#१८० ❤️🩹🫂
कधीकधी वाटतं, आपण जे जगतोय ते खरंच आपलं आयुष्य आहे, की समोरच्यांच्या सोयीसाठी आपण घेतलेली एखादी तात्पुरती भूमिका..? आपण घेतलेल्या एखाद्या भूमिकेमागची आपली तगमग, आपली खरी भावना समजून घेण्याची साधी तजवीजही लोक करत नाहीत. वरून आपल्याबद्दल गैरसमजांचे डोंगर उभे करतात. भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला'मधल्या चांगदेवाला जसा या जगाचा, इथल्या माणसांच्या निरर्थक व्यवहारांचा उबग आला होता, तसंच काहीसं आज जाणवू लागलंय. आपण कोणासाठी आणि का स्पष्टीकरण द्यायचं.? ज्यांना आपल्या अंतरंगात डोकावण्याची इच्छाच नाही, त्यांचे ते गैरसमज तसेच राहू द्यावेत, हेच उत्तम. खरेतर, जिथं न बोलता, केवळ शांततेच्या भाषेतून समोरच्याचं दुःख किंवा आनंद समजून घेतला जातो, तिथंच खरा आपलेपणा असतो. नात्यांमध्ये जेव्हा संवादापेक्षा स्पष्टीकरणाची गरज जास्त भासू लागते, तेव्हा समजून जावं की ती माणसं मुळात आपली कधी नव्हतीच. आपण मात्र उगीचच त्यांच्यात आपलं माणूस शोधत राहतो. ही माणसं आपली असण्याचा फक्त एक पोकळ आणि गुळगुळीत दिखावा करत असतात. वरवर मुखवटे लावून फिरणाऱ्या या गर्दीत मुखवट्यांच्या मागे दडलेला खरा चेहरा शोधणं आता मी सोडून दिलंय. हे जग म्हणजे एक मोठं नाटक आहे आणि आपण सगळे त्यात सक्तीने ढकलले गेलेले कलाकार आहोत. पण ज्यांना आपल्या रडण्यामागचं कारण आणि हसण्यामागची वेदना कळत नाही, त्यांच्यासमोर आपल्या भावनांचं प्रदर्शन मांडण्यात काय हशील.? आयुष्याच्या या वळणावर आता एक गोष्ट पक्की समजली आहे की, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा मक्ता आपण घेतलेला नाही. ज्यांना गैरसमज करून घेण्यातच धन्यता वाटते, त्यांना त्यांच्या त्या काल्पनिक जगात सुखाने जगू द्यावं. आपण मात्र आपल्याच विश्वात, आपल्याच धूनमध्ये जगलेलं बरं. कारण शेवटी, स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच सर्वात मोठं सत्य आहे, बाकी सगळा निव्वळ देखावा आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂