एक अतिशय सामान्य #मिरजकर माणूस... जो तुमच्या माझ्या मनातले विचार मांडतो..! #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
बुधवार, २९ जुलै, २०२६
#१६९ ❤️🩹🫂
मंगळवार, २८ जुलै, २०२६
#१७० ❤️🩹🫂
मानवी आयुष्यात काही गोष्टी इतक्या उशिरा घडतात की त्या घडूनही त्यांचा अर्थ उरत नाही. पावसाळा संपल्यानंतर आलेला पहिला पाऊस जसा शेतकऱ्याच्या डोळ्यांत आनंद निर्माण करत नाही, तसंच काहीसं माझ्या आयुष्याचं झालं. तू आलीस... पण तोपर्यंत माझं आयुष्य तुझी वाट पाहण्यातच संपून गेलं होतं. लोकांना वाटतं, प्रतीक्षा म्हणजे फक्त वेळ घालवणं. पण ज्यांनी कधी आयुष्यभर कुणाची वाट पाहिली नाही, त्यांना हे समजत नाही की प्रतीक्षा ही वेळ नसते, ती एक स्वतंत्र जीवनपद्धती असते. ती माणसाच्या चालण्यात शिरते, बोलण्यात शिरते, नजरेत शिरते, अगदी श्वासातही शिरते. इतकी की एक दिवस स्वतःचं अस्तित्व आणि प्रतीक्षा यांत फरकच उरत नाही. मी बहुतेक त्या टप्प्यावर खूप आधी पोहोचलो होतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक ऋतू तुझ्या नावाने सुरू झाला आणि तुझ्याच नावाने संपला. गुलमोहर फुलला की तू आठवायचीस. पहिला पाऊस पडला की तू आठवायचीस. दिवाळीतल्या दिव्यांत तुझा चेहरा दिसायचा. हिवाळ्यातल्या धुक्यात तुझा आवाज ऐकू यायचा. इतकंच काय, अगदी उन्हाळ्याच्या निर्जीव दुपारीसुद्धा एखादी झुळूक आली की क्षणभर वाटायचं... बहुतेक तू आली असशील. तू मात्र प्रत्यक्षात कधीच आली नाहीस. पण माझं मन वास्तवापेक्षा भ्रमावर जास्त प्रेम करू लागलं होतं. भ्रम फार दयाळू असतो. तो कधी नकार देत नाही. तो कधी दूर जात नाही. तो फक्त माणसाला हळूहळू स्वतःपासून दूर नेत राहतो. आणि मीही तसाच चालत राहिलो. आणि एके दिवशी अचानक तू माझ्या आयुष्यात आलीस अन् मला म्हणालीस की,"मला तुझ्या प्रेमाची कल्पना खूप खूप आधीपासूनच होती." त्या क्षणी मला रडावं की हसावं, हेच समजेनासे झालं होतं. कारण त्या एका वाक्याने माझ्या सगळ्या जुन्या जखमांतून पुन्हा रक्त यायला सुरुवात केली. मला वाटायचं, माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचलंच नसेल. म्हणून मी स्वतःला माफ करत होतो. पण जेव्हा कळलं की ते तुझ्यापर्यंत पोहोचलं होतं, आणि तरीही तू इतकी वर्षे काहीच बोलली नाहीस, तेव्हा मला पहिल्यांदाच स्वतःची कीव आली. मी इतकी वर्षं ज्या दारावर टकटक करत होतो, त्या घरात मला हवाहवासा माणूस आधीपासूनच होता, फक्त त्याने दार उघडायचं ठरवलं नव्हतं. ही जाणीव माणसाला आतून मोडून टाकते. त्यानंतर आपल्या भेटीगाठी झाल्या. संवाद झाले. पण त्या प्रत्येक संवादात मी तुला गमावत गेलो. कारण तू जितकी जवळ येत होतीस, तितकंच स्पष्ट होत होतं की माझ्यासाठी तुझ्या मनात प्रेम नाही. उलट माझं वेड, माझं प्रेमं तुला अस्वस्थ करत होतं. मी आजवर माझ्या मनात जपलेलं सर्वात सुंदर सत्य, तुझ्यासाठी एक त्रासदायक वास्तव बनलं होतं. त्या दिवशी मला प्रेमाची एक नवी व्याख्या समजली. "प्रेम म्हणजे नेहमीच दुसऱ्याला आनंद देणं नसतं. कधी कधी प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या मनावर नकळत ठेवलेलं सर्वात जड ओझं असतं. आणि त्या ओझ्याखाली दबलेला माणूस आपण नसतो, आपल्यावर प्रेम नसलेली ती व्यक्ती असते." हे समजल्यावर पहिल्यांदाच मला माझ्या स्वतःच्या प्रेमाची लाज वाटली. मी तुला दुखवायचं कधीच ठरवलं नव्हतं. माझं प्रेम तुला कैद करेल, असं तर स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या दृष्टीने ते प्रेम होतं. पण तुझ्या दृष्टीने ते बंधन होतं. आपण दोघे एकाच भावनेकडे पाहत होतो, फक्त दिशाच वेगळ्या होत्या. तुला माझ्यापासून दूर जायचं होतं, आणि मला तुझ्याशिवाय जगणं शिकायचं होतं. दोघांच्याही इच्छा कठीण होत्या. फरक इतकाच की, तू त्या पूर्ण करू शकलीस, पण मी मात्र अजूनही नाही. आज या वयात आरशात स्वतःकडे पाहिलं की माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात, पण माझ्या मनात अजूनही तोच तरुण मुलगा उभा आहे, हात रिकामे, डोळ्यांत असंख्य स्वप्नं, आणि समोरून तू येशील या एका अशक्य शक्यतेवर जगणारा. लोक म्हणतात, वेळ सगळं भरून काढते. पण मला तसं कधी वाटलं नाही. वेळ जखमा भरत नाही. ती फक्त जखमांभोवती नवीन आयुष्य उभं करते. जखम मात्र आत तशीच धडधडत राहते. आजही एखाद्या शांत संध्याकाळी मी एकटाच बसतो, आणि नकळत माझ्या शेजारची रिकामी जागा पाहतो. तिथे कुणी नसतं. कधीच नव्हतं. पण माझं मन अजूनही तिथे तुलाच बसलेलं पाहतं. बहुधा माणूस प्रेम विसरत नाही. तो फक्त त्या प्रेमासोबत जगायला शिकतो. मीही शिकलो आहे. हसतो. बोलतो. लोकांमध्ये वावरतो. पण आत कुठेतरी एक घर आहे, जिथे घड्याळ अजूनही थांबलेलं आहे. दार अजूनही उघडं आहे. आणि एक माणूस अजूनही तुझी वाट पाहत आहे, आणि कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत पाहतच राहणार.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
#१७१ ❤️🩹🫂
कधी कधी आयुष्य आपल्याला आरशासमोर उभं करत नाही, तर आपल्या आईबाबांच्या चेहऱ्यासमोर उभं करतं. त्या चेहऱ्यावर काळाने अलगद उमटवलेल्या सुरकुत्या म्हणजे केवळ वाढतं वय नसतं, त्या असतात आपल्या आयुष्याच्या उरलेल्या ऋतूंची निःशब्द गणितं. प्रत्येक सुरकुती जणू हेच सांगत असते की वेळ कुणासाठीही थांबत नाही.
अलीकडे त्यांच्याकडे पाहताना मनात एक अनामिक हुरहूर दाटून येते. पूर्वी जे हात मला धरून चालायला शिकवत होते, तेच हात आता किंचित थरथरू लागले आहेत. जे डोळे माझ्या प्रत्येक वेदनेआधी माझं दुःख ओळखायचे, त्या डोळ्यांत आता थकव्याची एक हलकीशी छाया दिसू लागली आहे. आणि त्या छायेची जाणीव मला अस्वस्थ करून रात्रभर जागं ठेवते आहे.
आपण मोठे होतो, कमावतो, जगाशी दोन हात करतो, परंतु आईबाबा वृद्ध होत आहेत, ही वस्तुस्थिती स्वीकारण्याइतके मोठे आपण कधीच होत नाही. कारण त्या क्षणी आपल्या आतलं लहान मूल अजूनही त्यांच्या कुशीत डोकं ठेवून निर्धास्त झोपायचा हट्ट धरून बसलेलं असतं.
मनात कधी कधी एक बालिश विचार येतो. वाटतं, जगातील प्रत्येक आईबाबांना अमरत्व लाभलं असतं तर..? देवाने बाकी काही दिलं नसतं तरी चाललं असतं, पण एवढं एक वरदान दिलं असतं, तर किती लेकरांची भीती कायमची संपली असती. किती घरांना विरहाचा अर्थच कळला नसता.
पण वास्तवाला स्वप्नांची भाषा कधीच समजत नाही. त्याला फक्त वेळेची भाषा समजते. आणि वेळ हा जगातील सर्वात कठोर शिक्षक आहे. तो प्रत्येकाला एक दिवस अशी शिकवण देतो, जिची परीक्षा द्यायची इच्छा कुणालाच नसते.
ही जाणीव मनाच्या एखाद्या खोल कप्प्यात सतत जिवंत असते की, आज नाही तर उद्या... उद्या नाही तर कधीतरी... अशी एक सकाळ उगवेल, ज्या दिवशी घर तेच असेल, भिंती त्याच असतील, आठवणी त्याच असतील, पण "आई" म्हणून हाक मारली तरी प्रतिसाद येणार नाही, आणि "बाबा" म्हणून दारात उभं राहिलं तरी ओळखीचं हास्य दिसणार नाही.
त्या दिवशी खरं तर घर रिकामं होणार नाही, रिकामं होणार आहे मन. कारण माणसं जात नाहीत, त्यांच्यासोबत आपल्या आयुष्यातला एक संपूर्ण काळ निघून जातो. त्यांच्या पावलांच्या आवाजासोबत आपल्या अस्तित्वाचं एक सुरक्षित छप्परही अदृश्य होतं.
कदाचित म्हणूनच आज त्यांच्या प्रत्येक हसण्याकडे मी जास्त वेळ पाहतो. त्यांच्या प्रत्येक बोलण्याला मनात साठवून ठेवतो. कारण उद्या आठवणी उरतील, पण त्या आठवणींना नवीन क्षणांची साथ मिळणार नाही.
आयुष्याचा सर्वात मोठा विरोधाभास हाच असावा की ज्यांच्या आधारावर आपण उभं राहायला शिकलो, जगायला शिकलो, चांगलं वाईटाची ओळख करू शकलो, त्यांच्याशिवाय ही उभं राहण्याची तयारी आयुष्य आपल्याकडून आपल्याही नकळत करून घेतच असतं.
तरीही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात आजही तेच लहान मूल हट्टाने बसलेलं आहे. देवाकडे हात जोडून एकच निरागस मागणं करत आहे, "बाकी काही नको... फक्त आईबाबांना माझ्यापेक्षा जास्त आयुष्य दे. कारण त्यांच्याशिवाय उरलेलं आयुष्य जगणं म्हणजे श्वास घेणं असेल, पण जगणं कधीच नसेल."
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
सोमवार, २७ जुलै, २०२६
YZ Gen Z
तरुणाईच्या आंदोलनातला जोश आणि त्या मागच्या मागण्या या व्यवस्था परिवर्तनासाठी नक्कीच गरजेच्या असतात. अन्याय गप्पपणे सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध आवाज उठवणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळेच सुरुवातीला जेव्हा Gen Z रस्त्यावर उतरली, तेव्हा देशातील सुजाण नागरिकांनी, विचारवंतांनी त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. तो देणे स्वाभाविक आणि योग्यच होते. कारण समाज बदलण्याची ताकद शेवटी या नव्या रक्तामध्येच असते, हा आजवरचा इतिहास आहे.
पण जेव्हा आंदोलनाची दिशा भरकटू लागते आणि त्यातील मूळ नैतिक अधिष्ठानच हरवून बसते, तेव्हा त्यावर बोलणेही तितकेच गरजेचे असते. दुर्दैवाने, या आंदोलनाच्या आडून जे काही विकृत प्रकार समोर आले, तिथेच खरी गोम आहे. आंदोलनकर्त्यांकडून बोलली जाणारी अर्वाच्य, अश्लील भाषा आणि विरोधाच्या नावाखाली पाजळली जाणारी वैचारिक घाण ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाला भूषणावह नाही. ज्यांनी या आंदोलनाला डोळे झाकून पाठिंबा दिला, ते आता या घाणीवर सोयीस्कर मौन बाळगून आहेत. ही गप्प राहण्याची प्रवृत्ती अत्यंत घातक आहे. आपल्याच पाल्याने घरात चूक केली तर त्याला पाठीशी घालणारा बाप जसा त्याचा घात करतो, तसेच काहीसे या 'पुरोगामी' आणि 'पाठिंबा' देणाऱ्या टोळीने केले आहे.
हे सगळे जाणीवपूर्वक केले गेले. कारण, जर तिथे घडणाऱ्या वाईट गोष्टींवर बोट ठेवले, तर स्वतःच्या राजकीय किंवा वैचारिक पोळ्या कशा भाजता येतील, ही भीती या मंडळींना असावी. म्हणून त्यांनी चुकीच्या गोष्टींकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केला. हा केवळ कानाडोळा नाही, तर उघडउघड चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करता, तेव्हा त्याच्या वाईट कृत्यांवर व्यक्त उघडपणे व्यक्त होण्याची हिंमतही तुमच्यात असायला हवी. पण इथं ती हिंमत दाखवली गेली नाही.
सगळ्यात जास्त वेदनादायी आणि चिंतेची बाब म्हणजे, ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची अनेक वर्षे या समाजासाठी, देशासाठी झिजवली, जी व्यक्ती वय आणि अनुभवाने आपल्या आजोबांच्या वयाची आहे, तिच्याबद्दल या तरुण पिढीच्या मनात असलेली ही हिंस्त्र आणि पातळी सोडून बोलण्याची मानसिकता! विचार करा, जर देशाच्या भावी पिढीची भाषा आणि विचार इतके सडलेले असतील, तर आपण कोणत्या भविष्याकडे निघालो आहोत.? जी पिढी वडीलधाऱ्यांचा मान राखू शकत नाही, जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली निव्वळ अश्लीलतेचे प्रदर्शन करते, ती देशाचे नेतृत्व कशी करणार.? ही विकृत मानसिकता आपल्या राष्ट्राच्या अस्तित्वाला आणि भविष्याला लागलेली वाळवी आहे. हा जर Gen Z चा खरा चेहरा असेल, तर हे राष्ट्र उज्ज्वल भविष्याकडे नाही, तर विनाशाच्या खाईकडे चालले आहे, हे मान्य करावेच लागेल.!🎭
#मनात_येईल_ते
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
रविवार, २६ जुलै, २०२६
#१७२ ❤️🩹🫂
क्षण कधी संपतात आणि आठवणी कधी बनतात, हे समजण्याच्या आतच हातातील वहीचं शेवटचं पान उलटलं जातं. खूप सुंदर सुंदर क्षण, स्वप्नं आणि आठवणी लिहून तिचा कोपरा न कोपरा भरायचा, म्हणून अगदी कौतुकाने हाती घेतलेल्या त्या एका देखण्या वहीचं आज बहुतेक शेवटचं पान आलंय. माणसाला आपल्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी कधीच संपाव्या असं वाटत नसतं. कोणत्याही पुस्तकाचं, डायरीचं किंवा एका सुंदर पर्वाचं शेवटचं पान इतक्या लवकर यावं, असं कोणाला बरं वाटेल.? आपण तर खूप मोठी रोजनिशी लिहायला घेतली होती. त्यात सुखाचे रंग भरायचे होते, अजून कितीतरी जागा रिकाम्या ठेवून त्यात भविष्यातल्या गप्पा लिहायच्या होत्या. पण अचानक लक्षात येतं की, आपण फक्त कागद आणि शाई हातात धरून बसलोय. खरी कथा तर दुसरीकडेच लिहिली जातेय. जेव्हा स्वतः नियती लेखणी तिच्या हातामध्ये घेते, तेव्हा मात्र आपलं काहीएक चालत नाही. तिचे ओरखडे कागदावर उमटतात आणि आपण फक्त ते उघड्या डोळ्यांनी पाहत राहतो. माणसाचं आयुष्यही असंच या शेवटच्या पानाच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहतं. जुनं सगळं संपत चालल्याची एक अनामिक हुरहूर काळजात दाटून येते. मागे वळून पाहिलं की धुळीने माखलेले रस्ते दिसतात, काही सुटलेले हात दिसतात आणि काही विरून गेलेली स्वप्नं समोर उभी राहतात. पण नेमकं याच वळणावर, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच कुठेतरी एक नवी ऊब हवी असते. या कोरड्या होत चाललेल्या पानांवर नियतीने आता एक नवी उमेद द्यावी. पुन्हा एकदा श्वास घेण्याचं, आनंदाने आणि ताठ कण्याने जगण्याचं एक ठोस कारण समोर आणून ठेवावं, बस्स... एक एवढीच त्या निर्मिकाच्या, त्या अदृश्य सूत्रधाराच्या चरणी माझी प्रार्थना आहे. शेवटचं पान संपलं तरी वही संपत नसते, ती एका नव्या पुस्तकाची सुरुवात असते. भूतकाळाच्या खाचखळग्यांतून पाय काढत, भविष्याच्या अनोळखी वाटेवर विश्वासाने पहिलं पाऊल टाकणं म्हणजेच #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂 अन् हे जगणं कसंही असलं, तरी त्यातली जगण्याची ऊर्मी कधी आटू नये, एवढीच या मनाची धडपड आहे.!🎭
शनिवार, २५ जुलै, २०२६
#१७३ ❤️🩹🫂
शुक्रवार, २४ जुलै, २०२६
#१७४ ❤️🩹🫂
खरे तर माणसाने कुठेतरी रेंगाळत राहणे हीच एक मोठी शोकांतिका असते. आपण नको तिथे, नको त्या माणसांमध्ये स्वतःला कोंडून घेतो आणि त्याला 'तडजोड' असे गोंडस नाव देतो. एखादी जागा, एखादे घर किंवा एखादे नाते आपल्याला आतून पोखरत असते, तिथे राहणे म्हणजे रोज स्वतःचा थोडा थोडा खून करण्यासारखे असते. तरीही आपण तिथे थांबतो, कारण तिथे एक परिचित दुःख असते. त्या दुःखाची आपल्याला सवय झालेली असते. माणसाला सुखापेक्षा दुःखाची सवय लवकर होते, कारण दुःख माणसाला गुंतवून ठेवते. पण ज्या क्षणी तुम्हाला ही जाणीव होते की, तुमच्या केवळ असण्याने समोरील माणसाच्या मोकळ्या श्वासात अडथळा निर्माण होतोय, त्या क्षणी तिथे थांबणे म्हणजे स्वतःच्या विद्रुपीकरणाची परिसीमा असते. तिथे तुमची लायकी शून्य झालेली असते. अशा वेळी कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत मूकपणे तिथून पाय काढावा.
निघून जाणे ही पलायनवादाची निशाणी नाही, तर तो एका प्रगल्भ आणि धारदार शहाणपणाचा भाग आहे. आपण कुणाच्यातरी आयुष्यातली 'अडचण' बनून राहण्यापेक्षा, स्वतःच्याच नजरेत थोडे उंच झालेले कधीही चांगले. लोक म्हणतात की नाती टिकवायला हवीत, पण कोणाच्यातरी सुखाच्या आड येऊन टिकवलेले नाते म्हणजे निव्वळ एक जिवंत प्रेत असते. समोरच्याच्या डोळ्यातला तो संकोच, त्याच्या बोलण्यातला तो कोरडेपणा आणि तुमच्या उपस्थितीमुळे अचानक बदलणारे तिथले वातावरण... हे सगळे डोळ्यांना स्पष्ट दिसत असतानाही जे लोक तिथेच रेंगाळतात, ते स्वतःचाच अपमान करत असतात. नेमाडेंच्या भाषेत सांगायचे तर, हा जगाचा पसारा असाच आहे, इथे प्रत्येकाला आपापली जागा शोधायची असते आणि दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण न करता जगता आले पाहिजे.
आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय ही जाणीव माणसाला आतून हलवून सोडणारी असावी. तिथे अहंकार बाजूला पडावा आणि एक प्रकारची विरक्ती यावी. तिथून निघताना मनात कोणताही आकस, राग किंवा सूडबुद्धी नसावी. उलट, 'आपण निघालो हेच बरे झाले' अशी एक शांत, संथ जाणीव मनात उरावी. रेल्वे स्टेशनवर सुटून गेलेल्या गाडीकडे जसे आपण पाहत राहतो, तसेच त्या सोडून आलेल्या जागेकडे कोरड्या डोळ्यांनी पाहता आले पाहिजे. कारण शेवटी हे आयुष्य आहे, इथे आपण एकटेच आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत. मग कोणाच्यातरी नावडत्या चौकटीत स्वतःला बळजबरीने फिट करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न कशासाठी..? क्षणभरही न थांबता निघून जाणे, हेच त्या क्षणाचे आणि स्वतःचे सर्वोच्च सत्य असते.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
#१७५ ❤️🩹🫂
तिला विसरण्याच्या नादात मी उलट तिच्याच जास्त जवळ जातोय की काय, अशी भीती वाटायला लागलीय. कारण प्रत्येक 'न आठवण्याचा' प्रयत्न हा शेवटी तिचाच एक नवीन उच्चार ठरतो आहे. मनाचा हा कोपरा आता अगदी जीर्ण झालेल्या वाड्यासारखा झाला आहे. खरंतर भिंतींवरून चुना निखळावा तशा तिच्या आठवणी हळूहळू सुटायला हव्यात, पण त्या तर दगडावर कोरल्यासारख्या तशाच आहेत. मला कळतच नाहीये की या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं. म्हणून स्वतःशीच भांडत राहतो मी रोज. कधी राग येतो तिचा, कधी स्वतःचाच वीट येतो, तर कधी वाटतं की हे सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं, जिथे माणूस नावाचा प्राणीच नसेल. पण तितक्यात एक गोष्ट लक्षात येते की, "भूगोल बदलून इतिहास बदलता येत नाही." शेवटी, हा जो विसरण्याचा प्रवास आहे, तो तिला विसरण्याचा नाहीच आहे बहुदा. तो स्वतःला पुन्हा शोधण्याचा प्रवास आहे. तिच्याशिवाय मी कोण आहे, हे मला आता नव्यानं शोधावं लागणार आहे. हे दुःख, ही अस्वस्थता, हा एकाकीपणा, हे सगळं पचवून, यातूनच पुन्हा उभं राहावं लागेल. आज कदाचित मार्ग दिसत नाहीये, अंधार दाट आहे, पण कधीतरी हा भुताटकीसारखा छळणारा काळही शांत होईल. तेव्हा मी अस्तित्वात असेन की नाही, ते काही माहीत नाही. निदान तोपर्यंत या मनस्थितीशी दोन हात करत राहणं, जमत नसलं तरीही स्वतःला जपायचा प्रयत्न करत राहणं आणि या अव्यवस्थेतूनच एक नवीन व्यवस्था उभी करणं, एवढंच कदाचित आता माझ्या हातात उरलं आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
गुरुवार, २३ जुलै, २०२६
#१७६ ❤️🩹🫂
माणसाचं आयुष्य नेमकं किती असतं, याचा हिशेब आता डॉक्टरांच्या पुस्तकांतून नाही तर अंत्ययात्रांच्या संख्येतून कळू लागला आहे. कालपरवापर्यंत खांद्याला खांदा लावून चालणारे कितीतरी जण आता फोटोंमध्ये अडकून पडले आहेत. उरलेले दिवस मोजण्याचं वय नकळत येऊन ठेपलं आहे. अशा वेळी मागे वळून पाहिलं की एक गोष्ट अक्षरशः अंगावर येते आहे. ती म्हणजे या आयुष्याचा कितीतरी मोठा हिस्सा मी जगलोच नाहीच. ना जाणो कधीपासून माझ्याही नकळत, तो मी एका अशा स्त्रीच्या नावावर गहाण टाकला, जिला माझ्या या व्यवहाराची साधी पावतीसुद्धा माहीत नव्हती.
खरंतर एकतर्फी प्रेम ही काही प्रेमाची जात नाही. तो अक्षरशः एक मुर्खपणा आहे. सुरुवातीला तो सवय वाटतो, मग व्यसन होतो, आणि शेवटी तोच आपली ओळख बनून बसतो. एखाद्या जुन्या वाड्याच्या भिंतींवर शेवाळ जसं वर्षानुवर्षं वाढत राहतं, तसं तिचं नाव मनाच्या प्रत्येक कोपऱ्यावर नकळत पसरत गेलं. आणि आता वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर ते खरवडून काढण्याचा प्रयत्न म्हणजे माझ्यासाठी भिंतच उध्वस्त करण्यासारखा प्रकार ठरतो आहे.
काही लोक मोठ्या सहजपणे मला सांगतात की, "विसरून जा."
पण हे असं सांगणाऱ्यांना कधी हा प्रश्न पडत नाही की विसरण्यासाठी आधी आठवण वेगळी काढावी लागते. माझ्याकडे ती वेगळी काढण्याची सोयच उरलेली नाही. कारण ती एखादी घटना नव्हती. ती माझ्या जगण्याची पद्धत होती. माझ्या चालण्यात, माझ्या थांबण्यात, माझ्या शांततेत, पुस्तकांच्या कडेला काढलेल्या रेघांमध्ये, वहीच्या शेवटच्या पानावर लिहिलेल्या तिच्या नावामध्ये, जुन्या गाण्यांच्या ओळींत, पावसाच्या पहिल्या वासात, संध्याकाळच्या उदास प्रकाशात... सगळीकडे ती थोडीथोडी मिसळली आहे.
म्हणून मला हा प्रश्न नेहमीच सतावत राहतो की तिला विसरण्यासाठी मी नेमकं करावं तरी काय...?
घर बदलावं..? शहर बदलावं..? फोन नंबर बदलावेत..? की देव बदलावा..? पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट तशीच राहते, ती म्हणजे स्वतःपासून पळून जाण्याचा मार्ग अजून कोणत्याच भूगोलाने शोधलेला नाही.
वर्षानुवर्षं माणूस स्वतःलाच फसवत राहतो. "उद्या विसरेन", "पुढच्या वर्षी सगळं संपेल", "एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात आली की हे सगळं निघून जाईल." पण आठवणींना गणित कळत नाही. त्या कॅलेंडर पाळत नाहीत. त्या कोणत्याही क्षणी दार ठोठावतात. कधी एखाद्या जुन्या गाण्याच्या दोन ओळींतून, कधी रस्त्यावरून चालताना अचानक दिसलेल्या ओळखीच्या चालण्यातून, तर कधी कारण नसतानाही मध्यरात्रीच्या शांततेत.
मग लक्षात येतं, आपण तिच्यावर फक्त प्रेम करत नव्हतो, तर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर शक्यता तिच्या नावावर लिहून ठेवली होती. ती मिळाली नाही म्हणून दुःख झालं नाही, पण तिच्यानंतर दुसऱ्या कोणत्याही शक्यतेवर विश्वास ठेवण्याची ताकदच उरली नाही. कारण तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाची कल्पना या मनाने कधीच केली नाही.
काळ मोठा वैद्य आहे, असं म्हणणारे बहुधा जखमेवर कधी प्रेम करून बसले नसावेत. काळ औषध देत नाही, तो फक्त वेदना सहन करण्याची ताकद वाढवतो.
आता या वयात कधी कधी वाटतं, तिला विसरण्यासाठी मला माझ्या आयुष्याचाच अर्धा भाग पुसून टाकावा लागेल. माझं तारुण्य, माझी स्वप्नं, तिच्यापर्यंत कधीच न पोहोचलेली पण फक्त तिच्यासाठी मी लिहिलेली माझी पत्रं, न झालेले संवाद, माझ्या एकांताची कारणं, तिथं मनमुराद रडणं... हे सगळं जर मिटवलं, तर उरेल कोण.?
कदाचित म्हणूनच काही माणसं प्रेमातून बाहेर पडत नाहीत. ती प्रेमात राहतही नाहीत. ती फक्त त्या प्रेमाच्या दीर्घ सावलीत आयुष्यभर चालत राहतात. आणि बाहेरून पाहणाऱ्यांना वाटत राहतं, हा माणूस जगतो आहे. प्रत्यक्षात मात्र तो एका कधीही न घडलेल्या आयुष्याचं शोकगीत अगदी शांतपणे गुणगुणत असतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
बुधवार, २२ जुलै, २०२६
#१७७ ❤️🩹🫂
मंगळवार, २१ जुलै, २०२६
सोन्याचा पिंजरा... ❤️🩹🫂
हे असं आहे तर सगळं. आपण आपलं एकेक पाऊल टाकत चाललोय असं वाटतं, पण खरं तर आपण एकाच जागी गरगर गिरक्या घेतोय. ही जी चाकोरी म्हणतो आपण, ती काही आपण स्वतः तयार केलेली नसते. समाज नावाचा एक अवाढव्य, आळशी अजगर असतो. त्याने आखून दिलेली ही वाट असते. त्या वाटेवरून सरपटत गेलं की लोक टाळ्या वाजवतात. पण चुकून कधीतरी आतला माणूस जागा होतो. त्याला वाटतं, 'बस्स, आता स्वतःच्या भाषेत बोलावं.' तो चार शब्द लिहितो. ते शब्द कोणाला सुखावण्यासाठी नसतात, ती फक्त आतल्या अंधाऱ्या खोलीत साचलेली धूळ झटकण्याची धडपड असते.
पण इथे तर सगळाच बाजार मांडून बसलेत लोक. कोणाला तुमचं सत्य नको असतं, त्यांना फक्त त्यांच्या सोयीचं मनोरंजन हवं असतं. तुमच्या त्या दोन ओळींनी कोणाच्यातरी सोयीस्कर सुप्त जाणिवांना धक्का लागतो. मग सुरू होतो हा 'DM' नावाचा आधुनिक नरक. तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे शब्द इतके सडतात की त्यांची दुर्गंधी यायला लागते. समोरचा माणूस, ज्याचा तुमच्या जगण्याशी तीळमात्र संबंध नसतो, तो अचानक तुमच्या सात पिढ्यांचा हिशोब काढायला लागतो. तो तुमच्या कुळाचा उद्धार करतो, कारण त्याच्या स्वतःच्या कुळात वैचारिक दारिद्र्याशिवाय दुसरं काही उरलेलं नसतं.
या अशा झुंडशाहीला पाहून हसू येतं आणि कीवही वाटते. आपली भाषा, आपलं संस्कृतीचं अभिमानगीत हे सगळं या असल्या ट्रोल गँगच्या उथळपणात वाहून गेलंय. आपण लिहितो कारण आपल्याला जगायचं असतं. पण हे लोक वाचतात कारण त्यांना कोणालातरी मारायचं असतं. या असल्या अडाणी, हिंस्त्र गर्दीला घाबरून जर आपण आपली लेखणी बोथट केली, तर आपणही त्यांच्यातलेच एक होऊ. त्यामुळे हा कुळाचा उद्धार वगैरे सोडून द्यायचा. हे जग असंच आहे; इथे शहाण्याला वेड्यात काढल्याशिवाय लोकांचा भात शिजत नाही. आपण आपली चाकोरी मोडत राहायची, कारण ती मोडल्याशिवाय आतला कोंब बाहेर येत नाही.!🎭
#मनात_येईल_ते
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
Gen Z चे YZ आंदोलन - १
सध्या जंतरमंतरवर जे काही नाट्य सुरू आहे, ते डोळसपणे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की आंदोलन आणि अराजकता यातील पुसट रेषा आता पूर्णपणे पुसून टाकण्यात आली आहे. आपल्या देशात लोकशाहीने प्रत्येकाला निषेध करण्याचा, आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला आहे, यात तीळमात्र शंका नाही. उदाहरणार्थ जर रस्ता खराब आहे, म्हणजेच व्यवस्थेत काही त्रुटी आहेत, हे जर तुमचे गाऱ्हाणे असेल, तर त्यावर आवाज उठवणे गैर नाही. पण रस्ता खराब आहे म्हणून मी थेट विरुद्ध दिशेने गाडी चालवणार, सिग्नल तोडणार आणि अपघाताला निमंत्रण देणार, हा कसला शहाणपणा..? आज जंतरमंतरवर नेमकी हीच 'अतिशहाणी' मानसिकता उघडी पडत आहे. मूळ प्रश्नावरून लक्ष भरकटवून कायद्याला आणि व्यवस्थेलाच ओलीस धरण्याचा हा एक सुनियोजित खेळ आहे. जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांचे जगणे असह्य करता, तेव्हा तुम्ही हक्कांची भाषा बोलण्याचा नैतिक अधिकार गमावून बसता. उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम हे रस्ता चांगला असो वा वाईट, सुरक्षिततेसाठी असतात. तसेच लोकशाहीचे नियमही व्यवस्था टिकवण्यासाठी असतात. पण इथे तर 'आम्हाला हवे तेच होणार, नाहीतर आम्ही संपूर्ण वाहतूकच ठप्प करू' अशी उघड धमकी दिली जात आहे. हा निव्वळ हट्ट नाही, तर लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली हुकूमशाही आहे. आणि सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे, या अराजकतेला काही स्वयंघोषित बुद्धिवंत आणि माध्यमवीर 'क्रांती'चे लेबल लावून मोकळे होत आहेत. पण जनतेला वेड्यात काढण्याचा हा प्रयत्न फार काळ टिकत नसतो, हे या आंदोलकांनी आणि त्यांच्या पडद्यामागच्या सुत्रधारांनी लक्षात ठेवलेले बरे.!🎭
#मनात_येईल_ते
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
सोमवार, २० जुलै, २०२६
Gen Z चे YZ आंदोलन...
आज जंतरमंतर आणि संसद भवनाच्या परिसरात Gen Z आंदोलनाच्या नावाखाली जो काही तमाशा झाला, त्याला निव्वळ आणि निव्वळ पोरखेळच म्हणावा लागेल. खरं सांगायचं तर, हा लोकशाहीचा किंवा अधिकारांचा लढा नाही, तर ही सरळ सरळ वैचारिक दिवाळखोरी आणि उथळपणाचे प्रदर्शन आहे. आजकालच्या या नव्या पिढीला इतिहास माहिती नाही आणि वर्तमानाचे भान नाही. केवळ सोशल मीडियावर चार लाईक्स मिळवण्यासाठी आणि काही Reels बनवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च कायदा बनवणाऱ्या संस्थेच्या दारात जाऊन स्टंटबाजी करायची, हाच या आंदोलकांचा एकमेव अजेंडा दिसतोय.
कुठल्याही आंदोलनाला एक नैतिक अधिष्ठान असावं लागतं, एक ठोस वैचारिक बैठक असावी लागते. पण इथे काय दिसतंय..? कसलाही अभ्यास नाही, मागण्यांमध्ये कोणतीही स्पष्टता नाही, फक्त गोंधळ घालणे आणि स्वतःला मोठे 'क्रांतिकारक' म्हणून प्रस्थापित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. याला आंदोलनाच्या नावाखाली चाललेली 'वायझेडगिरी' नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं..? संसद भवन ही काय तुमच्या कॉलेजची कँटीन किंवा पिकनिक स्पॉट आहे का, जिथे जाऊन तुम्ही कसलेही नियम न पाळता हुल्लडबाजी करणार..?
मुख्य प्रवाहातील काही माध्यमं आणि स्वतःला विचारवंत म्हणवणारे काही पांढरपेशा लोक या उथळपणाचे 'युवा क्रांती' म्हणून कौतुक करायला लगेच पुढे सरसावतात, ही तर याहून मोठी शोकांतिका आहे. पण सामान्य जनतेला डोळे आहेत आणि त्यांना यामागचा फोलपणा स्पष्ट दिसतोय. लोकशाहीने प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार दिला आहे, पण त्या अधिकाराचा वापर जेव्हा निव्वळ स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेची थट्टा उडवण्यासाठी केला जातो, तेव्हा त्याला अराजकता म्हणतात. आज जंतरमंतरवर जे घडलं, ते देशाच्या सुजाण नागरिकाला अस्वस्थ करणारं आहे. या तथाकथित आंदोलकांनी आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सूत्रधारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, स्टंटबाजीने हेडलाईन्स मिळवता येतात, पण इतिहास घडवता येत नाही. हा निव्वळ पोरकटपणा असून, अशाने देशाचे किंवा या पिढीचे कोणतेही भले होणार नाही, हेच आजच्या या संपूर्ण प्रकरणाचे ढळढळीत सत्य आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
रविवार, १९ जुलै, २०२६
#१७८ ❤️🩹🫂
पावसाचा असा एक मंद, सलग आणि निरुपद्रवी सूर लागतो तेव्हा रात्रीच्या अंधाराला एका वेगळ्याच संथपणाची लय येते. जसा एखादा म्हातारा रेडिओ बारीक आवाजात लावून घरातल्या अंधाऱ्या कोपऱ्यात, भिंतीच्या एखाद्या जुन्या खुंटीला अडकवून ठेवावा आणि त्यातून जुनी, काहीशी विसरलेली पण मनात घर करून राहिलेली गाणी पाझरत राहावीत, अगदी तसाच हा पाऊस गेल्या काही रात्रींपासून अखंड, रात्रभर पडतो आहे. तो कुठेही आदळत नाही, पत्र्यावर त्याचा अवाजवी धिंगाणा नाही की खिडक्यांच्या काचांवर तो उगीचच थपडा मारत नाही. तो फक्त चालत राहतो, एका अत्यंत सुजाण आणि सोशिक प्रवाशासारखा.
जगण्याचा एक आंतरिक, मूक एकाकीपणा ओढून या पावसाने रात्रीच्या या प्रहराला वेढून टाकलं आहे. बिछान्यावर पडून राहिल्यावर डोळे मिटले तरी बाहेर पडणाऱ्या पाण्याचे थेंब आणि मातीचा तो ओलसर, कुबट पण हवाहवासा वाटणारा गंध थेट मेंदूच्या गाभाऱ्यात उतरत जातो. भिंतीवरचे पापुद्रे निघालेले जुने रंग, कोपऱ्यात पडलेली पुस्तकांची अस्ताव्यस्त थप्पी आणि अर्धवट उघड्या खिडकीतून येणारी थंड, ओलसर झुळूक. या सगळ्या गोष्टी एकाएकी जिवंत होतात. जणू काही या खोलीला, या वस्तूंना आणि मलासुद्धा या पावसाने आपल्या संथ लयीत बांधून घेतलं आहे. अशा वेळी भूतकाळातल्या काही विस्कळीत आठवणी उगीचच डोकावून जातात, जशा जुन्या अंबाडीच्या गोणपाटातून सुतळीचे दोरे बाहेर यावेत. काही माणसं आठवतात, जी कधीकाळी खूप जवळची होती आणि आता फक्त डायरीच्या पानांवर किंवा जुन्या फोटोंच्या कोपऱ्यात धुळीसारखी साचून राहिली आहेत. पण या आठवणींमध्ये कोणताही थयथयाट नाही, ना कुठला पश्चात्ताप. आहे तो फक्त एक शांत, सुन्न करून टाकणारा स्वीकार.
हा पाऊस म्हणजे कुठलीतरी निसर्गाची भव्य घटना नाही, तर तो आपल्याच आतल्या एकाकीपणाचा आरसा आहे. तो रात्रभर पडत राहतो कारण त्यालाही माहीत असतं की, दिवसाच्या उजेडात माणसांनी पांघरलेले मुखवटे गळून पडायला हीच एक वेळ योग्य असते. रेडिओवरचं ते गाणं जसं खोलीच्या वातावरणात नकळत मिसळून जातं, तसाच हा पाऊस माझ्या रक्तात, माझ्या विचारांत आणि माझ्या या अस्वस्थ मनस्थितीत संथपणे मिसळत चालला आहे. बाहेर अंधार अधिकच गडद होत जातो, आणि पाऊस अधिकच आपला वाटू लागतो. जसा एखादा जुना, निष्कांचन मित्र रात्रीच्या वेळी न सांगता घरात यावा, आणि कोपऱ्यात शांतपणे बसून राहावा, अगदी तसाच.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
#१७९ ❤️🩹🫂
क्षणभर वाटलं होतं की सुटलो. आज सकाळी सकाळी जेव्हा तिच्याशी जोडलेली ती शेवटची वस्तू, ती शेवटची खूण मी घरातून हद्दपार केली, तेव्हा एकाएकी मोकळं वाटलं. छातीवरचं एक वर्षानुवर्षांचं ओझं उतरल्यासारखं झालं. आपण आता भूतकाळाच्या या जुन्या, गंजलेल्या जोखडातून कायमचे मुक्त झालो, असा एक भाबडा, सुटकेचा सुस्कारा मी सोडला होता. पण हा फक्त एक आभास होता.
माणूस वस्तू बदलू शकतो, जागा बदलू शकतो, अगदी स्वतःचं जगणंही वरवर बदलू शकतो. पण स्मृतींची गणितं एवढी सोपी नसतात. जसजसा दिवस मावळतीला गेला आणि तिन्हीसांजेची ती उदास, राखाडी सावली माझ्या घराच्या उंबरठ्याशी येऊन थबकली, तशी आतली शांतता अधिकच गडद झाली. त्या अंधुक प्रकाशात, कसं काय कुणास ठाऊक, पण तिची आठवण पुन्हा एकदा मनात रुंजी घालू लागली. अगदी नकळत, एखाद्या भुतासारखी ती समोर येऊन उभी राहिली.
मी कासावीस झालो. डोक्यात एकच चक्र सुरू होतं, असं कसं घडू शकतं.? मी तर तिच्याशी संबंधित प्रत्येक धागा कापून टाकला होता. तिच्या खाणाखुणा, तिचे शब्द, तिचे स्पर्श... सगळं काही मी कायमस्वरूपी बुजवून टाकलं होतं. मग हा अचानक आलेला आठवणींचा पूर कुठून आला.? या अस्वस्थतेने ग्रासून मी एखाद्या पिंजऱ्यातल्या वाघासारखा घरभर, या खोलीतून त्या खोलीत चकरा मारत होतो. पाय अस्वस्थ होते, मन व्याकूळ होतं.
आणि अचानक, माझे पाऊल आरशासमोर अडखळले.
मी थबकलो. आरशात पाहिलं. समोर एक चेहरा होता. थकलेला, हरवलेला, डोळ्यांत जुनीच व्याकुळता साठवलेला, माझा स्वतःचा चेहरा. आणि त्याच क्षणी विजेसारखा एक विचार डोक्यात चमकून गेला.
मी ज्या आठवणींना घरातून, वस्तूंमधून बाहेर काढत होतो, ती मूळ आठवण तर इथे समोर उभी होती. हा आरशात दिसणारा माणूस, तिने बदललेला, तिच्या जगण्याशी जोडलेला माणूस... हीच तर तिची सगळ्यात मोठी खूण आहे. मी माझ्या मनाच्या स्वप्नातील जगातून तिचं अस्तित्व पुसलं, पण स्वतःमध्ये साठलेलं तिचं असणं कसं पुसणार.? आरशातली ही आठवण तर अजूनही आहे तशीच जिवंत आहे. आता या स्वतःला, या आरशातल्या माणसाला कसं आणि कुठे कायमस्वरूपी बुजवून टाकायचं.? हा प्रश्न आता अनुत्तरित आहे, आणि या विचाराने व्याकूळ होऊन गेलेली संध्याकाळ जाताना आणखीन अधिकच गडद अशी रात्र माझ्या सोबतीला सोडून गेलेली आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
#१८० ❤️🩹🫂
तुमच्या माझ्या मनातलं... ❤️🩹🫂
माझा हा ब्लॉग, इथं मांडले जाणारे विचार कदाचित प्रत्येकाला आवडतीलच असं नाही. कारण इथं गाजावाजा नाही, दिखावा नाही, तर आयुष्याच्या जखमांवरून अलगद फिरणारा शब्दांचा एक प्रेमळ हात आहे. इथली प्रत्येक ओळ ही कुणीतरी जगलेल्या, भोगलेल्या क्षणातून जन्माला आली आहे. इथल्या या शब्दांत तुम्हाला प्रामुख्याने प्रेम, विरह आठवणी, नियतीचे अजब खेळ आणि माणसांच्या कायमच्या निघून जाण्याची वेदना हेच विषय दिसून येतील. बहुतेक म्हणूनच ते फक्त लिहायचं म्हणून लिहिलेले कमी आणि प्रत्यक्षात जगलेले असे जास्त वाटतात. आणि म्हणूनच नकळतपणे तुम्हाला स्वतःशी, स्वतःच्या आयुष्याशी संवाद साधायला भाग पाडतात.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
शनिवार, १८ जुलै, २०२६
#१८१ ❤️🩹🫂
बघ, शेवटी मी सुद्धा तुझ्यासारखाच झालोय. तुझी आठवण येणं आता पूर्णपणे बंद झालंय. हातातला चहाचा कप तसाच रिकामा पडलेला असतो, पण त्यात आता तुझा चेहरा तरंगताना नाही. दिवसामागून दिवस चाललेत, कॅलेंडरची पानं उलटतायत, आणि मी अगदी निर्विकारपणे या सगळ्याकडे पाहतोय. आपण ज्याला जगणं म्हणतो, ते खरंतर अशाच एकामागून एक येणाऱ्या सवयींच्या थपडा खात चालणं असतं. आणि माणसाचं मन म्हणजे काय हो..? शेवटी एक जुनाट, गंजलेलं यंत्रच ना.! सुरुवातीला खटखट करतं, नंतर त्याचाही आवाज सवयीचा होतो. तुझ्या नसण्याची जी काही रखरख होती, ती आता या मातीच्या रंगात आणि रोजच्या जगण्याच्या धुरळ्यात कुठेतरी विरघळून गेलीये, हे मात्र खरं.
नदी वाहत राहते आणि मागे फक्त वाळूचे ढीग सोडून जाते, तसंच काहीसं झालंय. आता तुझा फोन आला नाही, तरी छातीत तो जुना धस्स होणारा आवाज होत नाही. रस्त्यावरून चालताना तुझ्या आवडीचं गाणं कुठल्यातरी दुकानात वाजत असतं, पण माझे पाय तिथे आता रेंगाळत राहत नाहीत. मी पुढे निघून जातो. थेट व्यावहारिक आणि कोरडा होऊन. हा कोरडेपणा मी तुझ्याकडूनच शिकलो की काळानं मला जबरदस्तीनं शिकवला, कुणास ठाऊक.!? पण आता या शांततेची भीती वाटत नाही, उलट तिची सवय झालीये. माणूस जेव्हा स्वतःच्याच आठवणींच्या मलब्यातून बाहेर पडतो, तेव्हा तो असाच निबर बनतो.
तुला वाटत असेल की मला तुझा राग येतोय, पण तसंही काही नाही. राग यायलाही मनात काहीतरी ओल शिल्लक असावी लागते. इथे तर सगळंच वाळवंट झालंय. जुन्या पत्रांचे कपटे किंवा आपल्या मेसेजेचे स्क्रीनशॉट्स आता मोबाईलच्या कोणत्यातरी कोपऱ्यात पडून असतील, पण ते उघडून पाहण्याची ऊर्मी संपलीये. आपण दोघंही आपापल्या जगात एवढे गुंतलोय की आता एकमेकांचा पत्ता शोधण्याची गरजच उरलेली नाही. हे जे काही घडलंय, ते अत्यंत स्वाभाविक आहे. यात कोणताही आव नाही, कोणताही आव आणलेला संताप नाही. फक्त एक संथ, संथ चाललेला आयुष्याचा गाडा आहे, जो आता तुझ्याशिवायही तितक्याच गतीनं पुढे सरकतोय. मीही आता तुझ्यासारखाच झालोय गं... एकदम शांत, व्यवहारी आणि तितकाच तुटलेला.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
#१८२ ❤️🩹🫂
माणूस म्हणून जगताना एक गोष्ट फार उशिरा कळते, ती म्हणजे आपल्या आवडीनिवडीला या जगण्याच्या बाजारात कवडीचीही किंमत नसते. आपण आपल्या मनात सुबक, देखणे नकाशे आखून ठेवतो, पण आयुष्य आपल्याला अशा एका अनोळखी गल्लीत आणून सोडतं, जिचा रस्ता आपण कधी स्वप्नातही शोधला नसतो. आपली इच्छा असो वा नसो, हे जग आपल्या हातावर अशा विषयांचे जाडजूड ग्रंथ आणून ठेवतं, ज्यांची नावं वाचायलाही आपल्याला कंटाळा आलेला असतो. मग सुरू होतो एक सक्तीचा प्रवास. ज्या गोष्टींचा आपल्याला मनापासून वीट आलाय, त्याच गोष्टींच्या गराड्यात आपल्याला दिवस-रात्र काढावी लागते. हा कुठला खेळ आहे कुणास ठाऊक.? ज्या माणसांचा चेहरा पाहावासा वाटत नाही, त्यांच्याच स्वभावाचे बारकावे अभ्यासावे लागतात. ज्या सिच्युएशन्स चालढकल करून टाळायच्या असतात, नेमक्या त्याच संकटांच्या गाभ्यात शिरून आपल्याला उभे राहावे लागते.
हा सगळा प्रकार म्हणजे एका नावडत्या विषयात जबरदस्तीने ढकललेल्या 'पीएचडी'सारखाच आहे. इथे कोणतीही गाईडलाईन नसते, परीक्षा घेणारा कुणी नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संशोधनाला कोणताही शेवट नसतो. रोज सकाळी उठून आपण त्याच कंटाळवाण्या, निरर्थक वाटणाऱ्या प्रकरणांची पानं उलटत राहतो. मनात एक वेगळीच घुसमट असते. डोक्यावर अदृश्य ओझं घेऊन चालताना पाय थकून जातात, पण थांबण्याची सोय नसते. आजूबाजूची माणसं आपलं हे 'संशोधन' पाहून कौतुक करतात, त्यांना वाटतं आपण खूप मोठे काहीतरी मिळवतोय, पण आतल्या आत जे काही हरवत चाललंय, त्याची नोंद कोणत्या प्रबंधात होणार.? आपण ज्या सिस्टीमचा तिरस्कार करतो, त्याच सिस्टीमचे आपण कधी मूक भाग बनून जातो, हे आपले आपल्यालाच कळत नाही.
पण या सगळ्या उद्वेगात आणि उपरोधात एक वेगळेच सत्य दडलेले असते. या नावडत्या विषयांचा सखोल अभ्यास करता करता, माणसाला स्वतःचा एक नवा चेहरा गवसतो. जगण्यातला फोलपणा जितक्या जवळून पाहावा, तितकीच आतली जाणीव अधिक प्रगल्भ होत जाते. हे आयुष्य आपल्याला जाणीवपूर्वक त्या चिखलात उतरवतं, जेणेकरून आपल्याला कमळाची किंमत कळावी. ही सक्तीची पीएचडी करत असतानाच, माणसाला खऱ्या अर्थाने 'जगणे' समजायला लागते. हा प्रवास वेदनादायी नक्कीच आहे, पण तोच तुम्हाला निबर बनवतो. या प्रक्रियेत तुमच्यातला जुना, हळवा माणूस मागे पडतो आणि एक असा माणूस जन्माला येतो, ज्याला आता जगातील कोणत्याही वादळाची भीती उरत नाही. हाच या अनपेक्षित अभ्यासाचा खरा पदवीप्रदान सोहळा असतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
शुक्रवार, १७ जुलै, २०२६
#१८३ ❤️🩹🫂
दिवसभर मी माझ्या स्वतःच्याच एका सुबक, देखण्या स्वप्नांच्या दुनियेत जगत असतो. तिथं मला कशाचीच कमतरता भासत नाही. खरं तर मी शरीराने फक्त कामाच्या ठिकाणी वावरत असतो, पण माझं मन मात्र कधीच उंबरा ओलांडून माझ्या त्या घरात जाऊन बसलेलं असतं. तिथं माझी बायको भाजी चिरता चिरता किंवा देवापाशी दिवा लावता लावता अगदी आतुरतेने माझ्या पावलांची चाहूल घेत असते. माझे शिवनंदन आणि शिवनंदिनी... ती दोघं 'बाबा आले, बाबा आले' करत अंगावर येण्यासाठी दाराकडे डोळे लावून बसलेली असतात. त्यांच्या त्या किलकिल्या हसण्यात आणि निरागस ओरडण्यात माझ्या अख्ख्या जन्माचा शिणवटा एका सेकंदात विरघळून जाईल, अशी माझी समजूत असते. हे चित्र माझ्या डोक्यात इतकं जिवंत असतं की, रोज संध्याकाळी तिथं पोहोचण्यासाठी माझी जी घालमेल होते, ती शब्दांत सांगता येण्यासारखी नाही. सगळी कामं वेळेवर आटोपून मी बस पकडण्यासाठी पळतो. ती नेहमीची एसटी बस चुकली, तर मग मिळेल त्या वाहनाला हात दाखवून, लटकून, कसाबसा लवकरात लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करतो. त्या धावपळीला, त्या श्वास टाकण्याला एक जगण्याचा अर्थ असतो.
एसटीच्या खिडकीतून बाहेर बघताना भोवतालचे रस्ते, माणसं, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि सहप्रवाशांचा तो घामट वास... हे सगळं माझ्या त्या स्वप्नाळू जगापुढे पार फिकं पडलेलं असतं. डोक्यात फक्त एकच वेळ असते.... ती म्हणजे सात ते सव्वा सातची. जेव्हा माझे पाय माझ्या अंगणात पडतात, तेव्हा माझं मन एका सुटकेच्या, तृप्त भावनेने भरून आलेलं असतं. आता घराचं कवाड उघडेल, आता पोरांचा गलका ऐकू येईल, आता घरातला तो उबदारपणा मला कवेत घेईल, असंच मला वाटत असतं.
पण नेमका त्याच क्षणी, डोळ्यांसमोर तो लोखंडाचा थंडगार, निर्जीव तुकडा उभा ठाकतो. ते माझ्या घराच्या दाराला टांगलेलं भलं मोठं कुलूप.! ते नुसतं कुलूप नसतं, तर वास्तवाचा एक क्रूर पहारेकरी असतो. तो रोज संध्याकाळी माझ्या छातीवर पाय देऊन मला ओरडून सांगतो, "माणसा, भानावर ये. हे जे तू दिवसभर जगत होतास, तो म्हणजे तू विणलेला निव्वळ एक आभास होता." त्या कुलुपाच्या गर्द काळपट रंगात आणि त्याच्या जडपणात एका क्षणात माझं ते गोड स्वप्न उधळून जातं. मी अगदी तात्पुरता, निदान काही तासांकरिता तरी, पुन्हा भानावर येतो. माझ्या आनंदाचा तो खेळ आता तिथंच संपलेला असतो.
त्या कुलुपाला स्पर्श करताना हाताला लागणारा तो धातूचा थंडपणा थेट माझ्या काळजाला चिरत जातो. अगदी जड अंतःकरणानं, खांदे पाडून मी ती चावी फिरवतो. त्या चावीचा होणारा 'कर्कश' आवाज म्हणजे माझ्या त्या सुंदर स्वप्नाचा मरण पावलेला हुंदका असतो. मी ते कुलूप काढतो आणि त्या रिकाम्या, अंधाऱ्या घरात प्रवेश करतो. घरातला तो कोंदट वास आणि पसरलेली भयानक शांतता पुन्हा एकदा माझ्या छातीवर येऊन बसते. दिवसभर ज्या शिवनंदन आणि शिवनंदिनीला मी मनात कडेवर घेऊन फिरत होतो, ती केवळ हवेत विरून गेलेली नावं ठरतात. मी स्वतःच्याच हाताने स्वतःचा भ्रमनिरास करून घेतो आणि त्या रिकाम्या चौकटीत मुकाट्याने प्रवेश करतो. आता पुढचे काही तास हेच जळजळीत वास्तव सहन करायचं, रात्रीच्या अंधारात डोळे मिटून पुन्हा एकदा त्या स्वप्नाचे विखुरलेले तुकडे जोडायचे आणि उद्या सकाळी पुन्हा त्याच आभासाच्या पाठीमागे धावण्यासाठी स्वतःला पुन्हा तयार करायचं. आयुष्य म्हणजे दुसरं काय असतं.? एका कुलुपापासून सुरू होऊन दुसऱ्या कुलुपापाशी संपणारा एक वर्तुळाकार, एकाकी प्रवास...!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
गुरुवार, १६ जुलै, २०२६
धडपड...❤️🩹🫂
मंगळवार, १४ जुलै, २०२६
#१८४ ❤️🩹🫂
घर विकणे म्हणजे केवळ विटा, सिमेंट आणि लाकूड यांचा व्यवहार नसतो. काही घरांच्या भिंतींमध्ये वर्षानुवर्षे साठलेल्या आठवणी असतात, आणि काही उंबरठ्यांवर आयुष्यभराची पावले रेंगाळलेली असतात. त्याला पैशांची तशी काहीच अडचण नव्हती. कारण पैसा तर भरपूर प्रमाणात होताच. पण आता त्याला त्या जुन्या आठवणींतून कायमचं बाहेर पडायचं होतं. ते शक्य होतं की नव्हतं हे त्याला ठाऊक नव्हतं, पण त्याला निदान तसा प्रयत्न तरी करून पहायचा होता. त्या दिवशी त्याने दलालाच्या हातात कागद दिले, तेव्हा बाहेरून तो पूर्णपणे शांत दिसत होता. मात्र आतून त्याचे संपूर्ण बालपण प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत उभे होते.
हे तेच घर होते—
जिथे त्याने पहिल्यांदा धावायचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्याने गुडघे फोडून घेतले होते. जिथे आईच्या हाकेत संध्याकाळ उतरायची, आणि बाबांच्या पावलांच्या आवाजात घराला सुरक्षिततेची चाहूल लागायची. जिथे पावसाच्या पहिल्या सरींचा सुगंध मातीपेक्षा आधी मनात दरवळायचा. आणि... जिथे समोरच्या घराच्या गॅलरीत उभ्या असलेल्या त्या एका चेहऱ्याने, प्रेमाचा अर्थ अजून शब्दांतही न समजणाऱ्या एका मुलाच्या हृदयात आयुष्यभरासाठी एक न बोललेली कथा लिहून ठेवली होती. त्याचं ते प्रेम कधी व्यक्त झालं नव्हतं. कधी हातात हात आला नव्हता. कधी वचनं दिली गेली नव्हती. तरीही त्या गल्लीतून जाताना त्याचं हृदय नकळत धडधडायचं. त्या खिडकीकडे पाहण्याची त्याची सवय वर्षानुवर्षे तशीच राहिली होती. काळाने त्या गल्लीतले चेहरे बदलले... दारांवरची नावं बदलली... झाडं मोठी झाली... रस्त्यांवर नवीन डांबर चढलं... पण त्याच्या मनातलं ते घर मात्र अजूनही तसंच होतं... एका लहान मुलाच्या निष्पाप स्वप्नांनी भरलेलं. आज त्या घराला कुलूप लावताना त्याने शेवटचं प्रत्येक खोलीकडे पाहिलं. भिंती काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या शांततेत हजारो आठवणींचा हुंदका दडलेला होता. उंबरठा ओलांडताना त्याला क्षणभर वाटलं, जणू हे घर त्याला थांबवून म्हणत आहे, "तू मला विकू शकतोस... पण माझ्यात जगलेलं तुझं आयुष्य कुठे विकणार आहेस?" त्याने हळूच मागे वळून पाहिले. दार बंद झाले. कुलूप लागले. व्यवहार पूर्ण झाला होता. पण त्या क्षणी विकलं गेलं ते घर नव्हतं... विकला गेला होता त्याच्या आयुष्याचा तो निरागस ऋतू, ज्यात प्रेमाला नाव नव्हतं, आठवणींना किंमत नव्हती, आणि प्रत्येक संध्याकाळ उद्याच्या आशेवर जगत होती. त्याच्या त्या स्वप्नातल्या छोट्याशा गल्लीत आता त्याचं असं काहीच उरलं नव्हतं...
पण त्याला सतत एक छोटासा मुलगा धावत गेल्याचा भास होत होता.. धावत असताना त्या मुलाची नजर त्या खिडकीकडे स्थिरावली होती, आणि बहुतेक त्याला अजूनही वाटत होते की, "काही घरे सोडून जाता येतात, पण काही घरे आयुष्यभर आपल्याला सोडत नाहीत.!" 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
सोमवार, १३ जुलै, २०२६
अल्गोरिदम वगैरे... ❤️🩹🫂
हल्ली माझ्या X च्या TLमध्ये अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे की, निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यापूर्वीच सर्व पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. मी मात्र अजूनही माझ्या त्याच जुन्या पक्षाचा साधासुधा कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहतो. परंतु माझ्या TLमध्ये सर्वपक्षीय महाआघाडी स्थापन झाल्याचे स्पष्टपणे दिसते.
या "अल्गोरिदम" नावाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडून बहुधा माझे मतदार ओळखपत्र तपासायचे राहून गेले असावे. कारण मी कोणाला फॉलो करतो, कोणाचे लेखन आवडीने वाचतो, याच्याशी त्याचा काहीही संबंध उरलेला दिसत नाही. उलट, ज्यांना मी प्रत्यक्ष आयुष्यात कधी नमस्कारही केलेला नाही, त्यांनाच तो रोज पहिल्या रांगेत बसवतो.
पूर्वी माझा TL म्हणजे माझा मतदारसंघच वाटायचा. ओळखीचे चेहरे, विश्वासार्ह माणसे, आपले खासदार, आपले आमदार, आपले कार्यकर्ते… सगळे अगदी सुरळीत. पण आता मात्र सकाळी TL उघडला की असे वाटते, रातोरात सीमाविस्तार झाला असून माझ्या मतदारसंघात पंधरा नवीन पक्षांनी उमेदवार उतरवले आहेत.
एखाद्या पोस्टखाली गेल्यावरही तोच प्रकार दिसतो. दोन माणसे संवाद साधत असतात आणि अचानक पन्नास जणांचा मोर्चा येतो. कोणाचे निवेदन, कोणाची पत्रकार परिषद, कोणाचा निषेध, कोणाचे अभिनंदन… इतका कार्यक्रम असतो की, मध्येच मला स्वतःचीच पोस्ट शोधण्यासाठी शोधमोहीम राबवावी लागते.
या सगळ्यात सर्वाधिक सहानुभूती वाटते ती माझ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची. बिचारे रोज भेटायला येतात. पण अल्गोरिदमच्या सुरक्षा रक्षकांनी बहुधा त्यांना मागच्या गेटवरच अडवलेले असते. आणि बाहेरून आलेल्या प्रत्येकाला मात्र "व्हीआयपी" पास देऊन थेट मुख्य मंचावर बसवले जाते.
माझ्या TLचे मंत्रिमंडळ तर रोज बदलते. सकाळी एक मुख्यमंत्री, दुपारी दुसरा, संध्याकाळी तिसरा. रात्री झोपण्यापूर्वी वाटते, "चला, आता स्थिर सरकार आले." पण सकाळी उठेपर्यंत पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू झालेली असते!
कधी कधी तर असा संशय येतो की माझा मोबाईल चार्जरला लावला आहे की नाही, यापेक्षा "आज कोणता पक्ष माझ्या TLवर सत्ता स्थापन करणार?" हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे.
तरी माझ्या सर्व एकनिष्ठ खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना एवढेच सांगायचे आहे.., कृपया गैरसमज करून घेऊ नका. हा पक्षांतराचा प्रकार नाही. हा पूर्णपणे अल्गोरिदम-प्रायोजित राजकीय प्रयोग आहे. माझी निष्ठा अजूनही तिथेच आहे. फक्त माझ्या TLच्या सीमाशुल्क विभागाने बाहेरच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश दिला आहे.
तुम्ही अधूनमधून रिप्लाय करा, एखादा हलकासा विनोद करा, एखादा "जिवंत आहेस ना..?" असा मिश्किल उल्लेख करा. कारण आजकाल "सोशल मीडियावर मैत्री टिकवण्यासाठी विचारसरणीपेक्षा नोटिफिकेशन अधिक महत्त्वाचे झाले आहे..!"
बाकी अल्गोरिदमचे काय… तो आज विरोधी पक्षनेत्याला सत्तेत बसवेल, उद्या सत्ताधाऱ्यांना विरोधी बाकावर पाठवेल. त्याचे राजकारण त्यालाच लखलाभ. आपण मात्र आपली मैत्रीची आघाडी कायम ठेवूया. कारण ती ना निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे, ना तिच्यावर अविश्वास ठराव लागू होतो.
आणि शेवटी एकच…
"माझ्या TLमध्ये कोणाचं सरकार आहे, यापेक्षा माझ्या मनात कोणाचं बहुमत आहे, हे अजूनही बदललेलं नाही!" 🎭
जय हिंद... जय महाराष्ट्र... जय X
(टीप :- हे X वेगळं.. अन् ती X वेगळी..! 😂)
#आयुष्य_वगैरे ❤️🫂
#१८५ ❤️🩹🫂
शनिवार, ११ जुलै, २०२६
#१८६ ❤️🩹🫂
माणूस आयुष्यभर नियतीला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नियती कधीच स्पर्धेत उतरलेली नसते. ती केवळ शांतपणे आपले विणकाम करत राहते. आपण ज्याला योगायोग म्हणतो, त्यालाच ती आपल्या भाषेत ‘क्रम’ म्हणत असावी. म्हणूनच काही भेटी घडतात, तर काही न भेटी न होताही आयुष्यभर सोबत राहतात.
कधी कधी असे वाटते, देवाने माणसाला हृदय देताना एक सूक्ष्म चूक केली असावी. त्याने विसरण्याची शक्ती दिली, मात्र काही आठवणी विसरता येणार नाहीत, अशीही व्यवस्था करून ठेवली. म्हणूनच काही माणसे आयुष्यातून निघून जातात, पण मनातून त्यांचा निरोप कधीच होत नाही. आमची कहाणीही बहुधा अशीच होती.
एकाच गल्लीत वाढलेले दोन जीव... एकाच वर्गात काही वर्षे शिकलेले... एकाच रस्त्यावरून वर्षानुवर्षे एकमेकांना ओलांडून गेलेले... तरीही अनोळखी. नियतीने बहुधा तेव्हा आमच्या ओळखीची वेळच लिहिली नव्हती. काही नाती वेळेआधी जन्माला आली, तर ती टिकत नाहीत. आणि वेळ निघून गेल्यावर जन्माला आली, तर ती पूर्ण होत नाहीत. आमच्या वाट्याला यातील दुसरे सत्य आले.
तिला माझ्या मनातील अबोल प्रेम नेमके कधी उमगले, हे माझ्यासाठी आजही एक गूढच आहे. मी तर कधी शब्दांत ते तिच्यापाशी व्यक्त केलेच नव्हते. पण काही भावना अशा असतात की त्या डोळ्यांतूनच स्वतःचा परिचय करून देतात. कदाचित तिने माझ्या मौनातील ती हाक ऐकली असावी. म्हणूनच तिने मला तिच्या मनाच्या एखाद्या शांत कोपऱ्यात स्थान दिले होते आणि माझे ते अबोल प्रेम इतकी वर्षे जपून ठेवले होते.
जेव्हा आयुष्याने माझ्याभोवती दुःखाचे एवढे मोठे वादळ उभे केले, की माझा जगण्यावरच विश्वास उरला नव्हता. तेव्हा नेमकं त्याच वेळी ती आली. तिच्या हातात चमत्कार नव्हता, पण मायेचा स्पर्श होता. शब्दांत उपाय नव्हते, पण सोबत होती. काही माणसे आपल्या दुःखावर औषध लावत नाहीत; ती फक्त आपल्या शेजारी बसतात. आणि तेवढ्यानेही अर्धे दुःख विरघळून जाते.
त्या दिवसांत त्या फक्त एका मोबाईलच्या रूपाने का होईना, पण मी अक्षरशः तिच्या घरचा माणूस झालो होतो. तिची चिमुकली लेक... तिच्या निष्पाप हसण्यात मला आयुष्याचा हरवलेला अर्थ सापडायचा. मी त्या चिमुकल्या जीवासाठी पुर्णपणे अनोळखी असा होतो. पण त्या लेकराला काय माहीत, की तिच्या एका हाकेने, तिच्या दिसण्याने, तिच्या असण्याने एखाद्याच्या जगण्याला कारण मिळत होते.
बाकी विलक्षण गोष्ट एवढीच की, मनाने इतके जवळ असूनही आम्ही कधी जवळ आलोच नाही. आमच्या नात्याला स्पर्शाची गरजच पडली नाही. ते नातं नजरेतून जगलं, विश्वासातून फुललं आणि मौनातून टिकून राहिलं.
त्यानंतर आमची ती एकमेव भेट... एका मंदिरात.
त्या दिवशी देवाच्या साक्षीने आम्ही दोघे उभे होतो. पण देवापेक्षा मोठी मर्यादा आमच्यामध्ये उभी होती. मी तिच्या मागे चालत होतो. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नव्हे, तर माझ्या प्रेमाला त्याची मर्यादा विसरू न देण्यासाठी. त्या दिवशी देवाचे दर्शन झाले की नाही, हे तर मला आजही आठवत नाही. पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीने मात्र आयुष्यभरासाठी मनात एक शिलालेख कोरून ठेवला आहे, हे मात्र खरं.
मग एक दिवस आम्ही दोघांनीही निर्णय घेतला. या निनावी नात्याला आता निरोप द्यायचा. काही नात्यांना तोडण्यासाठी भांडण लागत नाही, समजूतदारपणा ही पुरेसा असतो. आम्ही एकमेकांना गमावले नाही, आम्ही एकमेकांना मुक्त केले.
ती तिच्या आयुष्यात परत गेली. मी माझ्या एकांतात. आणि आता सगळे संपले आहे, असे वाटत असतानाच नियती पुन्हा हसली.
माझ्या पुतणीचा जन्म झाला. आणि माझ्या वहिनीने तिच्यासाठी निवडलेले, तिचे ठेवलेले नाव ऐकताच, माझ्या काळजात जपून ठेवलेले एक बंद दार पुन्हा हळूच उघडले. तोच उच्चार... तेच नाव... तीच वेदना... आणि तेच न अबोल प्रेम.!
कित्ती विचित्र असते ना..? एखादे नाव इतरांसाठी केवळ ओळख असते, पण कुणा एखाद्यासाठी ते संपूर्ण आयुष्याचा इतिहास असते. त्या नावात माझी हरवलेली स्वप्ने आहेत, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत, आणि स्वीकारलेल्या विरहाची शांत सावली आहे.
आता मला तिची खबर घ्यावीशीही वाटत नाही. तिच्या संसारात डोकावण्याची इच्छाही उरलेली नाही. कारण प्रेमाचा शेवट मिळवण्यात नसतो, तो मनापासून शुभेच्छा देण्यात असतो. पण तरीही... रोज एकदा ते नाव कानावर पडले की मन नकळत मागे वळून पाहते. जणू काळ अजूनही तिथेच थांबलेला आहे.
तेव्हा वाटते... नियती माणसाला शिक्षा देत नाही. ती फक्त त्याला काही आठवणींचा आजन्म पालक बनवते. त्या आठवणी आपण विसरू नयेत म्हणून ती कधी एखादे गाणे समोर आणते, कधी एखादा रस्ता, कधी एखादा सुगंध... आणि कधी फक्त एक नाव.!
बहुधा म्हणूनच काही प्रेमकथा कधी संपत नाहीत. त्या फक्त जगणे थांबवतात, स्मरणे नाही. आणि त्या स्मरणांच्या शांत प्रकाशात माणूस आयुष्यभर स्वतःलाच शोधत राहतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
#१८७ ❤️🩹🫂
कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका प्रेम अपूर्ण राहण्यात नसते, ती वेळेच्या अयोग्यतेत असते. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात उशिरा येतात, परंतु मन मात्र त्यांची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून करत असते. म्हणूनच तुझे येणे माझ्यासाठी अनपेक्षित नव्हते, ते माझ्या दीर्घ प्रतीक्षेचे उत्तर होते.
खरंतर तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी ज्या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक होते, त्यांचा विचार तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्यानंतर करू लागलीस. तोपर्यंत मी माझ्या भावना कोणत्याही हिशेबाशिवाय जगत होतो. कारण प्रेमाला गणित लागू होत नाही, त्यासाठी केवळ समर्पण आवश्यक असते.
तुझ्या आयुष्यात माझे कोणतेही स्थान नसतानाही मी तुझ्यावर मनापासून प्रेम करू शकलो, तर तू स्वतःहून माझ्या आयुष्यात आल्यानंतर त्या प्रेमाचा प्रवाह मी कसा थांबवू शकलो असतो.? नदीला तिच्या उगमाचे विस्मरण होत नाही, त्याचप्रमाणे मनालाही त्याच्या प्रेमाचे विस्मरण होत नाही.
खरंतर हे तुला खूप आधीच उमगायला हवं होते. परंतु कदाचित तू जाणूनबुजून त्या सत्याकडे दुर्लक्ष करत राहिलीस. कारण सत्य स्वीकारण्यासाठी धैर्य आवश्यक असते, आणि काही सत्ये स्वीकारली तर आयुष्याचे सर्व हिशेब बदलून जातात.
इतिहासात असे अनेकदा घडले आहे. पानिपतच्या रणांगणावर पराभव एका दिवसात झाला, परंतु त्याची चाहूल अनेक दिवस आधी लागली होती. तरीही ती गांभीर्याने घेतली गेली नाही. आपल्या नात्याबाबतही असेच झाले. शेवट अचानक झाला नाही. त्याची चिन्हं खूप आधीपासूनच दिसत होती.
एखाद्या गडाच्या तटांवर उभे राहिल्यावर आजही जाणवते, भक्कम गडकिल्ले एका क्षणात कोसळत नाहीत. आधी त्यांच्या भेगा दुर्लक्षित केल्या जातात. आपल्यातल्या विश्वासालाही अशाच भेगा पडत गेल्या, आणि आपण त्या पाहण्याचे टाळत राहिलो.
मला आता असे वाटू लागले आहे की मी तुझ्यात किती खोलवर गुंतत चाललो होतो, याची तुला पूर्ण जाणीव होती. आणि कदाचित हाच तुझ्या मनातील सर्वात मोठा संघर्ष होता. माझे प्रेम तुला नको नव्हते, मात्र त्या प्रेमाची किंमत तुझ्या वर्तमानाला चुकवावी लागू नये, एवढीच तुझी धडपड होती.
तुझ्या सुखी संसारावर माझ्या भावनांची सावलीही पडू नये, म्हणून तू हळूहळू माझ्यापासून दूर जाऊ लागलीस. संवाद कमी झाले, भेटी विरळ झाल्या, आणि अखेरीस आपलं नातं तुटलं नाही... ते फक्त शांत झालं. इतकं शांत की त्या शांततेचा आवाजही आज माझ्या मनात घुमत राहतो.
मी तुला दोष देत नाही. कारण काही निरोप विश्वासघातामुळे नसतात, ते जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दिले जातात. काही अंतरं द्वेषामुळे नसतात, ती कोणाच्यातरी आयुष्याचे नुकसान होऊ नये म्हणून स्वीकारलेली अपरिहार्यता असते.
आजही तुझी आठवण आली की मनात एकच प्रश्न वारंवार उभा राहतो की, जर हे सर्व तुला आधीच माहीत होते, तर मला इतके जवळ येऊच का दिलेस..?
कदाचित या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडेही नसेल. आणि म्हणूनच काही प्रेमकथा इतिहासात नोंदवल्या जात नाहीत. त्या केवळ दोन मनांच्या भग्न अवशेषांमध्ये जिवंत राहतात.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
शुक्रवार, १० जुलै, २०२६
#१८८ ❤️🩹🫂
काही निरोप शब्दांत दिले जात नाहीत, ते टोमण्यांच्या आवरणात गुंडाळून दिले जातात. "इंदिरा गांधी गेल्या म्हणून काही देश थांबला नाही," असं सहजपणे म्हणणाऱ्या लोकांना कदाचित हे जाणवतही नसतं की, त्या एका वाक्यात ते नकळत त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचं वजनच मोजून बसलेले असतात.
कारण ज्याच्या जाण्याची तुलना एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाशी केली जाते, त्याच्या अस्तित्वानेही कधीतरी एखादं विश्व व्यापलेलं असतं. उपहासाच्या प्रत्येक शब्दामागे एक न उच्चारलेली कबुली दडलेली असते की, हो... तुझं असणं इतकं क्षुल्लक नव्हतं, म्हणूनच तुझ्या जाण्याला इतकं मोठं उदाहरण शोधावं लागलं.
खरं तर जग कोणासाठीच थांबत नाही. सूर्य रोज उगवतो, ऋतू बदलतात, घड्याळाचे काटे पुढे सरकत राहतात. पण म्हणून कोणाचं अस्तित्व अर्थहीन ठरत नाही. काही माणसं जातात तेव्हा काळ पुढे निघून जातो, पण त्यांच्या उपस्थितीने उमटलेल्या पाऊलखुणा मात्र वेळेलाही पुसता येत नाहीत.
उपहास करणाऱ्यांना वाटत असतं की त्यांनी समोरच्याला लहान करून दाखवलं. पण अनेकदा त्याच क्षणी ते त्याच्या प्रभावाची, त्याच्या कर्तृत्वाची आणि त्याच्या अपरिहार्य भासलेल्या अस्तित्वाचीच साक्ष देत असतात. कारण ज्याचं असणं कधीच जाणवलं नाही, त्याच्या जाण्यावर उदाहरणांची गरज पडत नाही.
म्हणून कधी कधी टोमणे हे पराभवाचे नव्हे, तर नकळत दिलेल्या सन्मानाचे दस्तऐवज असतात. शब्दांचा हेतू काहीही असो, त्यातून उमटणारा अर्थ मात्र अनेकदा वक्त्याच्या इच्छेपेक्षा मोठा असतो. आणि तेव्हाच जाणवतं की, "काही पोचपावत्या टाळ्यांनी मिळत नाहीत, त्या विरोधकांच्या उपहासातूनही इतिहासासारख्या शांतपणे लिहिल्या जातात..!" 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
#१८९ ❤️🩹🫂
कधीकाळी प्रत्येक विचाराला शब्दांचे रूप देण्याची सवय होती. मनात एखादा विचार आला की तो कागदावर उतरल्याशिवाय शांतता लाभत नसे. मात्र आता ते सर्व जणू एखाद्या जुन्या ऋतूप्रमाणे मागे पडले आहे. विचार तर अजूनही येतातच, जुन्या आठवणी अजूनही दार ठोठावतात. परंतु त्यांच्यासाठी शब्दांचे दार उघडण्याची इच्छा मात्र आता अजिबात उरलेली नाही.
स्वतः स्वतःशी संवाद साधण्याचे ते माध्यम मी आता जाणीवपूर्वक बंद करून टाकले आहे. कारण प्रत्येक नव्या ओळीबरोबर एखादी जुनी जखम पुन्हा उघडायची, प्रत्येक परिच्छेदासोबत एखादा न बोललेला हुंदका पुन्हा श्वासात मिसळायचा. किती वेळा तेच ते क्षण पुन्हा पुन्हा जगायचे..? आणि किती वेळा दररोज नव्याने मरायचे.? तरीही... त्या जुन्या नोंदी अजूनही तशाच पडून आहेत. आता या ट्विटनंतर एकूण १८८. यातील प्रत्येक नोंद म्हणजे काळाने जपून ठेवलेला एक बंद लिफाफा आहे. त्यात कुठे अपूर्ण प्रेम आहे, कुठे विरहाचा ओलसर श्वास, कुठे नशिबावरील निःशब्द राग, तर कुठे स्वतःलाच समजावण्याचा मी सतत करत असलेला निष्फळ प्रयत्न.
माझ्यासाठी त्या नोंदी वाचणे म्हणजे जुन्या घराची कुलुपे उघडण्यासारखे आहे. प्रत्येक खोलीत अजूनही कोणाच्यातरी पावलांचा प्रतिध्वनी आहे. भिंतींवर आठवणींची धूळ साचली आहे, आणि खिडक्यांतून आत येणारा प्रकाश म्हणजे ही ही भूतकाळाचा भास.
कधी कधी वाटते की, त्या सर्व नोंदी एकामागून एक जगासमोर मांडून टाकाव्यात. जणू मनाच्या गाभाऱ्यात वर्षानुवर्षे साठलेले ओझे हळूहळू उतरवत राहावे. प्रत्येक नोंद प्रकाशित झाली, की मनावरील एखादे ओझे कमी होत जाईल. कारण काही गोष्टी विसरता येत नाहीत आणि त्या मनात कायमच्या कैद करूनही ठेवता येत नाहीत. त्यांना मुक्त करावेच लागते. कधी शब्दांच्या रूपाने, तर कधी शांततेच्या.!
कदाचित त्या उर्वरित १८८ नोंदी म्हणजे माझ्या आयुष्याचा अखेरचा निःशब्द प्रवास आहे. त्या संपल्या की कदाचित माझ्याकडे सांगण्यासारखे काही उरणार नाही. नव्या भावना निर्माण होणार नाहीत असे नाही, पण त्यांना शब्दरूप देण्याची इच्छा मात्र माझ्या मनात उरणारच नाही.
बहुतेक त्या दिवशी, कदाचित पहिल्यांदाच मी माझ्या भूतकाळापेक्षा वर्तमानात अधिक जगत असेन. मनावर वर्षानुवर्षे ठेवलेला आठवणींचा दगड अखेर हलका झाल्याची मला जाणीव होईल. काही माणसे परत येणार नाहीत, काही प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीत, आणि काही कथा अपूर्णच राहतील, हे सत्य तेव्हाही तसेच असेल. पण त्याचे ओझे मात्र उरणार नाही. आणि जर कधीतरी कोणी सहज विचारले, "आता काही लिहीत नाही का?" तर कदाचित मी फक्त हसून इतकेच सांगेन..
"जे काही लिहायचे होते, ते त्या १८८ नोंदींमध्ये आधीच लिहून झाले आहे. आता उरले आहे ते फक्त... शांतपणे जगणे...!" 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
गुरुवार, ९ जुलै, २०२६
एल निनो वगैरे आणि बरेच काही... ❤️🩹🫂
यंदा त्या एल निनोची ज्या थाटात जाहिरात झाली होती ना, वाटलं की आता पावसाचं सरकारच बरखास्त होणार.
रोज नवे अंदाज, रोज नवी पत्रकार परिषद, रोज नवी भीती...
"बहुतेक यंदा पाऊस कमीच पडणार..!"
पण आपल्या पावसाने बहुतेक हे सगळे अहवाल फाईलमध्येच ठेवले, आणि थेट जनतेसमोर बहुमत सिद्ध करायला मैदानात उतरला.
पहिल्याच सत्रात असा विश्वासदर्शक ठराव जिंकला, की एल निनोचं विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात आलंय.
ज्यांनी रोज त्याची बाजू घेतली होती, ते आता "आमचं विधान चुकीच्या संदर्भात घेतलं गेलं..." असं म्हणत बचाव करत फिरताना दिसत आहेत. 🤣
एल निनोची अवस्था तर अगदी निवडणुकीपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड हवा केलेल्या, पण मतमोजणीला अनामत जप्त झालेल्या उमेदवारासारखी झालीय.
बाकी एक गोष्ट मान्य करावी लागेल की महाराष्ट्राचा पाऊस हा कुठल्याही सर्वेक्षणावर, एक्झिट पोलवर किंवा भविष्यवाणीवर चालत नाही, तो थेट निकाल जाहीर करतो. आणि यंदाच्या निकालात "एल निनो"चं डिपॉझिट जप्त आणि "पाऊस" पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी झालेला आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
(सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)
एक नवी सुरुवात... ❤️🩹🫂
कधी कधी ना आपण आपल्या मनाशी उगाचच एक भाबडी आशा बाळगून असतो की समोरची व्यक्ती आपल्या डोळ्यांतील निःशब्द हाक वाचेल, आपल्या शांततेचा अर्थ समजून घेईल आणि न बोललेल्या भावनांनाही आपुलकीचा स्पर्श देईल. आपण मनात साठवून ठेवलेले हे शब्द हळूहळू भावनांचे रूप सोडून ओझे बनू लागतात. ते मनाच्या अंधा-या कप्प्यांत रेंगाळत राहतात, आपल्या विचारांवर परिणाम करतात आणि नात्यांमध्ये नकळतपणे अंतर निर्माण करतात. मौन हे प्रत्येक वेळी संयमाचे लक्षण नसते, अनेकदा ते गैरसमजांना जन्म देणारे सर्वात प्रभावी माध्यम ठरते. आपण बोललो नाही म्हणून समोरच्याने आपोआप समजून घ्यावे, हा आग्रह वास्तवापेक्षा अधिक कल्पनारम्य असतो. आजकाल प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या संघर्षांमध्ये इतकी गुंतलेली असते की दुसऱ्याच्या निःशब्द वेदनांचा अर्थ लावण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ किंवा मानसिक अवकाश असेलच, असे नाही. म्हणूनच मनातील भावना व्यक्त करणे ही केवळ सवय नसून, नात्यांना बळ देणारी एक आवश्यक प्रक्रिया आहे. शब्द उच्चारले की त्यांना स्पष्टता मिळते. भावना व्यक्त झाल्या की त्यांना दिशा मिळते, आणि संवाद साधला की गैरसमजांना मागे हटण्यावाचून पर्याय राहत नाही. प्रत्येक वेळी अपेक्षित उत्तर मिळेलच असे नाही, परंतु किमान मनात अपूर्णतेची सल तरी उरत नाही. कारण न बोललेले शब्द आयुष्यभर मनात प्रतिध्वनी रूपाने गुंजत राहतात, तर व्यक्त केलेले सत्य कालांतराने काळाच्या ओघात शांत होते. म्हणून समजून घेण्याची वाट पाहण्यात आयुष्य खर्च करण्यापेक्षा, मनातील गोष्ट प्रामाणिकपणे मांडत राहणे अधिक शहाणपणाचे आहे. कारण मौन अनेकदा नात्यांचा शेवट लिहिते, तर संवाद नेहमीच नव्या सुरुवातीची शक्यता जिवंत ठेवतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
सोमवार, ६ जुलै, २०२६
शेवटच्या पानाकडे... ❤️🩹🫂
बऱ्याच दिवसांपासून फोनच्या त्या नोट्समध्ये काही शब्द पडून आहेत. काही अपूर्ण, काही अर्धवट, तर काही शेवटच्या श्वासासारखे पूर्ण. प्रत्येक ओळीत एक दिवस बंदिस्त आहे, प्रत्येक परिच्छेदात एखादी रात्र अजूनही जागी आहे.
कधीकाळी वाटायचं, हे सगळं कधीतरी पुस्तक बनेल. कोणीतरी वाचेल, समजून घेईल, आणि त्या शब्दांमध्ये माझा एक तुकडा शोधेल. पण आता तसं काही वाटत नाही.
आता फक्त एवढंच वाटतं, जे काही साठवून ठेवलं आहे, ते एकदाचं जगासमोर ठेवून मोकळं व्हावं. कारण काही गोष्टी जपण्यासाठी नसतात, त्या फक्त मनातून उतरवण्यासाठी असतात.
त्या नोट्स उघडल्या की अजूनही काही आठवणी हळूच खांद्यावर हात ठेवतात. काही शब्द अजूनही विचारतात,
"खरंच... इथंवरच..?"
उत्तर मात्र आजकाल कुठेच सापडत नाही.
पूर्वीसारखी नवीन वही घेण्याची ओढ उरलेली नाही.
कोऱ्या पानांचा गंधही आता मनाला हाक मारत नाही.
शब्द तर अजूनही खूप आहेत,
पण त्यांना जन्म देण्याइतकं बळ मनात उरलेलं नाही.
कधी कधी वाटतं,
लेखन थांबत नाही, फक्त लेखक शांत होत जातो.
मनात वादळं तशीच असतात,
पण त्यांना वाक्यांत बदलण्याची ताकद कुठेतरी मागे राहून जाते. कदाचित ही माझी शेवटची मांडणी असेल.
शेवटंचा कबुलीजबाब.
शेवटची उधळण.
हे सगळं इकडं-तिकडं टाकून एकदाचा मोकळा झालो,
की पुन्हा पेन हातात घेईन असं वाटत नाही. कारण लिहिण्यासाठी फक्त शब्द पुरत नाहीत,
त्यामागे जगण्याची एक हट्टी इच्छाही असावी लागते. आणि तीच इच्छा हल्ली नकळत विरघळून गेलीय.
म्हणून आता जे काही उरलंय,
ते स्वतः सकट फक्त संपवायचं आहे. सुरुवात करण्यासाठी नाही,
तर मनात वर्षानुवर्षे अडकून पडलेल्या प्रत्येक शब्दाला शांत निरोप देण्यासाठी.
कदाचित यानंतर मी लिहिणार नाही.
पण कधीतरी माझे हे शब्द कोणाच्या हातात पडले,
तर त्यांना एवढंच जाणवावं की, एक माणूस होता,
जो शेवटपर्यंत शब्द लिहित राहिला नाही,
तर शब्दांमध्येच हळूहळू विरघळत गेला होता.! 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🫂
जगण्याची रीत...❤️🩹🫂
एकदा का चार वाजून गेले की ऑफिसमध्ये वातावरण हलकं होऊन जायचं. तोंडासमोरची गर्दी निघून गेलेली पाहून जो तो सुटकेचा निःश्वास टाकायचा. शिपाई ही लागलीच आहे त्या जागीच पाच मिनिटे बसून रहायचा. डोक्यावरचा पंखा, लेझर प्रिंटरचा तालबद्ध आवाज, शटर बाहेर चाललेली किरकोळ बडबड, आणि कॅशिअर केबिनमधील नोटा मोजायच्या मशीनचा आवाज, काही मिनिटे तरी फक्त हेच आवाज कानावर यायचे. मग हळूहळू घड्याळाचा काटा पाचकडे सरकू लागला की सगळ्यांची घरी परतायची लगबग सुरू व्हायची. पण तो मात्र हातातलं काम कधीच आवरून घड्याळाकडे एकटक पाहत बसलेला असायचा. तसं यात नवीन असं काही नव्हतंच. कामाच्या दिवशी त्याचा हा दररोजचा ठरलेला दिनक्रम. या मोकळ्या वेळात तो ऑफिसमधील प्रत्येकाच्या जवळ जाऊन बसायचा आणि आता घरी गेल्यावर तुम्ही काय करणार.? हे विचारायचा. आणि ती माणसं जे सांगतील ते तो खूप कुतूहलाने ऐकायचा. मी तसा नवखा होतो, मला फार काही माहीत नव्हतं म्हणून मी त्याला सहज विचारलं की, अरे.. सगळ्यांना विचारतोस, कुतूहलाने ऐकतोस, पण घरी गेल्यावर तू काय काय करतोस..? ते कधीतरी आम्हाला ही सांग ना. तसं अचानक ऑफिसमधला सारा स्टाफ माझ्याकडे पाहू लागला. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. पंखा, लेझर प्रिंटर, कॅश मोजायची मशीन यांचा आवाज आता जास्त तीव्रतेने ऐकू येऊ लागला. तितक्यात त्यानेच या शांततेला वाचा फोडली आणि हसून म्हणाला की, मी एकटाच असतो घरी. माझं घर माझी वाट पाहत उभं असतं. त्याला दररोज कडकडून भेटतो मी. पण तरीही कधी कधी ना, घरी परतायला नकोसं वाटतं. घरी का.? आणि कुणासाठी जावं.? असं वाटतं. सकाळी घरातून बाहेर पडताना आणि संध्याकाळी घरी परतल्यावर ही मी भिंतींशी खूप खूप बोलतो, त्या मिठीत मावत नाहीत, तरीही त्यांना मिठीत घेतो, पण त्या भिंती ही माझ्याशी कधी बोलतच नाहीत. नेहमीच शांत अगदी निर्विकार उभ्या असतात, आणि मला पाहत असतात. एकच खिडकी आहे माझ्या घराला, पण तिथून आत येणारा वारा ही मला पाहून लगेचच माघारी फिरतो. मग निराश मनाने मी अंगणात येऊन बसतो. वाटतं की, साला कोणीही आपल्याला जवळ का करत नाही.? आपलं नेमकं काय चुकलयं? कधीकाळी ही खिडकी, हा माझा दरवाजा, हे माझं अंगण मी यायची वाट पाहत असायचं. मी दिसताच माझं अंगण, घर कसं आनंदाने नाचू लागायचं. पैंजण, बांगड्या, बोबडी बडबड यांचा सुमधुर आवाज कानावर पडायचा. अंगणातल्या तुळशीच्या पायाशी लावलेल्या अगरबत्तीचा सुवास दिवसभराचा सारा शीण क्षणार्धात घालवायचा. पण हळूहळू हे सगळं हरवत गेलं. कधी कधी ना काहीच खरं वाटत नाही. मी, माझं घर, माझं असणं, नसणं सगळं काही खोटं वाटतं. जसं आपल्याला इच्छा नसतानाही जगावं लागतं ना, अगदी तसंच घर म्हटलं की घरी परतावच लागतं. घरी गेलो की पुन्हा पुन्हा दररोज दररोज तेच ते, आणि तोच मी. याच सा-या विचारांत हरवून दोन घास पोटात ढकलतो, पुन्हा याच विचारात हरवून हळूहळू निद्रेच्या स्वाधीन होतो, आणि पुन्हा सकाळी जाग आली की लगेचच याच विचारांना कवटाळून प्रत्येक दिवसांची सुरूवात करतो. त्याची ही बडबड ऑफिसमधील बाकी सगळ्यांसाठी नेहमीची होती, पण मी मात्र सुन्न झालो होतो. काय बोलावं ते मला काहीच कळत नव्हतं. म्हणून मी तिथून उठून माझी बॅग उचलून लगेचच चालता झालो. आता आमचा शिपाई त्याच्या बाजूला जाऊन बसला होता आणि उगाचच त्याला डिवचून, त्याला हसवून त्याची फिरकी घेत गंमत करत होता. आता शटर बाहेरची गर्दी आणि आवाज पुर्ण शांत झाला होता, पण माझ्या मनात मात्र फक्त आणि फक्त गोंगाट सुरू होता, त्याच्या विचारांचा... त्याच्या आयुष्याचा... त्याच्या एकटेपणाचा.. एकाकी जगण्याचा..!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
रविवार, ५ जुलै, २०२६
पुर्णविराम... ❤️🩹🫂
एखादी गोष्ट सुरू करणं कधीच कठीण नसतं. पहिल्या शब्दाला नेहमीच धाडस मिळतं, कारण त्याला शेवटाची कल्पना नसते. आपण मनाच्या कागदावर कितीतरी कथा रंगवत राहतो. प्रत्येक पात्राला आपल्याला हवं तसं हसवतो, रडवतो, भेटवतो, प्रेमात पाडतो, आणि नकळत स्वतःलाच त्या कथेतलं एक पात्र बनवून टाकतो. पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते, जेव्हा कथा आपल्या हातातून निसटायला लागते. कारण शब्द आपले असतात, कल्पना आपली असते, भावनाही आपल्या असतात, पण शेवट..? तो कधीच पूर्णपणे आपला नसतो, आपल्या हातात नसतो. काही शेवट इतके शांत असतात, की आवाजच होत नाही. असे शेवट फक्त आयुष्यभर ऐकू येत राहणारी एक नीरव पोकळी मागे ठेवून जातात. हे असे शेवट इतके अचानक येतात, की आपण अजूनही पुढचं पान उघडायची, वाचायची वाट पाहत राहतो, आणि पुस्तक मात्र तिथेच संपून गेलेलं असतं. बहुतेक म्हणूनच, माणूस गोष्टी रंगवण्यात तरबेज असतो, पण त्यांचा शेवट लिहिताना मात्र त्याचे हात थरथरतात. कारण शेवट लिहिणं म्हणजे फक्त कथा संपवणं नसतं, ते म्हणजे काही स्वप्नांना स्वतःच्या हाताने निरोप देणं असतं. काही आठवणींवर कायमचा पूर्णविराम उमटवणं असतं. आणि अजूनही जिवंत असलेल्या भावनांना, "इथपर्यंतच..." असं सांगण्याचं क्रूर धाडस करणं असतं. म्हणून आजकाल मी कथा तर खूप रंगवतो, पण शेवट लिहिण्याची घाई करत नाही. कारण काही कथा अपूर्ण राहिल्या, तरच त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात. आणि काही शेवट लिहिले गेले की माणूस जिवंत तर राहतो, पण त्याच्या आतलं काहीतरी कायमचं संपून जातं..! 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🫂
शनिवार, ४ जुलै, २०२६
#जेजुरी... ❤️🩹🫂
जेजुरी गडाचं नाव कानावर पडलं की आजही माझ्या मनात सर्वात आधी भंडाऱ्याचा पिवळा रंग उधळला जात नाही, तर उधळला जातो तो, कधीकाळी आपण पाहिलेल्या आपल्या स्वप्नांचा सप्तरंगी इंद्रधनुष्य. आणि त्या इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगावर मला अजूनही तुझ्या पावलांचे ठसे अगदी स्पष्टपणे दिसू लागतात.
दहा वर्षं... काळाच्या हिशोबाने खूप मोठा प्रवास. पण काही क्षण असे असतात की ते वेळेच्या कॅलेंडरवर जगतच नाहीत. ते कायमचे मनाच्या एका कोपऱ्यात थांबून राहतात.
खंडोबाच्या गडाच्या त्या पायऱ्या आजही माझ्या स्मरणात तितक्याच स्पष्ट आहेत. प्रत्येक पायरीवर तुझं ते निखळ हसणं जपून ठेवलं आहे मी. प्रत्येक वळणावर तुझ्या डोळ्यांत उमटलेला विश्वास अजूनही तसाच उभा आहे.
तुला अलगद उचलून, गडाच्या त्या पायऱ्या चढताना मला त्या क्षणी गड किती उंच आहे याचं भान नव्हतं. कारण माझ्यासाठी त्या दिवशी सर्वात मोठं शिखर म्हणजे तू होतीस. तुला जपणं, तुला हसताना पाहणं आणि इथून पुढे फक्त तुझ्याच डोळ्यांत माझं पूर्ण आयुष्य दिसणं, यापेक्षा मोठ्ठं सुख मला माझ्या आयुष्यात कधीच हवंहवंसं नव्हतं. माझ्या आयुष्यात मला हवंहवंसं असं नसलं तरी, आता माझं हक्काचं माणूस आलं होतं. आता या माणसाच्या वाट्याला मला फक्त सुखाचे दिवस आणि प्रेमाचे क्षण इतकंच येऊ द्यायचं होतं, बाकी सगळं काही झेलायला फक्त मी एकाटाच सामोरे जाणार होतो.
त्या गडावर, त्या क्षणी सभोवतालची गर्दीही अक्षरशः विरघळून गेली होती. मंदिराच्या घंटानादापेक्षा आपल्या हसण्याचा आवाज मोठा वाटत होता. वाराही अगदी निवांत होता, जणू त्याला घाई नव्हतीच. तोही अलगद आपल्या भोवती फिरत होता, जणू त्या क्षणाला कुणाची नजर लागू नये म्हणून.
त्या दिवशी आपण देवाकडे काय मागितलं होतं, हे आज खरंच आठवत नाही. पण देवाने काय दिलं होतं, हे मात्र विसरता येत नाही. त्याने काही क्षणांसाठी का होईना, निदान माझ्या आयुष्याला तरी पूर्णत्वाची चव दिली होती.
पण आयुष्याला पूर्णत्व फार काळ सहन होत नसावं बहुतेक.
आता आज पुन्हा पुन्हा जेंव्हा जेंव्हा जेजुरीचं नाव ऐकतो, तेव्हा त्या पायऱ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात, पण यावेळी त्या पायऱ्यांवर तू नसतेस. माझ्या हातात तुझा हात नसतो. मी तुला उचलण्याइतकं जवळचं अंतर तर सोड, आता आठवण आणि वास्तव यांच्यामध्येच एक अख्खं आयुष्य उभं आहे.
मग मन नकळत त्या दिवसात शिरून जातं. तुझ्या हसण्याच्या आवाजाचा पाठलाग करत राहतं. तिथं दिसणारी प्रत्येक आठवण वेचून ती काही क्षण पुन्हा एकदा जगण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहतं.
पण या आठवणींची एक अत्यंत क्रूर सवय असते, त्या आपल्याला आनंद देण्यासाठी येत नाहीत, त्या येतात हे दाखवायला की, "आनंद कधीकाळी आपल्या आयुष्यात होता."
आणि मग अचानकपणे वर्तमानाचा एक थंडगार झोत येतो. डोळे उघडतात. समोर ना गड असतो, ना भंडाऱ्याची उधळण, ना तुझा हात, ना ते हसू. मागे उरलेला असतो तो फक्त स्वतःचाच आवाज, आतून तुटत जाणारा.
खरंच.... आपलं हे मनही किती हट्टी आहे ना. त्याला माहीत आहे की काळाची चक्रं मागे फिरत नाहीत. कधीकाळी प्रेमाच्या ओलाव्याने बहरून गेलेली नाती एकदा का सुकली की पुन्हा नव्याने कधीच बहरून येत नाहीत. तरीसुद्धा हे वेडं मन रोज त्याच दारावर जाऊन उभं राहतं, जिथून कोणीही पुन्हा परत येण्याची कोणतीच शक्यता उरलेली नसते.
कधी कधी वाटतं, माझ्या मनात एक कृष्णविवर तयार झालं आहे. जिथे प्रत्येक नवीन आनंद जाऊन हरवतो आणि प्रत्येक जुनी आठवण मात्र अधिक जिवंत होत जाते. त्या अंधाराला तळ नाही, किनारा नाही, शेवट नाही. तसा मी वर्तमानात जगतोय, पण माझं मन मात्र अजूनही त्या गडाच्या पायऱ्यांवर तुझ्यासोबत बसून आहे. हातात तुझा हात असल्याचा भास अनुभवत आहे. तू पुन्हा एकदा मागे वळून हसशील, एवढ्याशा अशक्य अशा आशेवर ते अजूनही श्वास घेत आहे.
आयुष्य पुढे निघून गेलं आहे, पण माझ्या भावनांचं घड्याळ अजूनही त्या गडाच्या पायथ्याशी, त्या गडाच्या प्रत्येक पायरीवर तिथेच थांबलं आहे.
जेजुरी आजही तशीच आहे. खंडोबाचा गडही तसाच आहे. त्या पायऱ्याही तशाच आहेत. बदललोय तर फक्त मी, आणि बदलली आहे ती व्यक्ती, जिने कधीकाळी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पायरीला अर्थ देण्याचं वचन दिलं होतं, ते ही अगदी साता जन्माचं..!
ज्या जेजुरी गडावर माझा देव आहे, तिथं माझा हा निर्जीव देह घेऊन, त्या पाय-या चढण्याची, त्याच्यासमोर उभं राहण्याची मला भीती वाटते. ही भीती खरंतर फक्त आणि फक्त त्या जुन्या आठवणींची आहे, ही भीती प्रत्येक पायरी चढून जात असताना, माझ्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंची आहे. प्रत्येक पायरी चढून जात असताना, त्याबरोबर वाढत जाणारं ते प्रत्येक अश्रुंचं वजन इतकं वाढत जातं की एक पाऊल उचलणं ही अगदी अशक्य होऊन जातं आणि मी साश्रू नयनांनी गड न चढता तसाच माघारी फिरतो.
काही ठिकाणं नकाशावर नसतात, ती माणसाच्या हृदयात असतात. आणि जेजुरी गड.. माझ्या देवाचं गाव.. माझ्यासाठी ते एक तीर्थक्षेत्र नसून, माझ्या अपूर्ण संसाराची अखेरची जिवंत स्मृती आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
शुक्रवार, ३ जुलै, २०२६
जितेपणीच अमर झालो, जेव्हा मी तुझा झालो.! ❤️🩹🫂
कधी कधी मला स्वतःचंच हसू येतं. कारण माझ्या मनाला आता कळून चुकलं आहे की, तू कधीच परत येणार नाहीस, आपल्यामधलं सगळं काही कधीच पूर्वीसारखं होणार नाही. आणि हे सगळं काही माझ्या मनाने मान्यही केलं आहे. पण तरीसुद्धा माझ्या नजरा का कुणास ठाऊक अजूनही हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत.
आजही गर्दीतून चालताना नकळत प्रत्येक चेहरा तुझ्यासारखा वाटून जातो. एखाद्या पैंजणाचा आवाजही माझ्या जीवाला वेड लावून जातो. एखादी पाठमोरी आकृती अचानक तुझा भास देऊन जाते अन् मी वेड्यासारखा मागे मागे धावत राहतो. तुझ्याकडून ऐकलेला एखादा शब्द कुठेतरी ऐकला की माझा जीव क्षणार्धात जुन्या आठवणींचा मागोवा घेण्यात हरवून जातो. आपली गल्ली, आपला चौक, आपलं मार्केट या आठवणीतल्या प्रत्येक वळणावर मी दररोज थांबतो, त्या प्रत्येक ठिकाणी तुला बघतो. खरंतर तिथं तू नसतेसच, पण मी तू तिथं असण्याचा भास जगतो. पण तितक्यात अंतर्मनातून आवाज येतो की, "नाही... ती इथे नाही."
मला माहितीये, माझी ही सवय आता निरर्थक झाली आहे. पण काही सवयी या तर्काने नाही, तर प्रेमाने जिवंत राहतात, आणि आपल्याला जिवंत ठेवतात. तुला शोधण्यात माझा प्रत्येक दिवस संपतो. आणि तू न सापडण्यात प्रत्येक रात्र पुन्हा सुरू होते.
या सगळ्याचा खरंतर मला खूप खूप त्रास होतो. इतका की काही क्षण स्वतःपासूनही दूर दूर पळून जावंसं वाटतं. पण गंमत अशी की, या त्रासापासून मुक्त व्हावं असंही कधी मनापासून वाटत नाही. कारण या वेदनेच्या निमित्ताने का होईना पण तू अजूनही माझ्यात जिवंत आहेस.
तुला शोधण्याची ही सवय म्हणजे माझ्या प्रेमाचा शेवटचा श्वास आहे. ती संपली, तर कदाचित माझ्यातलं तुझ्यावरचं प्रेमही कुठेतरी हरवून जाईल, आणि ते मला अजिबात मान्य नाही.
लोक म्हणतात, पुढे निघून जा. विसरून जा. नव्याने जग. पण त्यांना कसं सांगू... काही माणसं आयुष्यातून जातात, मात्र मनातून कधीच जात नाहीत. त्यांच्यासाठी दार तर बंद झालेलं असतं, पण खिडक्या कायम सताड उघड्याच राहतात. आज मी तुला शोधतो, कारण मला खात्री आहे म्हणून नाही, तर तू कधीकाळी माझं संपूर्ण जग होतीस म्हणून.
मला माहितीये, कदाचित तू हे कधीच वाचणार नाहीस. कदाचित तुला याचं काहीच वाटणार नाही. पण माझ्या प्रत्येक दिवसाचा हा एक न बोललेला विधी आहे.. तुला जगणं, तुझी सोबत जगणं, तुला आठवण आणि इतरांच्या नकळत सतत माझ्या आजूबाजूला तुला शोधत राहणं.
आता आपल्या दोघांतील सगळं काही संपलं आहे, हे सत्य आहे. पण तरीही अजूनही मी फक्त तुझाच आहे, हीसुद्धा तितकीच खरी गोष्ट आहे. आणि बहुतेक म्हणूनच, प्रत्येक वेळी तू मला न सापडूनही, मी तुला शोधतच राहतो. कारण काही प्रेमकथा एकत्र येऊन पूर्ण होत नाहीत, त्या आयुष्यभर कोणाची तरी वाट पाहण्यातच अमर होऊन जातात.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
गुरुवार, २ जुलै, २०२६
प्रिय मित्र गुप्ता जी... ❤️🫂
प्रिय मित्र गुप्ता जी... ❤️🫂
One Man Show.... 🔥 🔥
पत्रास कारण की, आज तुमचा वाढदिवस.
सर्वप्रथम मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
देवाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला भरभरून आनंद द्यावा, एवढीच प्रार्थना.
खरं सांगायचं तर, तुझा वाढदिवस हा फक्त तुझा राहत नाही. तो आमच्यासाठीही एक सण बनून जातो. विशेषतः वहिनी आणि समर्थच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की जाणवतं, काही माणसं फक्त स्वतःचं आयुष्य जगत नाहीत, ती आपल्या माणसांचं जगही उजळवत असतात.
कधी कधी मला वाटतं की, काही नात्यांना नाव देण्याचा प्रयत्नच करू नये. कारण शब्दांची मर्यादा असते, पण माणसाच्या जिव्हाळ्याची नसते. काही नाती रक्ताची नसतात, तरी ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही जवळची असतात. त्यात अपेक्षा नसतात, हिशेब नसतात. असतो तो फक्त जिव्हाळा.
माझ्या आयुष्यातला असाच एक जिवंत, उबदार आणि निस्वार्थ अध्याय म्हणजे तू. एक माणूस म्हणून, माणूसकीचं नातं जपणारा माणूस म्हणून तू इतका मोठा आहेस की तुला मिठीत घ्यायला गेलं की हात कमी पडतात, आणि तुझ्याबद्दल लिहायला बसलं की शब्द अपुरे पडतात.
'मित्र', 'दोस्त', 'सखा' हे शब्द जेव्हा जेव्हा कानावर पडतात, तेव्हा सर्वप्रथम डोळ्यांसमोर तुझाच चेहरा उभा राहतो. कारण त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तू तुझ्या जगण्यातून सिद्ध केलायस, आणि अजूनही करतो आहेस.
रात्र असो की पहाट... आनंदाचा क्षण असो की संकटाची वेळ... मी फक्त हाक दिली, आणि तू मागे वळून पाहिलंस, असं कधी झालंच नाही. तू नेहमी धावत आलास. माझं दुःख स्वतःचं मानलंस आणि माझा आनंद स्वतःच्या चेहऱ्यावर मिरवलास.
माझी झोळी तुझ्या मायेने, तुझ्या आधाराने आणि तुझ्या प्रेमाने इतकी भरून गेली आहे की, आयुष्यभर ते ऋण फेडण्याचा प्रयत्न केला तरी कमीच पडेल.
पण या सगळ्यात एक खंत कायम मनाला टोचत राहते. तुला ज्या वेळी माझी सर्वाधिक गरज होती, त्या वेळी मी तुझ्यासोबत नव्हतो. त्या क्षणाची सल आजही मनात तशीच जिवंत आहे, आणि नेहमीच राहणार. आश्चर्य म्हणजे, तू त्या गोष्टीचा साधा उल्लेखही कधी केला नाहीस. उलट पूर्वीसारखंच प्रेम दिलंस. तेव्हा जाणवलं, मोठेपणा शब्दांत नसतो, तो क्षमा करण्यात आणि नातं आहे तसंच जपण्यात असतो.
आज या तुझ्या वाढदिवशी मी मोठमोठी वचने देणार नाही, पण एवढं मात्र नक्की सांगतो की, पुन्हा आयुष्याने अशी वेळ आणली, तर त्यावेळी तुझ्या खांद्याला खांदा लावून, तुला भावनिक आधार द्यायला उभा असलेला पहिला माणूस नक्कीच मी असेन. 🫂
बाकी काय... मजेत असतोसच, आणखी मजेत रहा. हसत असतोसच, आणखी हसत रहा. विशेषकरून स्वतःची काळजी घे. कारण आता तुझ्या हृदयाची धडधड फक्त तुझ्यासाठी नाहीये. त्या धडधडीवर वहिनीचं हसू आणि आपल्या लाडक्या समर्थचं संपूर्ण जग अवलंबून आहे. आणि हो...
माझ्या आयुष्यात तू आहेस, हीच माझ्यासाठी देवाने आजवर दिलेली सर्वात सुंदर भेट आहे.
खूप खूप प्रेम मित्रा... खूप खूप प्रेम.. ❤️🫂
आणि पुन्हा एकदा...
वाढदिवसाच्या मनःपूर्वक, मनापासून खूप खूप खूप शुभेच्छा! ❤️🎂🫂
#MH12 ❤️🩹🫂
बुधवार, १ जुलै, २०२६
"प्रेमात काही वाक्यं बोलण्यासाठी असतात, निभावण्यासाठी नाही." ❤️🩹🫂
एके दिवशी ती अगदी सहज बोलून गेली होती, "कधीकाळी जर तू माझ्या आयुष्यातून हरवू लागलास किंवा हरवलास, तर मी तुला शोधत शोधत नक्कीच येईन." त्या क्षणी तिच्या त्या वाक्यावर मी हसलो होतो. कारण त्यावेळी मला वाटलं होतं की, "प्रेमात दिलेली प्रत्येक खात्री शेवटपर्यंत जगत असते."
पण नंतर कळलं, "प्रेमात काही वाक्यं बोलण्यासाठी असतात, निभावण्यासाठी नाही."
मग एक दिवस मी मुद्दाम हरवायचं ठरवलं. न रागावता, न भांडता, न कोणाला दोष देता, फक्त शांतपणे तिच्या आयुष्यातून हळूहळू स्वतःला दूर दूर करत रहायचं. असं करत असताना मनाच्या एका कोपऱ्यात एक वेडा विश्वास होता की, आज नाही तर उद्या ती माझा शोध घेत येईल, नाही नाही.... नक्की येणारच..!
एखादा मेसेज.. एखादा फोन... किंवा निदान, "कुठे आहेस?" एवढाच एक साधा प्रश्न तरी नक्कीच विचारेल. पहिले काही दिवस आशेने गेले. मग आठवडे निघून गेले. महिनेही सरले. आणि आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण व्हायला आलंय. ती मात्र अजूनही आलेली नाही. कदाचित तिला माझं हरवणं जाणवलंच नसेल. किंवा जाणवलं असेल, पण शोधण्याइतकं महत्त्वाचा मी तिच्यासाठी कधी नव्हतोच बहुतेक. आता मी तिची वाट पाहत नाही. मी फक्त त्या एका वाक्याची वाट पाहतोय, जे तिने कधीतरी अगदी सहज उच्चारलं होतं.
विरहाची एक विचित्र सवय लागली आहे. दररोज स्वतःलाच शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रत्येक वेळी तिच्या आठवणीच सापडतात. माझं अस्तित्व आता धुक्यासारखं झालंय. स्वतःलाच स्पर्श करायला गेलो, तर हातात काहीच लागत नाही. आणि खरं सांगायचं तर आज जर ती अचानक माझ्यासमोर आली, तर कदाचित तिला तिचा जुना "मी" सापडणार नाही. कारण तिच्या प्रतीक्षेत उभा असलेला तो माणूस, दिवसागणिक स्वतःपासूनच इतका दूर निघून गेलाय की आता मी तिला सापडणं तर दूरच, मी माझं मलाच पुन्हा कधीतरी सापडेल की नाही, याचीसुद्धा खात्री उरलेली नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
वास्तव... ❤️🩹🫂
हे असं कधीतरी होणार, याची जाणीव मनाच्या एका शांत कोपऱ्यात आधीपासूनच होती. पण नियती इतकी घाई करेल, इतक्या अचानक आपल्याला एकमेकांच्या आयुष्यातून वेगळं करून टाकेल, हे मात्र मला कधीच वाटलं नव्हतं.
आज मागे वळून सगळा प्रवास पाहतो, तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते, ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस, त्या क्षणीच माझ्या मनाला समजलं होतं की मी वास्तव जगत नाहीये, मी एका सुंदर स्वप्नात जगतो आहे. आणि स्वप्नांचं एक अटळ सत्य असतं, कितीही सुंदर असलं तरी एका क्षणी डोळे उघडतातच. पण डोळे उघडल्यावर समोर उभं राहणारं वास्तव इतकं निष्ठुर, इतकं ओसाड आणि इतकं वेदनादायक असेल, याचा मी कधी विचारही केला नव्हता.
तू आजही मला माझ्या आयुष्यात तितकीच हवी आहेस, जितकी पहिल्या भेटीत होतीस. तुझ्या अस्तित्वाने माझ्या जगण्याला अर्थ मिळाला होता. जीवन जगण्याचं कारण मिळालं होतं. माझ्या प्रत्येक आनंदामागे तुझं हसू होतं, आणि प्रत्येक स्वप्नामागे तुझी सावली.
पण आयुष्याला आपल्या भावना कधीच मान्य नसतात. ते आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं, जिथे प्रेम तर जसं होतं तसंच असतं, पण प्रेम करणारी माणसं मात्र परिस्थिती समोर हतबल असतात. आज आपण दोघंही अशाच एका चक्रव्यूहात अडकलो आहोत. जबाबदाऱ्यांच्या, परिस्थितीच्या आणि काळाच्या अशा गुंत्यात अडकलो आहोत, जिथे आपल्या मनात प्रेमाचा अथांग सागर असूनही हात एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीयेत. ना मला तुला थांबवण्याचा अधिकार उरलाय, ना तुला माझ्याकडे परत येण्याची मोकळीक उरली आहे.
कधीकाळी आपल्या दोघांमध्ये रंगणाऱ्या त्या गोड गप्पा, तुझं नकळत रुसणं, मी तुझा रूसवा दूर करणं, हे सगळं आता काळाच्या पानांमध्ये दडून बसलं आहे. आठवणी तर अजूनही जिवंत आहेत, पण त्या जगण्याची वेळ मात्र निघून गेली आहे.
तरीही एक गोष्ट काळालाही बदलता आली नाही, तुझ्यावरचं माझं प्रेम.
या जगाच्या नजरेत कदाचित आपली कहाणी संपली असेल. लोकांच्या मते आपण एकमेकांचे राहिलो नसेल. पण माझ्या मनात तुझ्यासाठी ज्या भावना जन्माला आल्या होत्या, त्या आजही तितक्याच पवित्र आहेत. काळाने त्यांच्यावर धूळ टाकण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या प्रत्येक वेळी पुन्हा नव्यासारख्या उमलल्या.
परिस्थितीने आपल्यातल्या संवादाला पूर्णविराम दिला असेल, पण आत्म्यांच्या नात्याला विराम देता येत नाही. काही नाती शब्दांनी टिकत नाहीत, ती शांततेतही श्वास घेत राहतात. काही प्रेमकथा भेटण्यात पूर्ण होत नाहीत, त्या विरहातच अजरामर होतात.
म्हणूनच मला आजही वाटतं, माझं तुझ्यावरचं प्रेम या एका जन्मापुरतं मर्यादित नाही. हा बंध जन्म-मृत्यूच्या पलीकडे जाणारा आहे. काळ संपेल, जन्म बदलतील, शरीरं बदलतील, आयुष्याची नावं बदलतील, पण जर पुनर्जन्म नावाची एखादी गोष्ट खरंच अस्तित्वात असेल, तर प्रत्येक जन्मात माझ्या हृदयाचा पहिला ठोका तुझंच नाव उच्चारेल.
तू दूर असशील... कदाचित कायमची. पण माझ्या मनात तू नेहमी माझीच राहशील. आणि मी ही... प्रत्येक जन्मात, प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रार्थनेत... फक्त आणि फक्त तुझाच राहीन.! 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
बेरंग... ❤️🩹🫂
आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...
-
आता सारं काही जवळपास संपल्यातच जमा होतं. तरीही का कुणास ठाऊक, पण त्यादिवशीच्या तुझ्या हसण्यामागचं कोडं काही केल्या मला सुटत नव्हतं. त्यादिवश...
-
टाळ, मृदंग आणि तबल्याची जुगलबंदी एकसारखी सुरूच होती. सोबतीला ढगांचा ढोलही ताल धरू लागला होता. या सर्वांच्या तालावर वीज आणि वारा सुसाट वेगान...