#जेजुरी... ❤️‍🩹🫂

जेजुरी गडाचं नाव कानावर पडलं की आजही माझ्या मनात सर्वात आधी भंडाऱ्याचा पिवळा रंग उधळला जात नाही, तर उधळला जातो तो, कधीकाळी आपण पाहिलेल्या आपल्या स्वप्नांचा सप्तरंगी इंद्रधनुष्य. आणि त्या इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगावर मला अजूनही तुझ्या पावलांचे ठसे अगदी स्पष्टपणे दिसू लागतात.

दहा वर्षं... काळाच्या हिशोबाने खूप मोठा प्रवास. पण काही क्षण असे असतात की ते वेळेच्या कॅलेंडरवर जगतच नाहीत. ते कायमचे मनाच्या एका कोपऱ्यात थांबून राहतात.

खंडोबाच्या गडाच्या त्या पायऱ्या आजही माझ्या स्मरणात तितक्याच स्पष्ट आहेत. प्रत्येक पायरीवर तुझं ते निखळ हसणं जपून ठेवलं आहे मी. प्रत्येक वळणावर तुझ्या डोळ्यांत उमटलेला विश्वास अजूनही तसाच उभा आहे.

तुला अलगद उचलून, गडाच्या त्या पायऱ्या चढताना मला त्या क्षणी गड किती उंच आहे याचं भान नव्हतं. कारण माझ्यासाठी त्या दिवशी सर्वात मोठं शिखर म्हणजे तू होतीस. तुला जपणं, तुला हसताना पाहणं आणि इथून पुढे फक्त तुझ्याच डोळ्यांत माझं पूर्ण आयुष्य दिसणं, यापेक्षा मोठ्ठं सुख मला माझ्या आयुष्यात कधीच हवंहवंसं नव्हतं. माझ्या आयुष्यात मला हवंहवंसं असं नसलं तरी, आता माझं हक्काचं माणूस आलं होतं. आता या माणसाच्या वाट्याला मला फक्त सुखाचे दिवस आणि प्रेमाचे क्षण इतकंच येऊ द्यायचं होतं, बाकी सगळं काही झेलायला फक्त मी एकाटाच सामोरे जाणार होतो.

त्या गडावर, त्या क्षणी सभोवतालची गर्दीही अक्षरशः विरघळून गेली होती. मंदिराच्या घंटानादापेक्षा आपल्या हसण्याचा आवाज मोठा वाटत होता. वाराही अगदी निवांत होता, जणू त्याला घाई नव्हतीच. तोही अलगद आपल्या भोवती फिरत होता, जणू त्या क्षणाला कुणाची नजर लागू नये म्हणून.

त्या दिवशी आपण देवाकडे काय मागितलं होतं, हे आज खरंच आठवत नाही. पण देवाने काय दिलं होतं, हे मात्र विसरता येत नाही. त्याने काही क्षणांसाठी का होईना, निदान माझ्या आयुष्याला तरी पूर्णत्वाची चव दिली होती.

पण आयुष्याला पूर्णत्व फार काळ सहन होत नसावं बहुतेक.

आता आज पुन्हा पुन्हा जेंव्हा जेंव्हा जेजुरीचं नाव ऐकतो, तेव्हा त्या पायऱ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात, पण यावेळी त्या पायऱ्यांवर तू नसतेस. माझ्या हातात तुझा हात नसतो. मी तुला उचलण्याइतकं जवळचं अंतर तर सोड, आता आठवण आणि वास्तव यांच्यामध्येच एक अख्खं आयुष्य उभं आहे.

मग मन नकळत त्या दिवसात शिरून जातं. तुझ्या हसण्याच्या आवाजाचा पाठलाग करत राहतं. तिथं दिसणारी प्रत्येक आठवण वेचून ती काही क्षण पुन्हा एकदा जगण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहतं.

पण या आठवणींची एक अत्यंत क्रूर सवय असते, त्या आपल्याला आनंद देण्यासाठी येत नाहीत, त्या येतात हे दाखवायला की, "आनंद कधीकाळी आपल्या आयुष्यात होता."

आणि मग अचानकपणे वर्तमानाचा एक थंडगार झोत येतो. डोळे उघडतात. समोर ना गड असतो, ना भंडाऱ्याची उधळण, ना तुझा हात, ना ते हसू. मागे उरलेला असतो तो फक्त स्वतःचाच आवाज, आतून तुटत जाणारा.

खरंच.... आपलं हे मनही किती हट्टी आहे ना. त्याला माहीत आहे की काळाची चक्रं मागे फिरत नाहीत. कधीकाळी प्रेमाच्या ओलाव्याने बहरून गेलेली नाती एकदा का सुकली की पुन्हा नव्याने कधीच बहरून येत नाहीत. तरीसुद्धा हे वेडं मन रोज त्याच दारावर जाऊन उभं राहतं, जिथून कोणीही पुन्हा परत येण्याची कोणतीच शक्यता उरलेली नसते.

कधी कधी वाटतं, माझ्या मनात एक कृष्णविवर तयार झालं आहे. जिथे प्रत्येक नवीन आनंद जाऊन हरवतो आणि प्रत्येक जुनी आठवण मात्र अधिक जिवंत होत जाते. त्या अंधाराला तळ नाही, किनारा नाही, शेवट नाही. तसा मी वर्तमानात जगतोय, पण माझं मन मात्र अजूनही त्या गडाच्या पायऱ्यांवर तुझ्यासोबत बसून आहे. हातात तुझा हात असल्याचा भास अनुभवत आहे. तू पुन्हा एकदा मागे वळून हसशील, एवढ्याशा अशक्य अशा आशेवर ते अजूनही श्वास घेत आहे.

आयुष्य पुढे निघून गेलं आहे, पण माझ्या भावनांचं घड्याळ अजूनही त्या गडाच्या पायथ्याशी, त्या गडाच्या प्रत्येक पायरीवर तिथेच थांबलं आहे.

जेजुरी आजही तशीच आहे. खंडोबाचा गडही तसाच आहे. त्या पायऱ्याही तशाच आहेत. बदललोय तर फक्त मी, आणि बदलली आहे ती व्यक्ती, जिने कधीकाळी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पायरीला अर्थ देण्याचं वचन दिलं होतं, ते ही अगदी साता जन्माचं..!

ज्या जेजुरी गडावर माझा देव आहे, तिथं माझा हा निर्जीव देह घेऊन, त्या पाय-या चढण्याची, त्याच्यासमोर उभं राहण्याची मला भीती वाटते. ही भीती खरंतर फक्त आणि फक्त त्या जुन्या आठवणींची आहे, ही भीती प्रत्येक पायरी चढून जात असताना, माझ्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंची आहे. प्रत्येक पायरी चढून जात असताना, त्याबरोबर वाढत जाणारं ते प्रत्येक अश्रुंचं वजन इतकं वाढत जातं की एक पाऊल उचलणं ही अगदी अशक्य होऊन जातं आणि मी साश्रू नयनांनी गड न चढता तसाच माघारी फिरतो.

काही ठिकाणं नकाशावर नसतात, ती माणसाच्या हृदयात असतात. आणि जेजुरी गड.. माझ्या देवाचं गाव.. माझ्यासाठी ते एक तीर्थक्षेत्र नसून, माझ्या अपूर्ण संसाराची अखेरची जिवंत स्मृती आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट