एक नवी सुरुवात... ❤️‍🩹🫂

कधी कधी ना आपण आपल्या मनाशी उगाचच एक भाबडी आशा बाळगून असतो की समोरची व्यक्ती आपल्या डोळ्यांतील निःशब्द हाक वाचेल, आपल्या शांततेचा अर्थ समजून घेईल आणि न बोललेल्या भावनांनाही आपुलकीचा स्पर्श देईल. आपण मनात साठवून ठेवलेले हे शब्द हळूहळू भावनांचे रूप सोडून ओझे बनू लागतात. ते मनाच्या अंधा-या कप्प्यांत रेंगाळत राहतात, आपल्या विचारांवर परिणाम करतात आणि नात्यांमध्ये नकळतपणे अंतर निर्माण करतात. मौन हे प्रत्येक वेळी संयमाचे लक्षण नसते, अनेकदा ते गैरसमजांना जन्म देणारे सर्वात प्रभावी माध्यम ठरते. आपण बोललो नाही म्हणून समोरच्याने आपोआप समजून घ्यावे, हा आग्रह वास्तवापेक्षा अधिक कल्पनारम्य असतो. आजकाल प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या संघर्षांमध्ये इतकी गुंतलेली असते की दुसऱ्याच्या निःशब्द वेदनांचा अर्थ लावण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ किंवा मानसिक अवकाश असेलच, असे नाही. म्हणूनच मनातील भावना व्यक्त करणे ही केवळ सवय नसून, नात्यांना बळ देणारी एक आवश्यक प्रक्रिया आहे. शब्द उच्चारले की त्यांना स्पष्टता मिळते. भावना व्यक्त झाल्या की त्यांना दिशा मिळते, आणि संवाद साधला की गैरसमजांना मागे हटण्यावाचून पर्याय राहत नाही. प्रत्येक वेळी अपेक्षित उत्तर मिळेलच असे नाही, परंतु किमान मनात अपूर्णतेची सल तरी उरत नाही. कारण न बोललेले शब्द आयुष्यभर मनात प्रतिध्वनी रूपाने गुंजत राहतात, तर व्यक्त केलेले सत्य कालांतराने काळाच्या ओघात शांत होते. म्हणून समजून घेण्याची वाट पाहण्यात आयुष्य खर्च करण्यापेक्षा, मनातील गोष्ट प्रामाणिकपणे मांडत राहणे अधिक शहाणपणाचे आहे. कारण मौन अनेकदा नात्यांचा शेवट लिहिते, तर संवाद नेहमीच नव्या सुरुवातीची शक्यता जिवंत ठेवतो.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट