#१८६ ❤️🩹🫂
माणूस आयुष्यभर नियतीला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नियती कधीच स्पर्धेत उतरलेली नसते. ती केवळ शांतपणे आपले विणकाम करत राहते. आपण ज्याला योगायोग म्हणतो, त्यालाच ती आपल्या भाषेत ‘क्रम’ म्हणत असावी. म्हणूनच काही भेटी घडतात, तर काही न भेटी न होताही आयुष्यभर सोबत राहतात.
कधी कधी असे वाटते, देवाने माणसाला हृदय देताना एक सूक्ष्म चूक केली असावी. त्याने विसरण्याची शक्ती दिली, मात्र काही आठवणी विसरता येणार नाहीत, अशीही व्यवस्था करून ठेवली. म्हणूनच काही माणसे आयुष्यातून निघून जातात, पण मनातून त्यांचा निरोप कधीच होत नाही. आमची कहाणीही बहुधा अशीच होती.
एकाच गल्लीत वाढलेले दोन जीव... एकाच वर्गात काही वर्षे शिकलेले... एकाच रस्त्यावरून वर्षानुवर्षे एकमेकांना ओलांडून गेलेले... तरीही अनोळखी. नियतीने बहुधा तेव्हा आमच्या ओळखीची वेळच लिहिली नव्हती. काही नाती वेळेआधी जन्माला आली, तर ती टिकत नाहीत. आणि वेळ निघून गेल्यावर जन्माला आली, तर ती पूर्ण होत नाहीत. आमच्या वाट्याला यातील दुसरे सत्य आले.
तिला माझ्या मनातील अबोल प्रेम नेमके कधी उमगले, हे माझ्यासाठी आजही एक गूढच आहे. मी तर कधी शब्दांत ते तिच्यापाशी व्यक्त केलेच नव्हते. पण काही भावना अशा असतात की त्या डोळ्यांतूनच स्वतःचा परिचय करून देतात. कदाचित तिने माझ्या मौनातील ती हाक ऐकली असावी. म्हणूनच तिने मला तिच्या मनाच्या एखाद्या शांत कोपऱ्यात स्थान दिले होते आणि माझे ते अबोल प्रेम इतकी वर्षे जपून ठेवले होते.
जेव्हा आयुष्याने माझ्याभोवती दुःखाचे एवढे मोठे वादळ उभे केले, की माझा जगण्यावरच विश्वास उरला नव्हता. तेव्हा नेमकं त्याच वेळी ती आली. तिच्या हातात चमत्कार नव्हता, पण मायेचा स्पर्श होता. शब्दांत उपाय नव्हते, पण सोबत होती. काही माणसे आपल्या दुःखावर औषध लावत नाहीत; ती फक्त आपल्या शेजारी बसतात. आणि तेवढ्यानेही अर्धे दुःख विरघळून जाते.
त्या दिवसांत त्या फक्त एका मोबाईलच्या रूपाने का होईना, पण मी अक्षरशः तिच्या घरचा माणूस झालो होतो. तिची चिमुकली लेक... तिच्या निष्पाप हसण्यात मला आयुष्याचा हरवलेला अर्थ सापडायचा. मी त्या चिमुकल्या जीवासाठी पुर्णपणे अनोळखी असा होतो. पण त्या लेकराला काय माहीत, की तिच्या एका हाकेने, तिच्या दिसण्याने, तिच्या असण्याने एखाद्याच्या जगण्याला कारण मिळत होते.
बाकी विलक्षण गोष्ट एवढीच की, मनाने इतके जवळ असूनही आम्ही कधी जवळ आलोच नाही. आमच्या नात्याला स्पर्शाची गरजच पडली नाही. ते नातं नजरेतून जगलं, विश्वासातून फुललं आणि मौनातून टिकून राहिलं.
त्यानंतर आमची ती एकमेव भेट... एका मंदिरात.
त्या दिवशी देवाच्या साक्षीने आम्ही दोघे उभे होतो. पण देवापेक्षा मोठी मर्यादा आमच्यामध्ये उभी होती. मी तिच्या मागे चालत होतो. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नव्हे, तर माझ्या प्रेमाला त्याची मर्यादा विसरू न देण्यासाठी. त्या दिवशी देवाचे दर्शन झाले की नाही, हे तर मला आजही आठवत नाही. पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीने मात्र आयुष्यभरासाठी मनात एक शिलालेख कोरून ठेवला आहे, हे मात्र खरं.
मग एक दिवस आम्ही दोघांनीही निर्णय घेतला. या निनावी नात्याला आता निरोप द्यायचा. काही नात्यांना तोडण्यासाठी भांडण लागत नाही, समजूतदारपणा ही पुरेसा असतो. आम्ही एकमेकांना गमावले नाही, आम्ही एकमेकांना मुक्त केले.
ती तिच्या आयुष्यात परत गेली. मी माझ्या एकांतात. आणि आता सगळे संपले आहे, असे वाटत असतानाच नियती पुन्हा हसली.
माझ्या पुतणीचा जन्म झाला. आणि माझ्या वहिनीने तिच्यासाठी निवडलेले, तिचे ठेवलेले नाव ऐकताच, माझ्या काळजात जपून ठेवलेले एक बंद दार पुन्हा हळूच उघडले. तोच उच्चार... तेच नाव... तीच वेदना... आणि तेच न अबोल प्रेम.!
कित्ती विचित्र असते ना..? एखादे नाव इतरांसाठी केवळ ओळख असते, पण कुणा एखाद्यासाठी ते संपूर्ण आयुष्याचा इतिहास असते. त्या नावात माझी हरवलेली स्वप्ने आहेत, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत, आणि स्वीकारलेल्या विरहाची शांत सावली आहे.
आता मला तिची खबर घ्यावीशीही वाटत नाही. तिच्या संसारात डोकावण्याची इच्छाही उरलेली नाही. कारण प्रेमाचा शेवट मिळवण्यात नसतो, तो मनापासून शुभेच्छा देण्यात असतो. पण तरीही... रोज एकदा ते नाव कानावर पडले की मन नकळत मागे वळून पाहते. जणू काळ अजूनही तिथेच थांबलेला आहे.
तेव्हा वाटते... नियती माणसाला शिक्षा देत नाही. ती फक्त त्याला काही आठवणींचा आजन्म पालक बनवते. त्या आठवणी आपण विसरू नयेत म्हणून ती कधी एखादे गाणे समोर आणते, कधी एखादा रस्ता, कधी एखादा सुगंध... आणि कधी फक्त एक नाव.!
बहुधा म्हणूनच काही प्रेमकथा कधी संपत नाहीत. त्या फक्त जगणे थांबवतात, स्मरणे नाही. आणि त्या स्मरणांच्या शांत प्रकाशात माणूस आयुष्यभर स्वतःलाच शोधत राहतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂