पुर्णविराम... ❤️‍🩹🫂

एखादी गोष्ट सुरू करणं कधीच कठीण नसतं. पहिल्या शब्दाला नेहमीच धाडस मिळतं, कारण त्याला शेवटाची कल्पना नसते. आपण मनाच्या कागदावर कितीतरी कथा रंगवत राहतो. प्रत्येक पात्राला आपल्याला हवं तसं हसवतो, रडवतो, भेटवतो, प्रेमात पाडतो, आणि नकळत स्वतःलाच त्या कथेतलं एक पात्र बनवून टाकतो. पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते, जेव्हा कथा आपल्या हातातून निसटायला लागते. कारण शब्द आपले असतात, कल्पना आपली असते, भावनाही आपल्या असतात, पण शेवट..? तो कधीच पूर्णपणे आपला नसतो, आपल्या हातात नसतो. काही शेवट इतके शांत असतात, की आवाजच होत नाही. असे शेवट फक्त आयुष्यभर ऐकू येत राहणारी एक नीरव पोकळी मागे ठेवून जातात. हे असे शेवट इतके अचानक येतात, की आपण अजूनही पुढचं पान उघडायची, वाचायची वाट पाहत राहतो, आणि पुस्तक मात्र तिथेच संपून गेलेलं असतं. बहुतेक म्हणूनच, माणूस गोष्टी रंगवण्यात तरबेज असतो, पण त्यांचा शेवट लिहिताना मात्र त्याचे हात थरथरतात. कारण शेवट लिहिणं म्हणजे फक्त कथा संपवणं नसतं, ते म्हणजे काही स्वप्नांना स्वतःच्या हाताने निरोप देणं असतं. काही आठवणींवर कायमचा पूर्णविराम उमटवणं असतं. आणि अजूनही जिवंत असलेल्या भावनांना, "इथपर्यंतच..." असं सांगण्याचं क्रूर धाडस करणं असतं. म्हणून आजकाल मी कथा तर खूप रंगवतो, पण शेवट लिहिण्याची घाई करत नाही. कारण काही कथा अपूर्ण राहिल्या, तरच त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात. आणि काही शेवट लिहिले गेले की माणूस जिवंत तर  राहतो, पण त्याच्या आतलं काहीतरी कायमचं संपून जातं..! 🎭

#आयुष्य_वगैरे ❤️🫂

लोकप्रिय पोस्ट