"प्रेमात काही वाक्यं बोलण्यासाठी असतात, निभावण्यासाठी नाही." ❤️🩹🫂
एके दिवशी ती अगदी सहज बोलून गेली होती, "कधीकाळी जर तू माझ्या आयुष्यातून हरवू लागलास किंवा हरवलास, तर मी तुला शोधत शोधत नक्कीच येईन." त्या क्षणी तिच्या त्या वाक्यावर मी हसलो होतो. कारण त्यावेळी मला वाटलं होतं की, "प्रेमात दिलेली प्रत्येक खात्री शेवटपर्यंत जगत असते."
पण नंतर कळलं, "प्रेमात काही वाक्यं बोलण्यासाठी असतात, निभावण्यासाठी नाही."
मग एक दिवस मी मुद्दाम हरवायचं ठरवलं. न रागावता, न भांडता, न कोणाला दोष देता, फक्त शांतपणे तिच्या आयुष्यातून हळूहळू स्वतःला दूर दूर करत रहायचं. असं करत असताना मनाच्या एका कोपऱ्यात एक वेडा विश्वास होता की, आज नाही तर उद्या ती माझा शोध घेत येईल, नाही नाही.... नक्की येणारच..!
एखादा मेसेज.. एखादा फोन... किंवा निदान, "कुठे आहेस?" एवढाच एक साधा प्रश्न तरी नक्कीच विचारेल. पहिले काही दिवस आशेने गेले. मग आठवडे निघून गेले. महिनेही सरले. आणि आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण व्हायला आलंय. ती मात्र अजूनही आलेली नाही. कदाचित तिला माझं हरवणं जाणवलंच नसेल. किंवा जाणवलं असेल, पण शोधण्याइतकं महत्त्वाचा मी तिच्यासाठी कधी नव्हतोच बहुतेक. आता मी तिची वाट पाहत नाही. मी फक्त त्या एका वाक्याची वाट पाहतोय, जे तिने कधीतरी अगदी सहज उच्चारलं होतं.
विरहाची एक विचित्र सवय लागली आहे. दररोज स्वतःलाच शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रत्येक वेळी तिच्या आठवणीच सापडतात. माझं अस्तित्व आता धुक्यासारखं झालंय. स्वतःलाच स्पर्श करायला गेलो, तर हातात काहीच लागत नाही. आणि खरं सांगायचं तर आज जर ती अचानक माझ्यासमोर आली, तर कदाचित तिला तिचा जुना "मी" सापडणार नाही. कारण तिच्या प्रतीक्षेत उभा असलेला तो माणूस, दिवसागणिक स्वतःपासूनच इतका दूर निघून गेलाय की आता मी तिला सापडणं तर दूरच, मी माझं मलाच पुन्हा कधीतरी सापडेल की नाही, याचीसुद्धा खात्री उरलेली नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂