#१७७ ❤️‍🩹🫂

वयाचं एक पन्नाशी-साठीचं स्टेशन ओलांडलं की, अचानक प्लॅटफॉर्मवरची गर्दी विरळ झाल्यासारखी वाटू लागते. लहानपणापासून ज्या सावल्यांच्या छायेत आपण मोठे झालो, ज्या हातांनी आपल्याला बोट धरून जगायला शिकवलं, ते हात आता एकेक करून सुटायला लागतात. हा काळ असा असतो जिथे घराच्या भिंतींवरचे फोटो वाढतात आणि दिवाणखान्यातल्या माणसांच्या संवादाचे आवाज कमी होत जातात. हा अगदी नको असलेला असा हा 'मोसम' एक ना एक दिवस आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. अगदी घराच्या उंबरठ्याशी उभं राहून पायातले जोडे न काढता, तो एकामागून एक आपली हवीहवीशी माणसं गोळा करतो. आपण फक्त उघड्या डोळ्यांनी, हताशपणे हे सगळं पाहत राहतो, कारण त्याला अडवण्याची ताकद ना या जगातल्या कोणत्याही देवामध्ये आहे, ना माणसाच्या विज्ञानात. मागे उरतात फक्त कडू-गोड आठवणींचे ढीग, जे आपण मनाच्या कोपऱ्यात गोळा करून ठेवतो. एखाद्या जुन्या ट्रंकेत ठेवलेल्या कपड्यांना जसा कपाटाचा वास येतो, तसाच या आठवणींना एकाकीपणाचा वास यायला लागतो. ही माणसं आपल्याला या जगात पोरकं करून, शांतपणे पाठीवरची गोणती टाकून अनंताच्या प्रवासाला निघून जातात. त्यांच्या जाण्याने पडलेली पोकळी इतकी भयानक असते की, भरल्या घरातही माणसाला एखाद्या निर्मनुष्य वाळवंटात उभं असल्यासारखं वाटतं. आपण ज्यांना आपलं म्हणत होतो, ज्यांच्या हसण्या-रुसण्यात आपलं आयुष्य गुंफलं होतं, ती सगळी नाती त्या एका क्षणात अगदी अचानक केवळ कागदावरच्या अक्षरांसारखी पुसट होऊन जातात. आणि या सगळ्यात सर्वात क्रूर सत्य कोणतं असेल, तर ते म्हणजे या रांगेत पुढचा नंबर आपलाच आहे. आज आपण ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी आणतोय, उद्या आपल्यासाठीही कोणीतरी दोन थेंब ढाळेल आणि विसरून जाईल. या सृष्टीचा हा गाळ उपसण्याचा धंदा अव्याहत सुरू आहे. शेवटी आपणही एक दिवस अचानक, कोणालाही न सांगता, आपली गुंडाळी बांधून निघून जाणार आहोत. हे जे #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 नावाचं नाटक आपण रोज स्टेजवर येऊन तावातावाने जगत असतो, त्याचा पडदा कधीतरी असाच अनपेक्षितपणे पडणार आहे. आपण फक्त या प्रवासातले तात्पुरते प्रवासी आहोत, आणि आपलं स्टेशन आलं की आपल्याला उतरावंच लागणार, हेच या जगण्याचं अंतिम आणि एकमेव ढळढळीत सत्य आहे.! 🎭

लोकप्रिय पोस्ट