#१८८ ❤️🩹🫂
काही निरोप शब्दांत दिले जात नाहीत, ते टोमण्यांच्या आवरणात गुंडाळून दिले जातात. "इंदिरा गांधी गेल्या म्हणून काही देश थांबला नाही," असं सहजपणे म्हणणाऱ्या लोकांना कदाचित हे जाणवतही नसतं की, त्या एका वाक्यात ते नकळत त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचं वजनच मोजून बसलेले असतात.
कारण ज्याच्या जाण्याची तुलना एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाशी केली जाते, त्याच्या अस्तित्वानेही कधीतरी एखादं विश्व व्यापलेलं असतं. उपहासाच्या प्रत्येक शब्दामागे एक न उच्चारलेली कबुली दडलेली असते की, हो... तुझं असणं इतकं क्षुल्लक नव्हतं, म्हणूनच तुझ्या जाण्याला इतकं मोठं उदाहरण शोधावं लागलं.
खरं तर जग कोणासाठीच थांबत नाही. सूर्य रोज उगवतो, ऋतू बदलतात, घड्याळाचे काटे पुढे सरकत राहतात. पण म्हणून कोणाचं अस्तित्व अर्थहीन ठरत नाही. काही माणसं जातात तेव्हा काळ पुढे निघून जातो, पण त्यांच्या उपस्थितीने उमटलेल्या पाऊलखुणा मात्र वेळेलाही पुसता येत नाहीत.
उपहास करणाऱ्यांना वाटत असतं की त्यांनी समोरच्याला लहान करून दाखवलं. पण अनेकदा त्याच क्षणी ते त्याच्या प्रभावाची, त्याच्या कर्तृत्वाची आणि त्याच्या अपरिहार्य भासलेल्या अस्तित्वाचीच साक्ष देत असतात. कारण ज्याचं असणं कधीच जाणवलं नाही, त्याच्या जाण्यावर उदाहरणांची गरज पडत नाही.
म्हणून कधी कधी टोमणे हे पराभवाचे नव्हे, तर नकळत दिलेल्या सन्मानाचे दस्तऐवज असतात. शब्दांचा हेतू काहीही असो, त्यातून उमटणारा अर्थ मात्र अनेकदा वक्त्याच्या इच्छेपेक्षा मोठा असतो. आणि तेव्हाच जाणवतं की, "काही पोचपावत्या टाळ्यांनी मिळत नाहीत, त्या विरोधकांच्या उपहासातूनही इतिहासासारख्या शांतपणे लिहिल्या जातात..!" 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂