#१८३ ❤️🩹🫂
दिवसभर मी माझ्या स्वतःच्याच एका सुबक, देखण्या स्वप्नांच्या दुनियेत जगत असतो. तिथं मला कशाचीच कमतरता भासत नाही. खरं तर मी शरीराने फक्त कामाच्या ठिकाणी वावरत असतो, पण माझं मन मात्र कधीच उंबरा ओलांडून माझ्या त्या घरात जाऊन बसलेलं असतं. तिथं माझी बायको भाजी चिरता चिरता किंवा देवापाशी दिवा लावता लावता अगदी आतुरतेने माझ्या पावलांची चाहूल घेत असते. माझे शिवनंदन आणि शिवनंदिनी... ती दोघं 'बाबा आले, बाबा आले' करत अंगावर येण्यासाठी दाराकडे डोळे लावून बसलेली असतात. त्यांच्या त्या किलकिल्या हसण्यात आणि निरागस ओरडण्यात माझ्या अख्ख्या जन्माचा शिणवटा एका सेकंदात विरघळून जाईल, अशी माझी समजूत असते. हे चित्र माझ्या डोक्यात इतकं जिवंत असतं की, रोज संध्याकाळी तिथं पोहोचण्यासाठी माझी जी घालमेल होते, ती शब्दांत सांगता येण्यासारखी नाही. सगळी कामं वेळेवर आटोपून मी बस पकडण्यासाठी पळतो. ती नेहमीची एसटी बस चुकली, तर मग मिळेल त्या वाहनाला हात दाखवून, लटकून, कसाबसा लवकरात लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करतो. त्या धावपळीला, त्या श्वास टाकण्याला एक जगण्याचा अर्थ असतो.
एसटीच्या खिडकीतून बाहेर बघताना भोवतालचे रस्ते, माणसं, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि सहप्रवाशांचा तो घामट वास... हे सगळं माझ्या त्या स्वप्नाळू जगापुढे पार फिकं पडलेलं असतं. डोक्यात फक्त एकच वेळ असते.... ती म्हणजे सात ते सव्वा सातची. जेव्हा माझे पाय माझ्या अंगणात पडतात, तेव्हा माझं मन एका सुटकेच्या, तृप्त भावनेने भरून आलेलं असतं. आता घराचं कवाड उघडेल, आता पोरांचा गलका ऐकू येईल, आता घरातला तो उबदारपणा मला कवेत घेईल, असंच मला वाटत असतं.
पण नेमका त्याच क्षणी, डोळ्यांसमोर तो लोखंडाचा थंडगार, निर्जीव तुकडा उभा ठाकतो. ते माझ्या घराच्या दाराला टांगलेलं भलं मोठं कुलूप.! ते नुसतं कुलूप नसतं, तर वास्तवाचा एक क्रूर पहारेकरी असतो. तो रोज संध्याकाळी माझ्या छातीवर पाय देऊन मला ओरडून सांगतो, "माणसा, भानावर ये. हे जे तू दिवसभर जगत होतास, तो म्हणजे तू विणलेला निव्वळ एक आभास होता." त्या कुलुपाच्या गर्द काळपट रंगात आणि त्याच्या जडपणात एका क्षणात माझं ते गोड स्वप्न उधळून जातं. मी अगदी तात्पुरता, निदान काही तासांकरिता तरी, पुन्हा भानावर येतो. माझ्या आनंदाचा तो खेळ आता तिथंच संपलेला असतो.
त्या कुलुपाला स्पर्श करताना हाताला लागणारा तो धातूचा थंडपणा थेट माझ्या काळजाला चिरत जातो. अगदी जड अंतःकरणानं, खांदे पाडून मी ती चावी फिरवतो. त्या चावीचा होणारा 'कर्कश' आवाज म्हणजे माझ्या त्या सुंदर स्वप्नाचा मरण पावलेला हुंदका असतो. मी ते कुलूप काढतो आणि त्या रिकाम्या, अंधाऱ्या घरात प्रवेश करतो. घरातला तो कोंदट वास आणि पसरलेली भयानक शांतता पुन्हा एकदा माझ्या छातीवर येऊन बसते. दिवसभर ज्या शिवनंदन आणि शिवनंदिनीला मी मनात कडेवर घेऊन फिरत होतो, ती केवळ हवेत विरून गेलेली नावं ठरतात. मी स्वतःच्याच हाताने स्वतःचा भ्रमनिरास करून घेतो आणि त्या रिकाम्या चौकटीत मुकाट्याने प्रवेश करतो. आता पुढचे काही तास हेच जळजळीत वास्तव सहन करायचं, रात्रीच्या अंधारात डोळे मिटून पुन्हा एकदा त्या स्वप्नाचे विखुरलेले तुकडे जोडायचे आणि उद्या सकाळी पुन्हा त्याच आभासाच्या पाठीमागे धावण्यासाठी स्वतःला पुन्हा तयार करायचं. आयुष्य म्हणजे दुसरं काय असतं.? एका कुलुपापासून सुरू होऊन दुसऱ्या कुलुपापाशी संपणारा एक वर्तुळाकार, एकाकी प्रवास...!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂