#१८१ ❤️‍🩹🫂

बघ, शेवटी मी सुद्धा तुझ्यासारखाच झालोय. तुझी आठवण येणं आता पूर्णपणे बंद झालंय. हातातला चहाचा कप तसाच रिकामा पडलेला असतो, पण त्यात आता तुझा चेहरा तरंगताना नाही. दिवसामागून दिवस चाललेत, कॅलेंडरची पानं उलटतायत, आणि मी अगदी निर्विकारपणे या सगळ्याकडे पाहतोय. आपण ज्याला जगणं म्हणतो, ते खरंतर अशाच एकामागून एक येणाऱ्या सवयींच्या थपडा खात चालणं असतं. आणि माणसाचं मन म्हणजे काय हो..? शेवटी एक जुनाट, गंजलेलं यंत्रच ना.! सुरुवातीला खटखट करतं, नंतर त्याचाही आवाज सवयीचा होतो. तुझ्या नसण्याची जी काही रखरख होती, ती आता या मातीच्या रंगात आणि रोजच्या जगण्याच्या धुरळ्यात कुठेतरी विरघळून गेलीये, हे मात्र खरं.

नदी वाहत राहते आणि मागे फक्त वाळूचे ढीग सोडून जाते, तसंच काहीसं झालंय. आता तुझा फोन आला नाही, तरी छातीत तो जुना धस्स होणारा आवाज होत नाही. रस्त्यावरून चालताना तुझ्या आवडीचं गाणं कुठल्यातरी दुकानात वाजत असतं, पण माझे पाय तिथे आता रेंगाळत राहत नाहीत. मी पुढे निघून जातो. थेट व्यावहारिक आणि कोरडा होऊन. हा कोरडेपणा मी तुझ्याकडूनच शिकलो की काळानं मला जबरदस्तीनं शिकवला, कुणास ठाऊक.!? पण आता या शांततेची भीती वाटत नाही, उलट तिची सवय झालीये. माणूस जेव्हा स्वतःच्याच आठवणींच्या मलब्यातून बाहेर पडतो, तेव्हा तो असाच निबर बनतो.

तुला वाटत असेल की मला तुझा राग येतोय, पण तसंही काही नाही. राग यायलाही मनात काहीतरी ओल शिल्लक असावी लागते. इथे तर सगळंच वाळवंट झालंय. जुन्या पत्रांचे कपटे किंवा आपल्या मेसेजेचे स्क्रीनशॉट्स आता मोबाईलच्या कोणत्यातरी कोपऱ्यात पडून असतील, पण ते उघडून पाहण्याची ऊर्मी संपलीये. आपण दोघंही आपापल्या जगात एवढे गुंतलोय की आता एकमेकांचा पत्ता शोधण्याची गरजच उरलेली नाही. हे जे काही घडलंय, ते अत्यंत स्वाभाविक आहे. यात कोणताही आव नाही, कोणताही आव आणलेला संताप नाही. फक्त एक संथ, संथ चाललेला आयुष्याचा गाडा आहे, जो आता तुझ्याशिवायही तितक्याच गतीनं पुढे सरकतोय. मीही आता तुझ्यासारखाच झालोय गं... एकदम शांत, व्यवहारी आणि तितकाच तुटलेला.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट