शेवटी एके दिवशी आपण आपल्या वयाच्या एका अशा वळणावर येऊन पोहोचतो, जिथं अगदी अचानक आपल्या भूतकाळाच्या हिशोबाचा कागद आपल्या पुढ्यात येऊन पडतो आणि आपण खिशात हात घालून चाचपणी करू लागतो की, आजवरच्या या आयुष्यात आपण नेमकी काय कमाई केली..?
आजूबाजूची चार माणसं ज्याला यश म्हणतात, ते माझ्याकडे कधी फिरकलंच नाही. लहानपण कसं गेलं, तर वाऱ्यासारखं, कसल्याही शिस्तीशिवाय, अस्ताव्यस्त. शाळेतल्या त्या बाकावरचं अभ्यासाचं ओझं कधी माझ्या पाठीवर नीटपणे बसलंच नाही, आणि मैदानावर टाळ्या मिळवाव्यात असंही कोणतं कसब माझ्या अंगी नव्हतं. कलेच्या नावाने बोटं मोडावीत तर तिथेही निव्वळ शून्यच माझ्या खात्यात फार फार आधीपासून जमा होतं.
तरुणपण कधी आलं आणि कशाचाही थांगपत्ता नसताना कधी निघून गेलं, ते तर काही कळलंच नाही. जगाच्या रेट्यासोबत मी फक्त फरफटत चालत राहिलो, एवढंच. सगळे धावत होते म्हणून मीही पायाला भिंगरी लावून धावलो, पण त्या धावण्याला ना कुठली दिशा होती, ना स्वतःचा असा काही हेतू, ना एखादं विशिष्ट स्वप्न किंवा ध्येय मी उराशी बाळगलेलं होतं.
मग हा सगळा जन्म विनाकारण खर्च झाला की काय, असं वाटू लागतं. एखाद्या जुन्या, पडक्या वाड्यासारखं माझं अस्तित्व वाटायला लागतं, ज्या वाड्यात कोणी कधी मुक्कामाला आलं नाही, जो फक्त उभा राहिला. अशावेळी वाटतं की, समाज ज्याला सार्थक म्हणतो, त्यातलं मी काहीच कमावलं नाही.
पण कासावीस मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक बारीकशी ठिणगी अजूनही जिवंत असते, जी मला आतून ओरडून सांगतेय... थांब, सगळंच काही वाया गेलेलं नाही.
जगाच्या तराजूत माझ्या आयुष्याचं वजन भलेही भरत नसेल, पण मीही एका गोष्टीला माझा संपूर्ण जीव लावला होता. हो, ते कदाचित या व्यावहारिक दुनियेसाठी निव्वळ मूर्खपण असेल. त्या गोष्टीला समाजाने व्यर्थ किंवा वेडेपणा असं नाव दिलं असेल, पण त्यात माझ्या रक्ताचं पाणी आणि आत्म्याचा आवाज मिसळलेला होता. ती गोष्ट म्हणजे एका नितांत सुंदर, अथांग भावनेवर, तिच्यावर मी केलेलं माझं प्रेम.!
ते प्रेम पूर्णत्वाच्या चौकटीत बसणारं कधीच नव्हतं. ते एका बाजूने वाहत राहणाऱ्या नदीसारखं एकतर्फीच होतं. समोरून कुठलाही प्रतिसाद नाही, तरीही आतला प्रवाह कधी आटला नाही. अगदी आजच्या घटकेलाही, वयाच्या या वळणावर उभा असतानाही, माझं ते एकतर्फी तितकंच प्रामाणिक आहे. लोक विचारतात, यातून तुला काय मिळालं..? तर त्याचं उत्तर ‘काहीच नाही’ असं आहे.
पण मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या पलीकडचा तो एक ध्यास होता. मी एकाच अशा अधुऱ्या स्वप्नाला माझं सर्वस्व मानून बसलो आणि त्या एकाच कल्पनेभोवती माझं अख्खं जग फिरत राहिलं. जणू काही दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करायला माझ्या डोक्यात जागाच शिल्लक उरली नव्हती. जगणं हा एक प्रवाही कचरा आहे, पण त्यातही एक सोन्याचा कण असतो. माझ्यासाठी तो सोन्याचा कण म्हणजेच हे माझं हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न... माझं एकतर्फी प्रेम..!
त्या स्वप्नाने मला समाजात मोठं पद मिळवून दिलं नाही, बँक खात्यातला बॅलन्स रक्कम कधी वाढवली नाही, पण त्या स्वप्नाने मला माणूस म्हणून आतून जिवंत ठेवलं. मला ठाऊक आहे की, आज हे जग माझ्याकडे पाहून माझ्यावर हसत आणि म्हणतं की हा माणूस अपयशी ठरला. पण त्यांना काय ठाऊक, की या अपयशाच्या ढिगाऱ्याखाली एक निष्पाप निष्ठा आजही दडलेली आहे.
हे जग फार कोरडं आणि हिशोबी आहे. इथे भावनांना फारशी किंमत नसते. प्रत्येक जण काहीतरी मिळवण्यासाठीच नाती जोडत असतो. अशा जगात मी मात्र काहीही न मिळवता एकतर्फी का असेना पण फक्त देत राहिलो. माझं आयुष्य जितकं अपूर्ण राहिलं, तितकंच ते स्वप्नही अधुरं राहिलं, पण त्या अपूर्णतेमध्येच एक वेगळीच आणि विलक्षण श्रीमंती आहे.
मला कोणतीही खंत नाही, ना कोणाबद्दल मनात कसली तक्रार आहे. मी माझ्या पद्धतीने, माझ्याच अटींवर हे जगणं आजवर निभावत आलोय. हे आयुष्य जरी सगळ्यांच्या दृष्टीने एक विस्कटलेलं, वाया गेलेलं पान असलं, तरी त्या पानावरील माझ्या प्रेमाची ती एकतर्फी अक्षरे माझी स्वतःची आहेत. सरतेशेवटी, या शून्यातूनच मी माझ्या अस्तित्वाचा अर्थ शोधून काढलाय. आणि हे अधुरं असणंच कदाचित माझ्या जगण्याचं सर्वात मोठं आणि खरं सत्य आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂