#१८२ ❤️‍🩹🫂

माणूस म्हणून जगताना एक गोष्ट फार उशिरा कळते, ती म्हणजे आपल्या आवडीनिवडीला या जगण्याच्या बाजारात कवडीचीही किंमत नसते. आपण आपल्या मनात सुबक, देखणे नकाशे आखून ठेवतो, पण आयुष्य आपल्याला अशा एका अनोळखी गल्लीत आणून सोडतं, जिचा रस्ता आपण कधी स्वप्नातही शोधला नसतो. आपली इच्छा असो वा नसो, हे जग आपल्या हातावर अशा विषयांचे जाडजूड ग्रंथ आणून ठेवतं, ज्यांची नावं वाचायलाही आपल्याला कंटाळा आलेला असतो. मग सुरू होतो एक सक्तीचा प्रवास. ज्या गोष्टींचा आपल्याला मनापासून वीट आलाय, त्याच गोष्टींच्या गराड्यात आपल्याला दिवस-रात्र काढावी लागते. हा कुठला खेळ आहे कुणास ठाऊक.? ज्या माणसांचा चेहरा पाहावासा वाटत नाही, त्यांच्याच स्वभावाचे बारकावे अभ्यासावे लागतात. ज्या सिच्युएशन्स चालढकल करून टाळायच्या असतात, नेमक्या त्याच संकटांच्या गाभ्यात शिरून आपल्याला उभे राहावे लागते.

हा सगळा प्रकार म्हणजे एका नावडत्या विषयात जबरदस्तीने ढकललेल्या 'पीएचडी'सारखाच आहे. इथे कोणतीही गाईडलाईन नसते, परीक्षा घेणारा कुणी नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संशोधनाला कोणताही शेवट नसतो. रोज सकाळी उठून आपण त्याच कंटाळवाण्या, निरर्थक वाटणाऱ्या प्रकरणांची पानं उलटत राहतो. मनात एक वेगळीच घुसमट असते. डोक्यावर अदृश्य ओझं घेऊन चालताना पाय थकून जातात, पण थांबण्याची सोय नसते. आजूबाजूची माणसं आपलं हे 'संशोधन' पाहून कौतुक करतात, त्यांना वाटतं आपण खूप मोठे काहीतरी मिळवतोय, पण आतल्या आत जे काही हरवत चाललंय, त्याची नोंद कोणत्या प्रबंधात होणार.? आपण ज्या सिस्टीमचा तिरस्कार करतो, त्याच सिस्टीमचे आपण कधी मूक भाग बनून जातो, हे आपले आपल्यालाच कळत नाही.

पण या सगळ्या उद्वेगात आणि उपरोधात एक वेगळेच सत्य दडलेले असते. या नावडत्या विषयांचा सखोल अभ्यास करता करता, माणसाला स्वतःचा एक नवा चेहरा गवसतो. जगण्यातला फोलपणा जितक्या जवळून पाहावा, तितकीच आतली जाणीव अधिक प्रगल्भ होत जाते. हे आयुष्य आपल्याला जाणीवपूर्वक त्या चिखलात उतरवतं, जेणेकरून आपल्याला कमळाची किंमत कळावी. ही सक्तीची पीएचडी करत असतानाच, माणसाला खऱ्या अर्थाने 'जगणे' समजायला लागते. हा प्रवास वेदनादायी नक्कीच आहे, पण तोच तुम्हाला निबर बनवतो. या प्रक्रियेत तुमच्यातला जुना, हळवा माणूस मागे पडतो आणि एक असा माणूस जन्माला येतो, ज्याला आता जगातील कोणत्याही वादळाची भीती उरत नाही. हाच या अनपेक्षित अभ्यासाचा खरा पदवीप्रदान सोहळा असतो.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट