुणास ठाऊक, पण अलीकडे त्यांचा वृध्दत्वाकडे झुकत जाण्याचा वेग कमालीचा वाढला आहे. हालचालींचा मंदावलेला वेग, थरथरणारे हात, अगदी जवळच ठेवलेल्या एखाद्या गोष्टीचा अचानकपणे पडलेला विसर, प्रत्येक दिवसागणिक चेह-यावर वाढत जाणा-या सुरकुत्या, नेमकं काय हवं आहे याचा विसर पडलेली, पण इकडं तिकडं भिरभिरणारी त्यांची नजर आणि आणखी बरंच काही ते दोघे शांतपणे झोपी जाईपर्यंत पाहतच राहतो. त्यानंतर बराच वेळ, अगदी तसाच, तिथेच त्यांच्या बाजूला बसून राहतो.!🎭

#आईबाप #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

रविवार, ४ जानेवारी, २०२६

टाईमपास

तिचा स्पष्ट नकार असूनही का कुणास ठाऊक पण माझं मन मात्र  तिच्याशिवाय इतर कुठे रमलच नाही. किंबहुना तसा प्रयत्न मी कधी केलाच नाही. एकतर्फी असलं तरी माझं प्रेम खरं होतं आणि कायम राहणार या गोष्टीची माझ्या मनाला पुरती कल्पना होती. आता मध्यंतरी बरीच वर्षे मी तिच्या घराकडे जाणं ही बंदच केलं होतं, 
परंतु तिची आठवण आली नाही असा एक दिवसही नसायचा आणि
मला संधी मिळाली की तिच्या नकळत, लपून छपून तिला डोळे भरून पहायचं मी सोडलं नव्हतं. साधारण २०१४ ची गोष्ट. जानेवारी महिना. नुकताच एक चित्रपट पाहून आलो होतो. टाईमपास. तो पाहताना खूप रडलो होतो. तो चित्रपट पाहताना एका गोष्टीचं समाधान वाटत होतं की प्राजूचं दगडूवर प्रेम आहे तरी, पण साला आपण तर कमनशिबी निघालो. कारण आपलं प्रेम तर एकतर्फी. त्या चित्रपटाचं ते तिकीट त्यानंतर बरीच वर्षे मी जपून ठेवलं होतं, कारण ज्यादिवशी मी तो चित्रपट पाहून आलो, त्याच दिवशी मला तिचं लग्न ठरल्याचं कळालं होतं. अगदी लहानपणापासून मी पाहिलेलं माझं एकमेव आवडतं स्वप्नं, आता कायमस्वरूपी एक स्वप्नं बनून माझ्या डोळ्यांसमोर बागडत असताना मला आजन्म पहावं लागणार होतं. आणि मी माझ्या मनाशी संवाद साधत असताना स्वतःला एक गोष्ट चांगलीच समजावून सांगितली होती की, आपल्या वाटण्यावर हे जग चाललेलं नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरीही इथं गोष्टी तशाच घडतात, जशा त्या नियतीने आधीच लिहून ठेवलेल्या असतात.

कळले नव्हते, कळत नाही, असे काही नाहीच नाही..
वेडा होतो, वेडाच ठरलो, तिचे शहाणपण कळलेच नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...