रविवार, २६ जुलै, २०२६

#१७२ ❤️‍🩹🫂

क्षण कधी संपतात आणि आठवणी कधी बनतात, हे समजण्याच्या आतच हातातील वहीचं शेवटचं पान उलटलं जातं. खूप सुंदर सुंदर क्षण, स्वप्नं आणि आठवणी लिहून तिचा कोपरा न कोपरा भरायचा, म्हणून अगदी कौतुकाने हाती घेतलेल्या त्या एका देखण्या वहीचं आज बहुतेक शेवटचं पान आलंय. माणसाला आपल्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी कधीच संपाव्या असं वाटत नसतं. कोणत्याही पुस्तकाचं, डायरीचं किंवा एका सुंदर पर्वाचं शेवटचं पान इतक्या लवकर यावं, असं कोणाला बरं वाटेल.? आपण तर खूप मोठी रोजनिशी लिहायला घेतली होती. त्यात सुखाचे रंग भरायचे होते, अजून कितीतरी जागा रिकाम्या ठेवून त्यात भविष्यातल्या गप्पा लिहायच्या होत्या. पण अचानक लक्षात येतं की, आपण फक्त कागद आणि शाई हातात धरून बसलोय. खरी कथा तर दुसरीकडेच लिहिली जातेय. जेव्हा स्वतः नियती लेखणी तिच्या हातामध्ये घेते, तेव्हा मात्र आपलं काहीएक चालत नाही. तिचे ओरखडे कागदावर उमटतात आणि आपण फक्त ते उघड्या डोळ्यांनी पाहत राहतो. माणसाचं आयुष्यही असंच या शेवटच्या पानाच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहतं. जुनं सगळं संपत चालल्याची एक अनामिक हुरहूर काळजात दाटून येते. मागे वळून पाहिलं की धुळीने माखलेले रस्ते दिसतात, काही सुटलेले हात दिसतात आणि काही विरून गेलेली स्वप्नं समोर उभी राहतात. पण नेमकं याच वळणावर, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच कुठेतरी एक नवी ऊब हवी असते. या कोरड्या होत चाललेल्या पानांवर नियतीने आता एक नवी उमेद द्यावी. पुन्हा एकदा श्वास घेण्याचं, आनंदाने आणि ताठ कण्याने जगण्याचं एक ठोस कारण समोर आणून ठेवावं, बस्स... एक एवढीच त्या निर्मिकाच्या, त्या अदृश्य सूत्रधाराच्या चरणी माझी प्रार्थना आहे. शेवटचं पान संपलं तरी वही संपत नसते, ती एका नव्या पुस्तकाची सुरुवात असते. भूतकाळाच्या खाचखळग्यांतून पाय काढत, भविष्याच्या अनोळखी वाटेवर विश्वासाने पहिलं पाऊल टाकणं म्हणजेच #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 अन् हे जगणं कसंही असलं, तरी त्यातली जगण्याची ऊर्मी कधी आटू नये, एवढीच या मनाची धडपड आहे.!🎭

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...