#१७९ ❤️🩹🫂
क्षणभर वाटलं होतं की सुटलो. आज सकाळी सकाळी जेव्हा तिच्याशी जोडलेली ती शेवटची वस्तू, ती शेवटची खूण मी घरातून हद्दपार केली, तेव्हा एकाएकी मोकळं वाटलं. छातीवरचं एक वर्षानुवर्षांचं ओझं उतरल्यासारखं झालं. आपण आता भूतकाळाच्या या जुन्या, गंजलेल्या जोखडातून कायमचे मुक्त झालो, असा एक भाबडा, सुटकेचा सुस्कारा मी सोडला होता. पण हा फक्त एक आभास होता.
माणूस वस्तू बदलू शकतो, जागा बदलू शकतो, अगदी स्वतःचं जगणंही वरवर बदलू शकतो. पण स्मृतींची गणितं एवढी सोपी नसतात. जसजसा दिवस मावळतीला गेला आणि तिन्हीसांजेची ती उदास, राखाडी सावली माझ्या घराच्या उंबरठ्याशी येऊन थबकली, तशी आतली शांतता अधिकच गडद झाली. त्या अंधुक प्रकाशात, कसं काय कुणास ठाऊक, पण तिची आठवण पुन्हा एकदा मनात रुंजी घालू लागली. अगदी नकळत, एखाद्या भुतासारखी ती समोर येऊन उभी राहिली.
मी कासावीस झालो. डोक्यात एकच चक्र सुरू होतं, असं कसं घडू शकतं.? मी तर तिच्याशी संबंधित प्रत्येक धागा कापून टाकला होता. तिच्या खाणाखुणा, तिचे शब्द, तिचे स्पर्श... सगळं काही मी कायमस्वरूपी बुजवून टाकलं होतं. मग हा अचानक आलेला आठवणींचा पूर कुठून आला.? या अस्वस्थतेने ग्रासून मी एखाद्या पिंजऱ्यातल्या वाघासारखा घरभर, या खोलीतून त्या खोलीत चकरा मारत होतो. पाय अस्वस्थ होते, मन व्याकूळ होतं.
आणि अचानक, माझे पाऊल आरशासमोर अडखळले.
मी थबकलो. आरशात पाहिलं. समोर एक चेहरा होता. थकलेला, हरवलेला, डोळ्यांत जुनीच व्याकुळता साठवलेला, माझा स्वतःचा चेहरा. आणि त्याच क्षणी विजेसारखा एक विचार डोक्यात चमकून गेला.
मी ज्या आठवणींना घरातून, वस्तूंमधून बाहेर काढत होतो, ती मूळ आठवण तर इथे समोर उभी होती. हा आरशात दिसणारा माणूस, तिने बदललेला, तिच्या जगण्याशी जोडलेला माणूस... हीच तर तिची सगळ्यात मोठी खूण आहे. मी माझ्या मनाच्या स्वप्नातील जगातून तिचं अस्तित्व पुसलं, पण स्वतःमध्ये साठलेलं तिचं असणं कसं पुसणार.? आरशातली ही आठवण तर अजूनही आहे तशीच जिवंत आहे. आता या स्वतःला, या आरशातल्या माणसाला कसं आणि कुठे कायमस्वरूपी बुजवून टाकायचं.? हा प्रश्न आता अनुत्तरित आहे, आणि या विचाराने व्याकूळ होऊन गेलेली संध्याकाळ जाताना आणखीन अधिकच गडद अशी रात्र माझ्या सोबतीला सोडून गेलेली आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂