पण मला एका गोष्टीची भयंकर भीती वाटते. समजा, उद्या ती माझ्या जवळ आली, आम्ही संसार मांडला किंवा नात्याच्या त्याच जुन्या चक्रात अडकलो, आणि अचानक एखाद्या निवांत दुपारी किंवा उदास संध्याकाळी, तिला माझ्या या नव्या, गुळगुळीत आणि सुसंस्कृत अवतारात त्या जुन्या 'माझी' आठवण आली तर.? समजा, माझ्या एखाद्या जुन्या सवयीची चुणूक तिला दिसली, किंवा माझ्या डोळ्यांत तो जुना, बंडखोर जाळ तिला चमकताना दिसला, तर ती काय करेल.? ती दचकेल. तिला वाटेल, हा माणूस अजून बदललेला नाही. ज्या जुन्या 'मी' ला नाकारून ती गेली होती, तोच भूतकाळ तिच्या समोर उभा ठाकेल.
अशा वेळी मी काय करायचं.? त्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं.? जगणं हा एक सोंग घेण्याचा धंदा आहे. अशा वेळी अत्यंत निर्विकार चेहेरा करून तिला सांगावं लागेल, "तू ज्याला शोधतेयस, तो माणूस बऱ्याच वर्षांपूर्वीच मरण पावलाय. आता इथे फक्त एक चालतंबोलतं प्रेत आहे, जे तुझ्या सोयीनुसार हालचाली करतं." किंवा मग सरळ हसण्यावारी नेऊन म्हणावं, "माणसाला जुन्या गोष्टींचा भास होत असतो, तो केवळ एक भ्रम आहे." स्वतःच्या मृत आत्म्याची साक्ष काढत, तिच्या समाधानासाठी पुन्हा एकदा खोटं बोलावं लागेल. नाती टिकवण्यासाठी माणसाला कितीवेळा स्वतःला मारावं लागतं, याचं गणित कुठल्याच पुस्तकात नसतं. मी फक्त एक मूक प्रेक्षक बनून माझ्याच अंताचा सोहळा पाहत राहीन.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂