#१८४ ❤️🩹🫂
घर विकणे म्हणजे केवळ विटा, सिमेंट आणि लाकूड यांचा व्यवहार नसतो. काही घरांच्या भिंतींमध्ये वर्षानुवर्षे साठलेल्या आठवणी असतात, आणि काही उंबरठ्यांवर आयुष्यभराची पावले रेंगाळलेली असतात. त्याला पैशांची तशी काहीच अडचण नव्हती. कारण पैसा तर भरपूर प्रमाणात होताच. पण आता त्याला त्या जुन्या आठवणींतून कायमचं बाहेर पडायचं होतं. ते शक्य होतं की नव्हतं हे त्याला ठाऊक नव्हतं, पण त्याला निदान तसा प्रयत्न तरी करून पहायचा होता. त्या दिवशी त्याने दलालाच्या हातात कागद दिले, तेव्हा बाहेरून तो पूर्णपणे शांत दिसत होता. मात्र आतून त्याचे संपूर्ण बालपण प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत उभे होते.
हे तेच घर होते—
जिथे त्याने पहिल्यांदा धावायचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्याने गुडघे फोडून घेतले होते. जिथे आईच्या हाकेत संध्याकाळ उतरायची, आणि बाबांच्या पावलांच्या आवाजात घराला सुरक्षिततेची चाहूल लागायची. जिथे पावसाच्या पहिल्या सरींचा सुगंध मातीपेक्षा आधी मनात दरवळायचा. आणि... जिथे समोरच्या घराच्या गॅलरीत उभ्या असलेल्या त्या एका चेहऱ्याने, प्रेमाचा अर्थ अजून शब्दांतही न समजणाऱ्या एका मुलाच्या हृदयात आयुष्यभरासाठी एक न बोललेली कथा लिहून ठेवली होती. त्याचं ते प्रेम कधी व्यक्त झालं नव्हतं. कधी हातात हात आला नव्हता. कधी वचनं दिली गेली नव्हती. तरीही त्या गल्लीतून जाताना त्याचं हृदय नकळत धडधडायचं. त्या खिडकीकडे पाहण्याची त्याची सवय वर्षानुवर्षे तशीच राहिली होती. काळाने त्या गल्लीतले चेहरे बदलले... दारांवरची नावं बदलली... झाडं मोठी झाली... रस्त्यांवर नवीन डांबर चढलं... पण त्याच्या मनातलं ते घर मात्र अजूनही तसंच होतं... एका लहान मुलाच्या निष्पाप स्वप्नांनी भरलेलं. आज त्या घराला कुलूप लावताना त्याने शेवटचं प्रत्येक खोलीकडे पाहिलं. भिंती काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या शांततेत हजारो आठवणींचा हुंदका दडलेला होता. उंबरठा ओलांडताना त्याला क्षणभर वाटलं, जणू हे घर त्याला थांबवून म्हणत आहे, "तू मला विकू शकतोस... पण माझ्यात जगलेलं तुझं आयुष्य कुठे विकणार आहेस?" त्याने हळूच मागे वळून पाहिले. दार बंद झाले. कुलूप लागले. व्यवहार पूर्ण झाला होता. पण त्या क्षणी विकलं गेलं ते घर नव्हतं... विकला गेला होता त्याच्या आयुष्याचा तो निरागस ऋतू, ज्यात प्रेमाला नाव नव्हतं, आठवणींना किंमत नव्हती, आणि प्रत्येक संध्याकाळ उद्याच्या आशेवर जगत होती. त्याच्या त्या स्वप्नातल्या छोट्याशा गल्लीत आता त्याचं असं काहीच उरलं नव्हतं...
पण त्याला सतत एक छोटासा मुलगा धावत गेल्याचा भास होत होता.. धावत असताना त्या मुलाची नजर त्या खिडकीकडे स्थिरावली होती, आणि बहुतेक त्याला अजूनही वाटत होते की, "काही घरे सोडून जाता येतात, पण काही घरे आयुष्यभर आपल्याला सोडत नाहीत.!" 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂