वास्तव... ❤️‍🩹🫂

हे असं कधीतरी होणार, याची जाणीव मनाच्या एका शांत कोपऱ्यात आधीपासूनच होती. पण नियती इतकी घाई करेल, इतक्या अचानक आपल्याला एकमेकांच्या आयुष्यातून वेगळं करून टाकेल, हे मात्र मला कधीच वाटलं नव्हतं.


आज मागे वळून सगळा प्रवास पाहतो, तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते, ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस, त्या क्षणीच माझ्या मनाला समजलं होतं की मी वास्तव जगत नाहीये, मी एका सुंदर स्वप्नात जगतो आहे. आणि स्वप्नांचं एक अटळ सत्य असतं, कितीही सुंदर असलं तरी एका क्षणी डोळे उघडतातच. पण डोळे उघडल्यावर समोर उभं राहणारं वास्तव इतकं निष्ठुर, इतकं ओसाड आणि इतकं वेदनादायक असेल, याचा मी कधी विचारही केला नव्हता.


तू आजही मला माझ्या आयुष्यात तितकीच हवी आहेस, जितकी पहिल्या भेटीत होतीस. तुझ्या अस्तित्वाने माझ्या जगण्याला अर्थ मिळाला होता. जीवन जगण्याचं कारण मिळालं होतं. माझ्या प्रत्येक आनंदामागे तुझं हसू होतं, आणि प्रत्येक स्वप्नामागे तुझी सावली.


पण आयुष्याला आपल्या भावना कधीच मान्य नसतात. ते आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं, जिथे प्रेम तर जसं होतं तसंच असतं, पण प्रेम करणारी माणसं मात्र परिस्थिती समोर हतबल असतात. आज आपण दोघंही अशाच एका चक्रव्यूहात अडकलो आहोत. जबाबदाऱ्यांच्या, परिस्थितीच्या आणि काळाच्या अशा गुंत्यात अडकलो आहोत, जिथे आपल्या मनात प्रेमाचा अथांग सागर असूनही हात एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीयेत. ना मला तुला थांबवण्याचा अधिकार उरलाय, ना तुला माझ्याकडे परत येण्याची मोकळीक उरली आहे.


कधीकाळी आपल्या दोघांमध्ये रंगणाऱ्या त्या गोड गप्पा, तुझं नकळत रुसणं, मी तुझा रूसवा दूर करणं, हे सगळं आता काळाच्या पानांमध्ये दडून बसलं आहे. आठवणी तर अजूनही जिवंत आहेत, पण त्या जगण्याची वेळ मात्र निघून गेली आहे.


तरीही एक गोष्ट काळालाही बदलता आली नाही, तुझ्यावरचं माझं प्रेम.


या जगाच्या नजरेत कदाचित आपली कहाणी संपली असेल. लोकांच्या मते आपण एकमेकांचे राहिलो नसेल. पण माझ्या मनात तुझ्यासाठी ज्या भावना जन्माला आल्या होत्या, त्या आजही तितक्याच पवित्र आहेत. काळाने त्यांच्यावर धूळ टाकण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या प्रत्येक वेळी पुन्हा नव्यासारख्या उमलल्या.


परिस्थितीने आपल्यातल्या संवादाला पूर्णविराम दिला असेल, पण आत्म्यांच्या नात्याला विराम देता येत नाही. काही नाती शब्दांनी टिकत नाहीत, ती शांततेतही श्वास घेत राहतात. काही प्रेमकथा भेटण्यात पूर्ण होत नाहीत, त्या विरहातच अजरामर होतात.


म्हणूनच मला आजही वाटतं, माझं तुझ्यावरचं प्रेम या एका जन्मापुरतं मर्यादित नाही. हा बंध जन्म-मृत्यूच्या पलीकडे जाणारा आहे. काळ संपेल, जन्म बदलतील, शरीरं बदलतील, आयुष्याची नावं बदलतील, पण जर पुनर्जन्म नावाची एखादी गोष्ट खरंच अस्तित्वात असेल, तर प्रत्येक जन्मात माझ्या हृदयाचा पहिला ठोका तुझंच नाव उच्चारेल.


तू दूर असशील... कदाचित कायमची. पण माझ्या मनात तू नेहमी माझीच राहशील. आणि मी ही... प्रत्येक जन्मात, प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रार्थनेत... फक्त आणि फक्त तुझाच राहीन.! 🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट