शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२६

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी वर्ष अगदी मनापासून, मराठीतल्या शब्दांची पुंजी रिकामी करूनही जेव्हा तिच्या मनाचा उंबरठा मला ओलांडता आला नाही, तेव्हा वाटलं की कदाचित भाषेचा पोत बदलला तर भावनांचे रंग बदलतील. माझा एक भाबडा प्रयत्न होता तो. सहज बदल म्हणून करून पाहिलेला. पण पलीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. नेहमीसारखीच एक सुन्न करणारी शांतता, आणि त्या शांततेने मला एका क्षणात जमिनीवर आणलं.

तेव्हा कुठे माझ्या मनात लख्ख प्रकाश पडला अन् मला उमगलं की, अरे... हा विषय भाषेचा कधी नव्हताच मुळी..! आपण उगाच शब्दांच्या पाठीमागे धावत होतो, वाक्यरचना दुरुस्त करत होतो. पण मूळ अडचण तर तिच्या मनातल्या भावनांची होती, ज्या भावना माझ्यासाठी तिच्या मनात कधीच अस्तित्वात नव्हत्या. माणूस भाषेने जवळ येत नाही, तो भावनेने जवळ येतो. जिथे मनाला पाझरच फुटायचा नसेल, तिथे तुम्ही ज्ञानेश्वरीची ओवी म्हणा किंवा शेक्सपिअरचं स्वगत, कुणाला काय फरक पडतो..? समोरच्याला जर ऐकायचंच नसेल, तर तुमचे शब्द कितीही सोन्याचे असले तरी ते त्याच्यासाठी दगडच ठरतात.

कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीच्या शांततेचाही आपल्याला हवा तसा किती सोयीस्कर अर्थ लावतो ना..! कधी वाटतं ती व्यस्त असेल, कधी वाटतं तिला वेळ मिळाला नसेल. पण खरं तर माणूस कधीच व्यस्त नसतो, विषय फक्त प्राधान्याचा असतो. संवादासाठी लागते ती आतून जडलेली ओढ, आणि ओढ ही जबरदस्तीने किंवा भाषेचा पोषाख बदलून निर्माण करता येत नाही. आणि हा गुंता नेमका लक्षात न आल्यामुळे किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत राहिल्याने मी मात्र माझ्या बाजूने अपेक्षांचं एक प्रचंड मोठं साम्राज्य उभं केलं होतं. काहीच परत मिळणार नाही, हे पुरतं ठाऊक असूनही मी देत गेलो, भावनांची उधळण करत गेलो. पण प्रेम ही काही गणिताची मांडणी नाही की तुम्ही डाव्या बाजूला इतकं दिलं म्हणजे उजव्या बाजूला तितकं परत मिळालंच पाहिजे. ते एकतर्फी असलं की असाच शब्दांचा सुकाळ होतो.

आता मात्र आयुष्याच्या या एका विशिष्ट वळणावर मागे वळून पाहताना स्वतःचीच थोडी कीव येते आहे आणि थोडं हसूही येतं आहे. तिच्या सुखाची, आरोग्याची प्रार्थना करून, तशा शुभेच्छा देऊन मी त्या मेसेजचा शेवट केला. पण तो फक्त एक निरोपाचा मेसेज नव्हता, ते माझ्या बाजूने चाललेल्या एका अनामिक प्रवासाचं कायमस्वरूपी केलेलं विसर्जन होतं. त्या मेसेजच्या शेवटी 'Take Care' म्हणताना माझ्या मनात तिच्याबद्दलची काळजी नक्कीच होती, पण त्याहूनही जास्त स्वतःला त्या भावनिक गुंत्यातून शिताफीने सोडवून घेण्याची एक केविलवाणी धडपड होती. आपण एखाद्याकडे क्षमा मागतो तेव्हा आपण त्याला दोषमुक्त करत नाही, तर स्वतःला त्या विचारांच्या कैदेतून मुक्त करत असतो.

तिने प्रतिसाद दिला नाही, हेच तिचं सर्वात स्पष्ट आणि प्रामाणिक उत्तर आहे. हे उत्तर स्वीकारणं सुखावह नसलं तरीही ते स्वीकारणं निदान आता तरी फार फार गरजेचं आहे. कारण कधी कधी नातं संपल्याचं किंवा ते कधी सुरूच झालं नव्हतं हे मान्य करणं, हेच स्वतःला जपण्याचं पहिलं पाऊल असतं. खरंच... सुख ही माणसाच्या मनाची एक अवस्था आहे. आणि आता मला माझ्या मनाची ती अवस्था पुन्हा मिळवायची आहे, जिथे कुठलीही अपेक्षा नसेल, कुठलाही भाषेचा अट्टाहास नसेल. आणि हो.., पुन्हा कधीही न मिळणाऱ्या प्रतिसादाची आस तर अजिबात नसेल.! 🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६

❤️‍🩹🫂

खोटं बोलायला नको नकोसं वाटतं. अन् जे आहे ते, आहे तसं, खरं खरं बोलावं तर माणसं हळूहळू दूर दूर निघून जातात.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

❤️‍🩹🫂

तुला जिंकण्याचा आणखी एकदा, मी निष्फळ प्रयत्न करेन...

काहीही उपयोग नसेलच तरीही, तुझ्याच अंगणात येऊन मरेन..!🎭

#वेड 🌼🌼🌼

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२६

❤️‍🩹🫂

आपण किती एकाकी आहोत, याची सर्वात जास्त जाणीव एखाद्या सणासुदीलाच होते..!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

जो तू ना था...‌ ❤️‍🩹🫂

अचानक खूपच अंधारून आलं म्हणून मी घरातून बाहेर आलो. पाहतो तर काय, आकाशात खूप सारे काळेकुट्ट ढग अगदी दाटीवाटीने थांबले होते. तेव्हा त्यांना तसं पाहून मनात अगदी सहज विचार येऊन गेला की, यंदा त्या अल निनोमुळे मनमुराद बरसता न आल्याने पाण्याच्या कमतरतेमुळे जमीनीची होणारी लाहीलाही पहायला, धरणीमातेचं सांत्वन करायला म्हणून तर हे ढग आलेले नाहीत ना. पण खरोखरच जमीन अजूनही त्यांची वाट पाहत असेल का..? आणि तितक्यात टिव्हीवर धुरंधर चित्रपटातील 'जो तू ना था..' हे गाणं वाजू लागलं.

"जो तू ना था... करते थे हम बातें तेरी यादों से..." गाण्याचे ते शब्द आणि बाहेरचं ते वातावरण एका क्षणात एकमेकांत विरघळून गेले. मला त्या धुरंधर चित्रपटातल्या नायकाची आठवण झाली. तोही असाच कित्येक वर्षांनी, अनेक वादळांना झेलत, शेवटी आपल्या घरी परततो. त्याला वाटत असतं की त्याच्या मागे सगळं काही थांबलं असेल. पण तो दारात उभा राहतो आणि त्याला एक क्रूर सत्य उमजतं की त्याच्या कुटुंबाला आता त्याच्याशिवाय जगण्याची सवय झाली आहे. सुरुवातीला ज्या आठवणींनी त्यांना रडवलं, त्याच आठवणी आता त्यांच्या जगण्याचा एक हक्काचा कोपरा झाल्या आहेत. शेवटी आयुष्य कोणासाठीही थांबत नसतं, ते अविरत प्रवाहित राहतं, हेच खरं.

मला वाटतं, आज आकाशात दाटून आलेल्या त्या ढगांनाही असंच काहीसं वाटलं असावं. ते जेव्हा खूप दिवसांनी, एक प्रदीर्घ विरह सोसून या जमिनीकडे पाहत असतील, तेव्हा त्यांना जाणवलं असेल की, जमीन होरपळली जरूर, पण ती थांबली नाही. तिने निसर्गाच्या या नव्या कोरडेपणाशी जुळवून घ्यायला शिकून घेतलं आहे. ढगांना वाटलं होतं की त्यांच्याशिवाय ही सृष्टी कोमेजून जाईल, पण सृष्टीने जगण्याचा दुसरा मार्ग शोधला होता. हा निसर्गाचा नियम माणसालाही लागू पडतो. माणूस सोडून जातो तेव्हा दुःख होतं, पण तो नसतानाही जगणं सुरू राहतं, याचं जास्त कौतुक वाटतं.

निसर्गाचा हा खेळ आणि माणसाचं प्राक्तन हे किती एकसारखं आहे ना..? आपण समजतो की आपण कोणाच्यातरी आयुष्यात अपरिहार्य आहोत, पण काळ आपली ही समजूत एका झटक्यात मोडून काढतो. आज ते ढग आकाशात दाटीवाटीने उभे आहेत, पण त्यात तो पूर्वीसारखा हक्क नाही, एक प्रकारचा संकोच आहे. जणू काही ते विचारत आहेत, आम्ही न बरसल्याने तुमचं फार अडलं का..? आणि जमिनीचं शांत मौन सांगत आहे, अडलं होतं, पण आता सवय झाली आहे.

शेवटी, निसर्ग असो वा माणूस, वेळेवर न मिळणाऱ्या गोष्टींची किंमत नंतर कधीच उरत नाही. ढग आता आले आहेत खरे, पण जमिनीची ती जुनी आतुरता आता हरवली आहे. हेच ते जगण्याचं विदारक सत्य आहे, जे आज निसर्गाने मला आकाशाच्या पटलावर लिहून दाखवलं. माणसाने निसर्गाकडून एकच गोष्ट शिकावी, ऋतू बदलतात, माणसं बदलतात, पण जगण्याचा हा चक्रव्यूह कधीच थांबत नाही.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

टॅटू....! ❤️‍🩹🫂

माणूस शरीरावर टॅटू का काढतो..? केवळ फॅशन म्हणून..? छे..! मला वाटतं की माणूस जेव्हा शब्दांनी अपुरा पडतो, तेव्हा तो स्वतःच्या त्वचेलाच एक कोरा कागद बनवतो. माझ्या या उजव्या हातावर, करंगळीच्या आणि मनगटाच्या अगदी बरोबर मधोमध तिचं नाव मी ज्या दिवशी कोरलं, त्या दिवशी मला वाटलं होतं मी माझं जग जिंकलं. प्रेम म्हणजे समोरच्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं. मीही तेच केलं. फरक इतकाच की, माझा आनंद एकतर्फी होता, आणि तिचा आनंद नेहमीच माझ्या वर्तुळाबाहेर होता.

आज ती तिच्या आयुष्यात #MH12 सारख्या ठिकाणी अगदी सुखनैव नांदते आहे. आता कदाचित तिला आठवतही नसेल की, कोणीतरी वेडा तिच्या एका हसण्यासाठी, तिला एकदा पाहण्यासाठी, रात्रंदिवस तिच्या अंगणात धडपडत, स्वतःच्या रक्ताचं पाणी करत असायचा. पण हा हातावरचा टॅटू.? हा मात्र अजिबात बदललेला नाही. तो तिथेच आहे, अगदी ताठ मानेने उभा..! काहीजण मला म्हणतात की तुझ्या हातावर असलेलं तिच्या नावाचं हे टॅटू म्हणजे माझ्या अपयशाची साक्ष आहे. म्हणू देत. मला काहीच फरक पडत नाही. जगाच्या लेखी जे अपयश आहे, ते माझ्या लेखी एका समृद्ध अनुभूतीचं अनमोल लेणं आहे. एकतर्फी प्रेम निभावून नेण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं, आणि मी अजूनही तेच करतो आहे, ती माझी होऊ शकत नाही हे माहीत असूनही अजूनही तिच्यासाठी झुरतो आहे.

सगळ्याच इच्छा पूर्ण होण्यासाठी नसतात, काही इच्छा माणसाला जगायला शिकवण्यासाठी असतात, हे वपुंचं एक वाक्य मला आज अगदी अचूक वाटू लागलं आहे. माझ्या हातावरचा हा टॅटू मला रोज सकाळी आरशात बघताना चिडवत नाही, तर तो मला सांगतो, अरे वेड्या, तू प्रेम केलंस, हा तुझा अधिकार होता. तिने ते नाकारलं, तो तिचा अधिकार होता. तिच्या नकाराने तुझं प्रेम कसं काय कमी होईल..? प्रेम जर बदल्यात काही मागू लागलं, तर तो व्यापार झाला. आणि खरंच.. मला व्यापारात कधीच रस नव्हता, मला तर नात्यांची गुंतवणूक करायची होती.

कधीकधी मित्र म्हणतात, अरे, लेझर ट्रीटमेंट करून हा डाग पुसून टाक ना, कशाला भूतकाळ छातीवर बाळगतोस..? अशावेळी मी हा विषय हसून टाळतो. कारण त्यांना कसं सांगू की हा डाग नाही, ही माझ्या प्रामाणिकपणाची सही आहे. आणि मी हा टॅटू पुसून टाकला म्हणजे मला माझ्या मनातलं प्रेम पुसता येईल का..? आणि मुळात ते पुसायचंच कशाला..? अपयश आलं म्हणून काय झालं, त्या प्रवासात मी जे अनुभवलं, जी हुरहूर अनुभवली, ती काय कमी मोलाची होती..?

दररोज कामाच्या ठिकाणी हातात पेन अथवा माऊस घेताना, हातात हातात चहाचा कप घेताना, जेव्हा जेव्हा माझी नजर या अक्षरांवर पडते, तेव्हा चहा अधिकच गोड लागतो, आणखी उर्मीने काम करण्याची इच्छा जागृत होते. कारण त्यात माझ्या तिच्या त्या जुन्या आठवणींची साखर पेरलेली असते. खरंच... माणूस हरला की संपत नाही, तो जेव्हा करायचं सोडतो, तेव्हा तो संपतो. मी प्रेमात हरलो असेन, पण जगण्यात नाही. माझ्या हातावरचा हा टॅटू माझ्या पराभवाचं स्मारक नाही, तर तो माझ्या एका निष्पाप, निस्वार्थी भावनेचा जिवंत पुतळा आहे. तो तिथे ताठ मानेने उभा आहे कारण त्याला माहीत आहे की, या शरीराच्या आत राहणाऱ्या माणसाने कोणाचीही प्रतारणा केलेली नाही. तिने मला नाकारलं तरीही मी माझ्या प्रेमाचा आदर करायला शिकलोय, आणि हाच माझ्या एकतर्फी प्रेमाचा सर्वात मोठा विजय आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

नको देवराया... ❤️‍🩹🫂

बालपण काय किंवा तरुणपण काय, कसं तरी सरून जातं म्हणतात तेच खरंय. तेव्हा पायाला चक्रं लागलेली असतात, डोक्यात विचारांचं वारं असतं. दिवस कसा उजाडतो, कधी मावळतो याचा पत्ताही लागत नाही. पण या म्हातारपणाच्या बाबतीत मात्र तसं नाही. हे अगदी नकोनकोसं होऊन गळ्यात पडलेल्या एखाद्या जुन्या, फाटलेल्या गोणपाटासारखं वाटायला लागतं. अंगातून ताकद कधीच निघून गेलेली असते आणि माणसाचं माणूसपण फक्त एका जिवंत हाडामासाच्या सापळ्यात अडकून पडलेलं असतं. हे म्हातारपण म्हणजे धड नीटपणे जगताही येत नाही आणि हा हट्ट सोडून, हा पसारा आटपून या जगातून निघूनही जाता येत नाही. तेव्हा वाटून जातं की, साला हा मृत्यूही वेळेवर येत नाही. कुठेतरी लांब उभा राहून आपली चेष्टा करत, आपल्याकडे लक्ष नसल्यासारखा रेंगाळत राहतो आहे.

सगळं आयुष्य आपण ज्या गोष्टींसाठी धावलो, ज्या गरजांमागे लागलो, त्या सगळ्या या म्हातारपणात अक्षरशः फोल वाटायला लागतात. सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंतचा हा मधला काळ म्हणजे केवळ एक रिकामा अवकाश वाटू लागतो. समोरच्या भिंतीवरच्या सरपटणाऱ्या पालीकडे पाहत, आसपास एकसारखं भिनभिन करणा-या माशीला हुसकावत तास न् तास घालवावे लागतात. पूर्वी कशाची तरी ओढ वाटत रहायची, आता मात्र कसलीच ओढ उरलेली नसते. इतकी वर्षे प्रेमाने विणण्यात घालवलेली ती वीण ही आता सैल झालीय की आपणच त्यातून गळून बाजूला पडलोय, हे सुद्धा समजेनासं होतं. पोराबाळांची, नातवंडांची आपली स्वतःची जगण्याची गणितं असतात. त्यांच्या आयुष्यात आपल्या या जीर्ण झालेल्या अस्तित्वाला कुठं जागा असणार.? आपण फक्त एका कोपऱ्यात पडून राहायचं आणि त्यांच्या गतीला अडथळा न ठरण्याची काळजी घ्यायची, अन् फक्त एवढंच तर आपल्या हातात उरलेलं असतं.

शरीर तर सोबतीचं नावच घेत नसतं. कधी गुडघे दुखतात, कधी पाठीचा कणा ताठ उभा राहू देईनासा होतो, तर कधी काहीही खाल्लं तरी पोटाला मानवत नाही. साधं पाणी प्यायची ही सोय उरलेली नसते. अन्नाची चव न कळण्याच्या त्या वयात, आता आपल्या हक्काच्या माणसांच्या शब्दांची गोडीही संपलीय, ही जाणीव तर एक क्षणही स्वस्थ बसू देत नाही. खरंतर या वयात माणसाला फक्त शांतता हवी असते, पण ती शांतता आतून पोखरत जाणारी नसावी, एवढीच काय ती त्याची अपेक्षा असते. पण आजूबाजूला पाहिलं की फक्त गडबड, गोंधळ आणि कोलाहल सुरू असलेला दिसतो. नव्या पिढीचा वेग, त्यांची भाषा, त्यांचे व्यवहार या सगळ्यात आपण कुठेतरी खूप मागे पडलोय, पार परके झालोय असं वाटत राहतं. स्वतःच्याच घरात आता आपण उपरे ठरतो आहोत, यासारखं दुसरं दुःख नाही.

आता या वयात जग सोडून जाण्याची भीती वाटत नाहीये , उलट तो एक सुटकेचा मार्ग वाटायला लागला आहे. पण निसर्गाचा नियमही किती विचित्र आहे पहा. जेव्हा जगायचं असतं, तेव्हा श्वास अपुरे पडतात, आणि जेव्हा सगळं संपवून टाकावसं वाटतं, तेव्हा हा पापी जीव काही केल्या साथ सोडत नाही. ही अशी कोंडी झाल्यावर माणसाने करायचं तरी काय.? एका बाजूला भूतकाळाच्या जळमटांनी भरलेल्या आठवणी आणि दुसऱ्या बाजूला भविष्यात अंधाराशिवाय काहीच न दिसणारं शून्य. या दोन टोकांवर हेलकावे खात राहणं म्हणजेच म्हातारपण का.?

हे जगणं आता केवळ सोपस्कार म्हणून बाकी उरलं आहे. रोज सकाळी चहाचा कप हातात घेताना वाटतं की, आजचा दिवस तरी शेवटचा ठरावा. पण पुन्हा तीच सकाळ, तोच कंटाळवाणा दुपारचा उकाडा आणि तीच एकाकी रात्र. आपण ज्या संस्कृतीत वाढलो, तिथं म्हणे वयोवृद्धांना मान असतो. पण आजच्या या कोरड्या, यांत्रिक जगात केवळ जिवंत असण्याला काही किंमत नसते. तुमच्या अस्तित्वाचा कोणाला काही उपयोग नसेल, तर तुम्ही फक्त एका अडगळीसारखे असता. कधी कधी वाटतं की दिवसभर फक्त आणि फक्त हसत रहावं... एकसारखं. या सगळ्यासकट स्वतःवरही खूप खूप हसावं. हे जगणं म्हणजे एक असा खेळ आहे, ज्याचे नियम आपल्याला कधी समजलेच नाहीत आणि आता खेळ संपवायची वेळ आली, तर पंचच गायब झालेत. धड मैदानाबाहेर जाता येत नाही आणि खेळात टिकून राहण्याची ताकद अंगात उरलेली नाही.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

ऑक्टोबर... ❤️‍🩹🫂

आता पावसाळा जवळपास संपल्यात जमा. तसा तोही यंदा हवा तसा, हवा तितका बरसला नाही म्हणा. तशी ऑक्टोबर हीट वगैरे असतेच प्रत्येकवर्षी, पण या कमी पाऊसमानामुळे यंदा बहुतेक जास्त जाणवत आहे. खिडकीतून आत येणाऱ्या या तीव्र उन्हाच्या झळात माझी विचारांची तंद्री कधी लागली ते काही माझं मलाही कळलं नाही अन हातातला चहाचा कप कधीचा निवून पांढरा पडून गेला होता. पण माझं लक्ष तिथे नव्हतं.आता एकाएकी माझं लक्ष त्या तिथं, त्या उन्हाच्या तीव्र झळांकडे ही नव्हतं आणि त्या चहाच्या कपाकडे ही. माझं चित्त हरवून गेलं होतं, माझ्या मनाच्या रंगमंचावर अगदी अचानक सुरू झालेल्या आठवणींच्या एकपात्री प्रयोगकडे. जिथे माझ्याच आयुष्यातले जुने, फाटलेले आणि काही फार फार नकोनकोसे असलेले प्रसंग पुन्हा-पुन्हा 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड लावून चालले होते.

खरंच... नको नको ते सारं काही आठवणं, म्हणजे नरकच...!

मी स्वतःशीच पुटपुटलो. माझ्या ओठांवर आलेले हे शब्द अचानक माझ्या जिभेला कडवट चव देऊन गेले. माणूस आठवणींच्या सुखासाठी जगतो. पण त्या सुखाच्या पाठीमागे या नकोशा आठवणींचा जो भुताटकीसारखा वावर असतो, त्याचं काय..? काही आठवणी अशा असतात, ज्या गाडून टाकल्या तरी त्यांचं पीक मनाच्या जमिनीत पुन्हा पुन्हा उगवत राहतं. आपण त्यांना विसरू पाहतो, आणि त्या नेमक्या त्याच वेळी समोर येऊन उभ्या ठाकतात, जेव्हा आपण अगदी एकटे असतो.

माणसाचं मन कसं असतं ना..? जे विसरायला हवं, ते अगदी कोरून ठेवतं आणि जे लक्षात ठेवायला हवं, ते वाऱ्यावर सोडून देतं. आज मागे वळून पाहताना वाटतं की, त्या चुकीच्या वेळी घेतलेले चुकीचे निर्णय, ते सुटलेले हात, ते अर्धवट राहिलेले संवाद... हे सगळं सगळं काही आज का आठवावं.? असे हे एकपात्री प्रयोग करून या मनाला नेमकं काय सुख मिळतं.?


हा नरक बाहेर कुठे नसतोच मुळी. तो इथे असतो, आपल्याच डोक्याच्या आत. जेव्हा आपण स्वतःच्याच विचारांच्या कैदेत असतो आणि त्या कैदेची किल्लीही आपल्याकडेच असते, पण ती कुलूपात घालून फिरवण्याची ताकद मात्र आपल्यात उरलेली नसते. तोच खरा नरक. आपण भूतकाळ बदलू शकत नाही हे माहीत असूनही, 'जर-तर'च्या खेळात स्वतःलाच हरवून घेणं, याला दुसरं काय म्हणणार..? आयुष्यात काही माणसं आणि काही प्रसंग असे असतात, ज्यांना पूर्णविराम देणं गरजेचं असतं. आपण तिथे विनाकारण स्वल्पविराम देत बसतो आणि वाक्याचा अर्थच बदलून जातो. आज माझ्याही बाबतीत तेच होतंय. मी त्या जुन्या, नकोशा पानांना पूर्णविराम देऊ शकलो नाही, म्हणूनच आज त्या आठवणी मला या नरकाची यातना देत आहेत. सहज वाटून गेलं की, यातून सुटायचं तरी कसं..? म्हणून मग मी चहाचा तो निवेलेला कप बाजूला ठेवला आणि एक मोठा दीर्घश्वास घेतला. कदाचित या आठवणींशी भांडण बंद करावं लागेल. त्यांना येऊ द्यावं लागेल, बघावं लागेल, हसावं लागेल, रडावं लागेल आणि उराशी घट्ट कवटाळून ठेवायची इच्छा असूनही संथपणे सोडून द्यावं लागेल. मन हलकं करायचं असेल, तर आधी त्या पाठीवरचा भूतकाळाचा बोजा उतरवून ठेवावा लागेल. कारण शेवटी जगणं हे कालच्या गुदमरलेल्या रात्रीत नाही, तर आजच्या दिवसात असतं.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६

तिचा व्हॉट्सॲप डीपी... ❤️‍🩹🫂

माझ्याकडे तिचे शेकडो फोटो आहेत, काही अगदी तिच्या नकळत घेतलेले तर काही तिने स्वतः पाठविलेले. पण जेव्हा जेव्हा मी मोबाईलची गॅलरी स्क्रोल करतो तेव्हा मात्र प्रत्येक फोटो एक वेगळीच गोष्ट सांगत असतो. तरीही दिवसातून कितीतरी वेळा माझं बोट नकळत व्हॉट्सॲपवर जातं आणि तिचं ते छोटंसं गोल प्रोफाईल पिक्चर, तिचा तो 'DP' उघडून मी तासन् तास पाहत राहतो.

ती सध्या काय करते आहे, तिच्या आयुष्यात काय चाललंय, हे जाणून घेण्याची ही जी धडपड आहे ना, तीच कदाचित माणसाच्या अतृप्त मनाची लक्षणं असावीत. माणूस फोटोंमध्ये भूतकाळ शोधतो, पण माणसाला हवा असतो तो त्याचा वर्तमानकाळ. गॅलरीमधले फोटो हे गोठलेले क्षण आहेत. ते सुंदर आहेत, पण ते होऊन गेलेले आहेत. त्या फोटोंना इतिहास आहे, पण त्यात आजचा जिवंतपणा नाही. आणि व्हॉट्सॲपचा तो डीपी..? तो तिचा 'आज' असतो. तो तिचा 'आत्ता' असतो. ती आज कशी दिसतेय, तिचा मूड कसा आहे, तिने स्वतःला जगासमोर कसं मांडलंय, हे त्या एका छोट्या वर्तुळातून थोडं का होईना, पण जाणवतं. आणि दररोज हे पहायला भारी वाटतं.

कधीकधी वाटतं की ही सवय आहे की एक अनामिक हुरहूर.? माझ्याकडे तिच्या असलेल्या शेकडो फोटोंमध्ये ती माझी असते, माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालेली. पण व्हॉट्सॲपवर ती तिची स्वतःची असते. तिथे ती जगाला सामोरी जात असते. आणि मी.? मी त्या डिजिटल जगाच्या गर्दीत उभा असलेला एक पांथस्थ, जो तिच्याकडे चोरून पाहतो आहे, जो तिच्या त्या छोट्याशा खिडकीतून तिचं जगणं, तिचं आयुष्य अगदी दररोज न चुकता न्याहाळतो आहे.

एखाद्या माणसाला हा वेडेपणा वाटेल ही कदाचित, आणि वेडेपणा असेलही. या तंत्रज्ञानाने आपल्याला जवळ आणलं असं म्हणतात, पण खरं तर या डीपी पाहण्याच्या सवयीने माणसांमधलं अंतर आणखी गडद केलं आहे. समोरून बोलण्याचं धाडस संपतं, तेव्हा माणूस अशा आभासी खिडक्यांवर रेंगाळू लागतो. प्रेमळ माणसं कधीच बदलत नाहीत, बदलतात ते फक्त त्यांचे प्राधान्यक्रम. कदाचित तिच्या प्राधान्यक्रमात मी नेमका कुठे आहे.? हे शोधण्याचा हा माझा एक केविलवाणा प्रयत्न असावा.

तिचा डीपी बदलला की काळजात चर्र होतं. नवीन फोटो आला की मन सुखावतं, आणि जर अधेमध्ये अचानक फोटो गायब झाला, फक्त ते पांढरं मानवी चिन्ह दिसू लागलं, तर मात्र आभाळ फाटल्यासारखं वाटतं. तिचे शेकडो फोटो मोबाईलच्या गॅलरीत असूनही एका डीपीसाठी मन इतकं व्याकुळ व्हावं, यासारखा दुसरा विरोधाभास नाही. पण बहुतेक हेच तर खरं मानवी मन आहे. आपल्याला जे हक्काने मिळालंय त्यापेक्षा, जे आपल्या हातातून निसटतंय किंवा ज्याच्यावर आपला पूर्ण ताबा नाही, त्याच गोष्टीची ओढ जास्त असते.

हा व्हॉट्सॲपचा डीपी म्हणजे जणू एका बंद दाराची किल्ली आहे. दार उघडणार नाही हे माहीत असूनही, फक्त त्या किल्लीकडे पाहत राहण्यात एक वेगळंच सुख आहे. अजूनही जेव्हा जेव्हा मी व्हॉट्सॲप उघडतो, तिचं प्रोफाईल शोधतो आणि त्या गोल चित्रावर क्लिक करतो, तेव्हा मन अगदी काही सेकंदांसाठी तृप्त तृप्त होऊन जातं, आणि पुन्हा एकदा त्याच व्याकुळतेच्या प्रवासाला निघण्यासाठी सज्ज होतं.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

तिची मला आलेली पत्रं... ❤️‍🩹🫂

प्रिय मित्रा...

विस्कटलेल्या संसाराच्या राखेतून पुन्हा उभं राहणं सोपं नसतं, हे मला चांगलंच ठाऊक आहे. पण जे विधिलिखित असतं, ते कुणालाही चुकत नाही म्हणतात, तेच खरं. नियतीने तुझ्यावर चालवलेला तो आघात मी कदाचित जवळून पाहिला नसेल, पण त्याची दाहकता मी नक्कीच समजू शकते. कधीकधी वाटतं, जे झालं ते विसरून तू आता जुन्या गोष्टी मागे टाकून पुढे वाटचाल करायला हवी आहेस. मित्रा.. त्याच त्याच दुःखद आठवणींच्या वर्तुळात स्वतःला अडकवून ठेवण्यात काय अर्थ आहे..? हो, मला पूर्ण जाणीव आहे की, असं तत्त्वज्ञान सांगणं जितकं सोप्पं असतं, तितकंच त्या वेदनेतून प्रत्यक्ष जाणं आणि वागणं प्रचंड अवघड असतं. पण तुझा तो सुप्त, दृढनिश्चयी स्वभाव मी ओळखते. तू ठरवलंस तर ही नवीन सुरुवात तुझ्यासाठी अजिबात अवघड नाही, हे जितकं मला ठाऊक आहे, तितकंच तुझ्या मनालाही पक्कं ठाऊक आहे.

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सावरण्याचा जीवापाड प्रयत्न करत राहूनही तुझा संसार पार विस्कटून गेला. त्या वादळातून तू स्वतःला कसं कसं सावरलंस, हे तुझं तुलाच ठाउक. आज मी तुला कितीही हवीहवीशी वाटत असले, माझ्या असण्याने तुला आधार मिळत असला, तरीही एक कटू सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. मी तुझी एक सर्वात जास्त आवडती, जीवाभावाची मैत्रीण म्हणूनच आयुष्यभर तुझ्या सोबत राहू शकते. पण... फक्त तुझं, तुझ्या पूर्ण हक्काचं असं हक्काचं माणूस मी कधीही बनू शकत नाही. मित्रा.. आठवतंय ना.!? आपलं नातं हे नेहमीच मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे राहणार, हे आपण दोघांनी आपल्या पहिल्या आणि शेवटच्या भेटीत ठरवलं होतं.

तुझा तो हसताखेळता संसार अचानकपणे मोडून आता जवळपास दोन वर्षे व्हायला आली आहेत. काळ पुढे सरकतोय. हल्ली तुझ्यासाठी बऱ्यापैकी चांगली, सुविद्य स्थळंही चालून येत आहेत. पण तरीही तू अजूनही दुसऱ्या लग्नाला तयार का होत नाहीयेस..? हा एकच प्रश्न माझ्या मनाला आतल्या आत रोज पोखरतोय, खूप सतावतोय. आणि कधीकधी रात्रीच्या शांततेत एक भीती माझ्या मनाला चाटून जाते की, तुझ्या या दुसऱ्या लग्नाला नकार देण्याचं कारण कुठेतरी मी तर नाहीये ना..?

तुझं माझ्यावर निस्सीम प्रेम होतं, आहे आणि ते नेहमीच कायम राहील, यात माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. ते प्रेम पवित्र आहे, सुंदर आहे. पण मित्रा, व्यावहारिक जगाचे काही नियम असतात. आपण आता आपापल्या आयुष्याच्या वाटेवर इतके पुढे निघून आलो आहोत की, आपल्या या वाटा समांतर तर आहेत, पण एकमेकांपासून खूप दूर निघून आल्या आहेत. आणि समांतर रेषा कधीच एकत्र येत नाहीत, हे गणिताचं सत्य आयुष्यालाही लागू पडतं. आपल्या दोघांमधील हे भावनिक आणि सामाजिक अंतर पार करणं, आता निदान या जन्मात तरी पूर्णपणे अशक्यच आहे. म्हणूनच सांगते, स्वतःला त्या भूतकाळाच्या कैदेतून मुक्त कर, आणि एका नव्या आयुष्याला सामोरं जा.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...