#१७६ ❤️🩹🫂
माणसाचं आयुष्य नेमकं किती असतं, याचा हिशेब आता डॉक्टरांच्या पुस्तकांतून नाही तर अंत्ययात्रांच्या संख्येतून कळू लागला आहे. कालपरवापर्यंत खांद्याला खांदा लावून चालणारे कितीतरी जण आता फोटोंमध्ये अडकून पडले आहेत. उरलेले दिवस मोजण्याचं वय नकळत येऊन ठेपलं आहे. अशा वेळी मागे वळून पाहिलं की एक गोष्ट अक्षरशः अंगावर येते आहे. ती म्हणजे या आयुष्याचा कितीतरी मोठा हिस्सा मी जगलोच नाहीच. ना जाणो कधीपासून माझ्याही नकळत, तो मी एका अशा स्त्रीच्या नावावर गहाण टाकला, जिला माझ्या या व्यवहाराची साधी पावतीसुद्धा माहीत नव्हती.
खरंतर एकतर्फी प्रेम ही काही प्रेमाची जात नाही. तो अक्षरशः एक मुर्खपणा आहे. सुरुवातीला तो सवय वाटतो, मग व्यसन होतो, आणि शेवटी तोच आपली ओळख बनून बसतो. एखाद्या जुन्या वाड्याच्या भिंतींवर शेवाळ जसं वर्षानुवर्षं वाढत राहतं, तसं तिचं नाव मनाच्या प्रत्येक कोपऱ्यावर नकळत पसरत गेलं. आणि आता वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर ते खरवडून काढण्याचा प्रयत्न म्हणजे माझ्यासाठी भिंतच उध्वस्त करण्यासारखा प्रकार ठरतो आहे.
काही लोक मोठ्या सहजपणे मला सांगतात की, "विसरून जा."
पण हे असं सांगणाऱ्यांना कधी हा प्रश्न पडत नाही की विसरण्यासाठी आधी आठवण वेगळी काढावी लागते. माझ्याकडे ती वेगळी काढण्याची सोयच उरलेली नाही. कारण ती एखादी घटना नव्हती. ती माझ्या जगण्याची पद्धत होती. माझ्या चालण्यात, माझ्या थांबण्यात, माझ्या शांततेत, पुस्तकांच्या कडेला काढलेल्या रेघांमध्ये, वहीच्या शेवटच्या पानावर लिहिलेल्या तिच्या नावामध्ये, जुन्या गाण्यांच्या ओळींत, पावसाच्या पहिल्या वासात, संध्याकाळच्या उदास प्रकाशात... सगळीकडे ती थोडीथोडी मिसळली आहे.
म्हणून मला हा प्रश्न नेहमीच सतावत राहतो की तिला विसरण्यासाठी मी नेमकं करावं तरी काय...?
घर बदलावं..? शहर बदलावं..? फोन नंबर बदलावेत..? की देव बदलावा..? पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट तशीच राहते, ती म्हणजे स्वतःपासून पळून जाण्याचा मार्ग अजून कोणत्याच भूगोलाने शोधलेला नाही.
वर्षानुवर्षं माणूस स्वतःलाच फसवत राहतो. "उद्या विसरेन", "पुढच्या वर्षी सगळं संपेल", "एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात आली की हे सगळं निघून जाईल." पण आठवणींना गणित कळत नाही. त्या कॅलेंडर पाळत नाहीत. त्या कोणत्याही क्षणी दार ठोठावतात. कधी एखाद्या जुन्या गाण्याच्या दोन ओळींतून, कधी रस्त्यावरून चालताना अचानक दिसलेल्या ओळखीच्या चालण्यातून, तर कधी कारण नसतानाही मध्यरात्रीच्या शांततेत.
मग लक्षात येतं, आपण तिच्यावर फक्त प्रेम करत नव्हतो, तर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर शक्यता तिच्या नावावर लिहून ठेवली होती. ती मिळाली नाही म्हणून दुःख झालं नाही, पण तिच्यानंतर दुसऱ्या कोणत्याही शक्यतेवर विश्वास ठेवण्याची ताकदच उरली नाही. कारण तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाची कल्पना या मनाने कधीच केली नाही.
काळ मोठा वैद्य आहे, असं म्हणणारे बहुधा जखमेवर कधी प्रेम करून बसले नसावेत. काळ औषध देत नाही, तो फक्त वेदना सहन करण्याची ताकद वाढवतो.
आता या वयात कधी कधी वाटतं, तिला विसरण्यासाठी मला माझ्या आयुष्याचाच अर्धा भाग पुसून टाकावा लागेल. माझं तारुण्य, माझी स्वप्नं, तिच्यापर्यंत कधीच न पोहोचलेली पण फक्त तिच्यासाठी मी लिहिलेली माझी पत्रं, न झालेले संवाद, माझ्या एकांताची कारणं, तिथं मनमुराद रडणं... हे सगळं जर मिटवलं, तर उरेल कोण.?
कदाचित म्हणूनच काही माणसं प्रेमातून बाहेर पडत नाहीत. ती प्रेमात राहतही नाहीत. ती फक्त त्या प्रेमाच्या दीर्घ सावलीत आयुष्यभर चालत राहतात. आणि बाहेरून पाहणाऱ्यांना वाटत राहतं, हा माणूस जगतो आहे. प्रत्यक्षात मात्र तो एका कधीही न घडलेल्या आयुष्याचं शोकगीत अगदी शांतपणे गुणगुणत असतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂