#१८९ ❤️🩹🫂
कधीकाळी प्रत्येक विचाराला शब्दांचे रूप देण्याची सवय होती. मनात एखादा विचार आला की तो कागदावर उतरल्याशिवाय शांतता लाभत नसे. मात्र आता ते सर्व जणू एखाद्या जुन्या ऋतूप्रमाणे मागे पडले आहे. विचार तर अजूनही येतातच, जुन्या आठवणी अजूनही दार ठोठावतात. परंतु त्यांच्यासाठी शब्दांचे दार उघडण्याची इच्छा मात्र आता अजिबात उरलेली नाही.
स्वतः स्वतःशी संवाद साधण्याचे ते माध्यम मी आता जाणीवपूर्वक बंद करून टाकले आहे. कारण प्रत्येक नव्या ओळीबरोबर एखादी जुनी जखम पुन्हा उघडायची, प्रत्येक परिच्छेदासोबत एखादा न बोललेला हुंदका पुन्हा श्वासात मिसळायचा. किती वेळा तेच ते क्षण पुन्हा पुन्हा जगायचे..? आणि किती वेळा दररोज नव्याने मरायचे.? तरीही... त्या जुन्या नोंदी अजूनही तशाच पडून आहेत. आता या ट्विटनंतर एकूण १८८. यातील प्रत्येक नोंद म्हणजे काळाने जपून ठेवलेला एक बंद लिफाफा आहे. त्यात कुठे अपूर्ण प्रेम आहे, कुठे विरहाचा ओलसर श्वास, कुठे नशिबावरील निःशब्द राग, तर कुठे स्वतःलाच समजावण्याचा मी सतत करत असलेला निष्फळ प्रयत्न.
माझ्यासाठी त्या नोंदी वाचणे म्हणजे जुन्या घराची कुलुपे उघडण्यासारखे आहे. प्रत्येक खोलीत अजूनही कोणाच्यातरी पावलांचा प्रतिध्वनी आहे. भिंतींवर आठवणींची धूळ साचली आहे, आणि खिडक्यांतून आत येणारा प्रकाश म्हणजे ही ही भूतकाळाचा भास.
कधी कधी वाटते की, त्या सर्व नोंदी एकामागून एक जगासमोर मांडून टाकाव्यात. जणू मनाच्या गाभाऱ्यात वर्षानुवर्षे साठलेले ओझे हळूहळू उतरवत राहावे. प्रत्येक नोंद प्रकाशित झाली, की मनावरील एखादे ओझे कमी होत जाईल. कारण काही गोष्टी विसरता येत नाहीत आणि त्या मनात कायमच्या कैद करूनही ठेवता येत नाहीत. त्यांना मुक्त करावेच लागते. कधी शब्दांच्या रूपाने, तर कधी शांततेच्या.!
कदाचित त्या उर्वरित १८८ नोंदी म्हणजे माझ्या आयुष्याचा अखेरचा निःशब्द प्रवास आहे. त्या संपल्या की कदाचित माझ्याकडे सांगण्यासारखे काही उरणार नाही. नव्या भावना निर्माण होणार नाहीत असे नाही, पण त्यांना शब्दरूप देण्याची इच्छा मात्र माझ्या मनात उरणारच नाही.
बहुतेक त्या दिवशी, कदाचित पहिल्यांदाच मी माझ्या भूतकाळापेक्षा वर्तमानात अधिक जगत असेन. मनावर वर्षानुवर्षे ठेवलेला आठवणींचा दगड अखेर हलका झाल्याची मला जाणीव होईल. काही माणसे परत येणार नाहीत, काही प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीत, आणि काही कथा अपूर्णच राहतील, हे सत्य तेव्हाही तसेच असेल. पण त्याचे ओझे मात्र उरणार नाही. आणि जर कधीतरी कोणी सहज विचारले, "आता काही लिहीत नाही का?" तर कदाचित मी फक्त हसून इतकेच सांगेन..
"जे काही लिहायचे होते, ते त्या १८८ नोंदींमध्ये आधीच लिहून झाले आहे. आता उरले आहे ते फक्त... शांतपणे जगणे...!" 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂