अल्गोरिदम वगैरे... ❤️🩹🫂
हल्ली माझ्या X च्या TLमध्ये अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे की, निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यापूर्वीच सर्व पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. मी मात्र अजूनही माझ्या त्याच जुन्या पक्षाचा साधासुधा कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहतो. परंतु माझ्या TLमध्ये सर्वपक्षीय महाआघाडी स्थापन झाल्याचे स्पष्टपणे दिसते.
या "अल्गोरिदम" नावाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडून बहुधा माझे मतदार ओळखपत्र तपासायचे राहून गेले असावे. कारण मी कोणाला फॉलो करतो, कोणाचे लेखन आवडीने वाचतो, याच्याशी त्याचा काहीही संबंध उरलेला दिसत नाही. उलट, ज्यांना मी प्रत्यक्ष आयुष्यात कधी नमस्कारही केलेला नाही, त्यांनाच तो रोज पहिल्या रांगेत बसवतो.
पूर्वी माझा TL म्हणजे माझा मतदारसंघच वाटायचा. ओळखीचे चेहरे, विश्वासार्ह माणसे, आपले खासदार, आपले आमदार, आपले कार्यकर्ते… सगळे अगदी सुरळीत. पण आता मात्र सकाळी TL उघडला की असे वाटते, रातोरात सीमाविस्तार झाला असून माझ्या मतदारसंघात पंधरा नवीन पक्षांनी उमेदवार उतरवले आहेत.
एखाद्या पोस्टखाली गेल्यावरही तोच प्रकार दिसतो. दोन माणसे संवाद साधत असतात आणि अचानक पन्नास जणांचा मोर्चा येतो. कोणाचे निवेदन, कोणाची पत्रकार परिषद, कोणाचा निषेध, कोणाचे अभिनंदन… इतका कार्यक्रम असतो की, मध्येच मला स्वतःचीच पोस्ट शोधण्यासाठी शोधमोहीम राबवावी लागते.
या सगळ्यात सर्वाधिक सहानुभूती वाटते ती माझ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची. बिचारे रोज भेटायला येतात. पण अल्गोरिदमच्या सुरक्षा रक्षकांनी बहुधा त्यांना मागच्या गेटवरच अडवलेले असते. आणि बाहेरून आलेल्या प्रत्येकाला मात्र "व्हीआयपी" पास देऊन थेट मुख्य मंचावर बसवले जाते.
माझ्या TLचे मंत्रिमंडळ तर रोज बदलते. सकाळी एक मुख्यमंत्री, दुपारी दुसरा, संध्याकाळी तिसरा. रात्री झोपण्यापूर्वी वाटते, "चला, आता स्थिर सरकार आले." पण सकाळी उठेपर्यंत पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू झालेली असते!
कधी कधी तर असा संशय येतो की माझा मोबाईल चार्जरला लावला आहे की नाही, यापेक्षा "आज कोणता पक्ष माझ्या TLवर सत्ता स्थापन करणार?" हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे.
तरी माझ्या सर्व एकनिष्ठ खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना एवढेच सांगायचे आहे.., कृपया गैरसमज करून घेऊ नका. हा पक्षांतराचा प्रकार नाही. हा पूर्णपणे अल्गोरिदम-प्रायोजित राजकीय प्रयोग आहे. माझी निष्ठा अजूनही तिथेच आहे. फक्त माझ्या TLच्या सीमाशुल्क विभागाने बाहेरच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश दिला आहे.
तुम्ही अधूनमधून रिप्लाय करा, एखादा हलकासा विनोद करा, एखादा "जिवंत आहेस ना..?" असा मिश्किल उल्लेख करा. कारण आजकाल "सोशल मीडियावर मैत्री टिकवण्यासाठी विचारसरणीपेक्षा नोटिफिकेशन अधिक महत्त्वाचे झाले आहे..!"
बाकी अल्गोरिदमचे काय… तो आज विरोधी पक्षनेत्याला सत्तेत बसवेल, उद्या सत्ताधाऱ्यांना विरोधी बाकावर पाठवेल. त्याचे राजकारण त्यालाच लखलाभ. आपण मात्र आपली मैत्रीची आघाडी कायम ठेवूया. कारण ती ना निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे, ना तिच्यावर अविश्वास ठराव लागू होतो.
आणि शेवटी एकच…
"माझ्या TLमध्ये कोणाचं सरकार आहे, यापेक्षा माझ्या मनात कोणाचं बहुमत आहे, हे अजूनही बदललेलं नाही!" 🎭
जय हिंद... जय महाराष्ट्र... जय X
(टीप :- हे X वेगळं.. अन् ती X वेगळी..! 😂)
#आयुष्य_वगैरे ❤️🫂