टाईमपास
तिचा स्पष्ट नकार असूनही का कुणास ठाऊक पण माझं मन मात्र तिच्याशिवाय इतर कुठे रमलच नाही. किंबहुना तसा प्रयत्न मी कधी केलाच नाही. एकतर्फी असलं तरी माझं प्रेम खरं होतं आणि कायम राहणार या गोष्टीची माझ्या मनाला पुरती कल्पना होती. आता मध्यंतरी बरीच वर्षे मी तिच्या घराकडे जाणं ही बंदच केलं होतं,
परंतु तिची आठवण आली नाही असा एक दिवसही नसायचा आणि
मला संधी मिळाली की तिच्या नकळत, लपून छपून तिला डोळे भरून पहायचं मी सोडलं नव्हतं. साधारण २०१४ ची गोष्ट. जानेवारी महिना. नुकताच एक चित्रपट पाहून आलो होतो. टाईमपास. तो पाहताना खूप रडलो होतो. तो चित्रपट पाहताना एका गोष्टीचं समाधान वाटत होतं की प्राजूचं दगडूवर प्रेम आहे तरी, पण साला आपण तर कमनशिबी निघालो. कारण आपलं प्रेम तर एकतर्फी. त्या चित्रपटाचं ते तिकीट त्यानंतर बरीच वर्षे मी जपून ठेवलं होतं, कारण ज्यादिवशी मी तो चित्रपट पाहून आलो, त्याच दिवशी मला तिचं लग्न ठरल्याचं कळालं होतं. अगदी लहानपणापासून मी पाहिलेलं माझं एकमेव आवडतं स्वप्नं, आता कायमस्वरूपी एक स्वप्नं बनून माझ्या डोळ्यांसमोर बागडत असताना मला आजन्म पहावं लागणार होतं. आणि मी माझ्या मनाशी संवाद साधत असताना स्वतःला एक गोष्ट चांगलीच समजावून सांगितली होती की, आपल्या वाटण्यावर हे जग चाललेलं नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरीही इथं गोष्टी तशाच घडतात, जशा त्या नियतीने आधीच लिहून ठेवलेल्या असतात.
कळले नव्हते, कळत नाही, असे काही नाहीच नाही..
वेडा होतो, वेडाच ठरलो, तिचे शहाणपण कळलेच नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂