रविवार, २ ऑगस्ट, २०२६

#१६६ ❤️‍🩹🫂

जागतिक मैत्री दिन... आज सकाळपासून मोबाईलची स्क्रीन सारखी उजळत होती. 'हॅपी फ्रेंडशिप डे'चे रंगीबेरंगी मेसेज, ग्राफिक्स, कोट्स... अगदी न थांबता येत होते. पण का कुणास ठाऊक, आज मला तिला मेसेज करावासा वाटला नाही. आणि कदाचित, तिच्या बाजूनेही हेच घडलं असावं.

आमच्यात हे तसं नेहमीचंच आहे. जग ज्या दिवसाचा उत्सव करतं, त्या दिवशी आम्ही दोघं एकमेकांपासून जाणीवपूर्वक थोडे दूर सरकतो. माणूस एकांताला घाबरतो आणि गर्दीत त्याला कुणी भेटत नाही. आमचंही नेमकं असंच काहीसं झालंय. शाहरुख खानने कुछ कुछ होता है मध्ये एक संवाद फेकला होता की, प्यार दोस्ती है. तो संवाद ऐकताना थिएटरमध्ये लोकांनी टाळ्या वाजवल्या असतील, पण माझ्या आयुष्यात तो संवाद एका जळजळीत सत्यासारखा समोर येऊन उभा राहिला. मी नेहमीच मानत आलो की, मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणजेच प्रेम. मैत्रीत जर पारदर्शकता असेल, तर तिथं प्रेमाचा अंकुर फुटायला किती वेळ लागतो..? पण तिने हे तेव्हाही स्वीकारलं नव्हतं आणि आजही ती तिच्या याच भूमिकेवर ठाम आहे. ती म्हणायची, मैत्री आणि प्रेमाच्या सीमा रेषा धूसर करू नकोस. प्रेम हे हक्काने बांधलेलं असतं, तिथं अपेक्षा येतात, मालकी हक्क येतो. पण मैत्री मुक्त असते. मला आपल्यातली ही मुक्ती गमावायची नाहीये. तिचं हे तत्त्वज्ञान तेव्हाही माझ्या डोक्यावरून गेलं होतं आणि आज जेव्हा मी रात्रीच्या वेळी मी माझ्या या रिकाम्या खोलीत बसून माझ्या घराच्या छताला न्याहाळत पडलो आहे, तेव्हाही मला ते पटत नाहीये. काही माणसं आपल्या आयुष्यात इतकी हक्काची असतात की, त्यांच्यावर हक्क गाजवण्याचा हक्कही आपण गमावून बसतो.

तिला नकार देणं जमलं, पण मला तिला विसरणं जमलं नाही. आज मैत्री दिनाच्या निमित्ताने मला तिच्याशी संवाद साधावासा वाटला नाही, याचं कारण राग किंवा अहंकार नक्कीच नाही. उलट, एक भीती आहे. तिच्या शांततेचा भंग करण्याची भीती. जर मी आज तिला 'हॅपी फ्रेंडशिप डे' चा मेसेज पाठवला असता, तर तो निव्वळ एक औपचारिक सोहळा ठरला असता. आणि आमच्यात औपचारिकता तर कधीच नव्हती.

आता हळूहळू बाहेर पाऊस जोर धरू लागला आहे. घराच्या पत्र्यावर पडणारे पावसाचे थेंब मनाची चलबिचल वाढवत आहेत. घराच्या एकमेव काचेच्या खिडकीवर पाण्याचे थेंब जमा होत आहेत. मी विचार करतोय, तीही तिच्या अलिशान फ्लॅटमध्ये पडून अशीच खिडकीशी डोळे लावून बसली असेल का.? तिच्या मनातही 'प्यार दोस्ती है' या वाक्यावरून काही वादळ उठलं असेल का.? पण तिची ठाम भूमिका मला ठाऊक आहे. ती त्या नात्याला 'मैत्री'च्या पलीकडे जाऊ देणार नाही आणि मी त्याला 'प्रेमा'पेक्षा कमी मानू शकत नाही. दोन समांतर रेषांसारखे आहोत आम्ही. सोबत चालतोय, पण कधी एकत्र येणार नाही. 

वपु म्हणायचे, "सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत." आज मला जाणीव होतेय की, तिची मैत्री हे माझं सुख आहे आणि तिच्या प्रेमाची अपूर्णता हे माझं दुःख. आता या या मनस्थितीत मी नेमकं काय करावं.? तिला मेसेज करावा की न करावा.? अन् केला तर मग हळूहळू पुन्हा एकदा बोलणं वाढत जाणार, माझं होतं ते वेड अजूनही आहे तसंच आहे, हे तिला दिसणार. आणि मी तुला अजूनही विसरलेलो नाहीये.? हे सांगायची खरंच गरज आहे काय.? अन् तिला तर ते माहितीच आहे. आणि बहुतेक म्हणून, आजच्या दिवशी आमचं एकमेकांशी न बोलणं, एकमेकांना मेसेज न पाठवणं अन् आजची ही शांतता आम्हा दोघांसाठीही कदाचित सर्वात उत्तम असा संवाद आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...