जगण्याची रीत...❤️🩹🫂
एकदा का चार वाजून गेले की ऑफिसमध्ये वातावरण हलकं होऊन जायचं. तोंडासमोरची गर्दी निघून गेलेली पाहून जो तो सुटकेचा निःश्वास टाकायचा. शिपाई ही लागलीच आहे त्या जागीच पाच मिनिटे बसून रहायचा. डोक्यावरचा पंखा, लेझर प्रिंटरचा तालबद्ध आवाज, शटर बाहेर चाललेली किरकोळ बडबड, आणि कॅशिअर केबिनमधील नोटा मोजायच्या मशीनचा आवाज, काही मिनिटे तरी फक्त हेच आवाज कानावर यायचे. मग हळूहळू घड्याळाचा काटा पाचकडे सरकू लागला की सगळ्यांची घरी परतायची लगबग सुरू व्हायची. पण तो मात्र हातातलं काम कधीच आवरून घड्याळाकडे एकटक पाहत बसलेला असायचा. तसं यात नवीन असं काही नव्हतंच. कामाच्या दिवशी त्याचा हा दररोजचा ठरलेला दिनक्रम. या मोकळ्या वेळात तो ऑफिसमधील प्रत्येकाच्या जवळ जाऊन बसायचा आणि आता घरी गेल्यावर तुम्ही काय करणार.? हे विचारायचा. आणि ती माणसं जे सांगतील ते तो खूप कुतूहलाने ऐकायचा. मी तसा नवखा होतो, मला फार काही माहीत नव्हतं म्हणून मी त्याला सहज विचारलं की, अरे.. सगळ्यांना विचारतोस, कुतूहलाने ऐकतोस, पण घरी गेल्यावर तू काय काय करतोस..? ते कधीतरी आम्हाला ही सांग ना. तसं अचानक ऑफिसमधला सारा स्टाफ माझ्याकडे पाहू लागला. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. पंखा, लेझर प्रिंटर, कॅश मोजायची मशीन यांचा आवाज आता जास्त तीव्रतेने ऐकू येऊ लागला. तितक्यात त्यानेच या शांततेला वाचा फोडली आणि हसून म्हणाला की, मी एकटाच असतो घरी. माझं घर माझी वाट पाहत उभं असतं. त्याला दररोज कडकडून भेटतो मी. पण तरीही कधी कधी ना, घरी परतायला नकोसं वाटतं. घरी का.? आणि कुणासाठी जावं.? असं वाटतं. सकाळी घरातून बाहेर पडताना आणि संध्याकाळी घरी परतल्यावर ही मी भिंतींशी खूप खूप बोलतो, त्या मिठीत मावत नाहीत, तरीही त्यांना मिठीत घेतो, पण त्या भिंती ही माझ्याशी कधी बोलतच नाहीत. नेहमीच शांत अगदी निर्विकार उभ्या असतात, आणि मला पाहत असतात. एकच खिडकी आहे माझ्या घराला, पण तिथून आत येणारा वारा ही मला पाहून लगेचच माघारी फिरतो. मग निराश मनाने मी अंगणात येऊन बसतो. वाटतं की, साला कोणीही आपल्याला जवळ का करत नाही.? आपलं नेमकं काय चुकलयं? कधीकाळी ही खिडकी, हा माझा दरवाजा, हे माझं अंगण मी यायची वाट पाहत असायचं. मी दिसताच माझं अंगण, घर कसं आनंदाने नाचू लागायचं. पैंजण, बांगड्या, बोबडी बडबड यांचा सुमधुर आवाज कानावर पडायचा. अंगणातल्या तुळशीच्या पायाशी लावलेल्या अगरबत्तीचा सुवास दिवसभराचा सारा शीण क्षणार्धात घालवायचा. पण हळूहळू हे सगळं हरवत गेलं. कधी कधी ना काहीच खरं वाटत नाही. मी, माझं घर, माझं असणं, नसणं सगळं काही खोटं वाटतं. जसं आपल्याला इच्छा नसतानाही जगावं लागतं ना, अगदी तसंच घर म्हटलं की घरी परतावच लागतं. घरी गेलो की पुन्हा पुन्हा दररोज दररोज तेच ते, आणि तोच मी. याच सा-या विचारांत हरवून दोन घास पोटात ढकलतो, पुन्हा याच विचारात हरवून हळूहळू निद्रेच्या स्वाधीन होतो, आणि पुन्हा सकाळी जाग आली की लगेचच याच विचारांना कवटाळून प्रत्येक दिवसांची सुरूवात करतो. त्याची ही बडबड ऑफिसमधील बाकी सगळ्यांसाठी नेहमीची होती, पण मी मात्र सुन्न झालो होतो. काय बोलावं ते मला काहीच कळत नव्हतं. म्हणून मी तिथून उठून माझी बॅग उचलून लगेचच चालता झालो. आता आमचा शिपाई त्याच्या बाजूला जाऊन बसला होता आणि उगाचच त्याला डिवचून, त्याला हसवून त्याची फिरकी घेत गंमत करत होता. आता शटर बाहेरची गर्दी आणि आवाज पुर्ण शांत झाला होता, पण माझ्या मनात मात्र फक्त आणि फक्त गोंगाट सुरू होता, त्याच्या विचारांचा... त्याच्या आयुष्याचा... त्याच्या एकटेपणाचा.. एकाकी जगण्याचा..!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂