पुन्हा सासरे बुवा..

टाळ, मृदंग आणि तबल्याची जुगलबंदी एकसारखी सुरूच होती.  सोबतीला ढगांचा ढोलही ताल धरू लागला होता. या सर्वांच्या तालावर वीज आणि वारा सुसाट वेगाने बेभान होऊन नाचत होते. पावसाच्या सरीही मोठमोठ्या टपो-या थेंबांच्या साह्याने ताशा वाजवू लागली होती. आणि इकडं आत हळूहळू सगळी मंडळी भजनात दंग होऊन गेली होती. मी अधेमधे समोर एका ओळीत असलेल्या महापुरुषांच्या चित्राकडे पाहत होतो, तर कधी टाळ आणि तबल्याची नाद अनुभवत होतो. आजूबाजूला जमलेल्या मोजक्याच पण भजनात पुर्णपणे तल्लीन झालेल्यांची मुर्ती न्याहाळत होतो. समोर एकूण चार महापुरुषांची चित्रं आहेत. त्यांच्याकडे एकेक करून पाहत असताना तुझ्याशी आणि बालपणाशी निगडित एकेक गोष्टी अगदी सहज आठवून जात होत्या. पंत महाराजांच्या हातातील छडी पाहून तुझ्या आजोबांच्या हातातील आधाराची छडी आठवली. त्यांना लागूनच आणखी एक महाराज एका लाकडी खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांची ती खुर्ची पाहून आपल्या मोहरमच्या लाकडी गाड्याची आठवण आली, जो नेहमीच आपल्या गल्लीत एका दगडी भिंतीला टेकून उभा असायचा. त्यापुढील स्वामी समर्थांच्या फोटो मागील गाय वासरू आणि इतर प्राणी पाहून आपल्या परड्यातील जनावरांच्या गोठ्याची आठवण आली. जिथल्या बोळात आपली नेहमीच ये जा असायची. आणि शेवटच्या फोटोतील महाराजांच्या मागील परिसर पाहून तुझ्या घराच्या आवारातील दगडी भिंती आठवल्या. तितक्यात पुन्हा एकदा जोरदार वीज चमकली, त्यापाठोपाठ गडगडण्याचा मोठा आवाज झाला आणि मी भानावर म्हणजेच भजनात आलो. क्षणभरासाठी माझं मलाच हसू आलं, पण ते आवरून मी पुन्हा माझ्या मनाचा मोर्चा टाळेकडे वळविला.


पप्पा खूप मागे एका खुर्चीवर बसले होते आणि मी पेटीवादकाच्या, टाळवादकांच्या अगदीच समोर. एकावर एक जमलेल्या सगळ्या मंडळींपैकी एकेक जण भजन म्हणत होती. शेवटी आरती सुरू झाल्यावर आम्ही सगळे जागीच उभे राहिलो आणि अचानक पप्पा मागून अगदी माझ्या जवळ येऊन उजव्या बाजूला उभे राहिले. पुन्हा एकदा माझी बुद्धी बधिर झाली. मन मैं लड्डू फुटा वगैरे वगैरे. खूप मस्त वाटत होतं. मी हळूच त्यांच्याकडे बघत होतो. मनात खूप काही विचार येऊन जात होते आणि त्यावर माझं मलाच खूप हसू येत होतं. पप्पा अगदी तल्लीन होऊन टाळ्या वाजवण्यात दंग होऊन गेले होते. मंदिरात घंटानाद एकसारखा घुमतच होता. 


आता पावसाची तीव्रता कमी झाली होती. सव्वा नऊ वाजून गेले होते. प्रसादाचे डब्बे सुध्दा आले होते. ओम नमः शिवाय च्या गजरात लागलीच सर्वांनी प्रसादावर ताव मारला ही.


प्रसाद घेताना मी अगदी लांब एका कोपऱ्यात खुर्चीवर बसलो होतो आणि पप्पा प्रसाद घेऊन अगदी पंत महाराजांच्या समोरच जाऊन बसले. ते पाहून लागलीच मी सुद्धा तिथेच जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. त्यांनी सुध्दा आज इकडं कसं काय.? याआधी कधी पाहिलं नाही तुम्हाला इथं.? असं विचारलं. त्यावर मी पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून सहज थांबलो होतो असं कारण पुढे केलं. त्यांनीही पुढे जास्त काही न विचारता आपण याआधीही भेटलोय असं सांगितलं. मी सुद्धा जुन्या ओळखीला लगेच दुजोरा दिला. पुढे ते म्हणाले की अधेमध्ये मी सेवा म्हणून प्रसाद देतो इथे, पण आज माझ्या पुण्याच्या लेकीने प्रसाद दिला आहे. त्यावर मी विचारलं की तिघीपैकी नेमका कुणी प्रसाद दिला आहे.? तिचं नाव काय.? ती सध्या काय करते.? वगैरे वगैरे. त्यावर त्यांनी सगळं सगळं सांगितलं. मला आधीच माहिती असलेल्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकताना मला खूप मस्त वाटत होतं. तितक्यात बोलता बोलता मी त्यांचा एक फोटो काढला होता. 


बाकी मस्त वाटलं... आणखी ही बरंच काही जे मी स्वतः फील केलं आणि जे फक्त आणि फक्त माझं असं आहे, असं बरंच शब्दांच्या पलीकडलं..!

खूप खूप धन्यवाद मॅडम..!🙏

#आयुष्य_वगैरे ❤️🫂

लोकप्रिय पोस्ट