#१८७ ❤️🩹🫂
कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका प्रेम अपूर्ण राहण्यात नसते, ती वेळेच्या अयोग्यतेत असते. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात उशिरा येतात, परंतु मन मात्र त्यांची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून करत असते. म्हणूनच तुझे येणे माझ्यासाठी अनपेक्षित नव्हते, ते माझ्या दीर्घ प्रतीक्षेचे उत्तर होते.
खरंतर तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी ज्या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक होते, त्यांचा विचार तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्यानंतर करू लागलीस. तोपर्यंत मी माझ्या भावना कोणत्याही हिशेबाशिवाय जगत होतो. कारण प्रेमाला गणित लागू होत नाही, त्यासाठी केवळ समर्पण आवश्यक असते.
तुझ्या आयुष्यात माझे कोणतेही स्थान नसतानाही मी तुझ्यावर मनापासून प्रेम करू शकलो, तर तू स्वतःहून माझ्या आयुष्यात आल्यानंतर त्या प्रेमाचा प्रवाह मी कसा थांबवू शकलो असतो.? नदीला तिच्या उगमाचे विस्मरण होत नाही, त्याचप्रमाणे मनालाही त्याच्या प्रेमाचे विस्मरण होत नाही.
खरंतर हे तुला खूप आधीच उमगायला हवं होते. परंतु कदाचित तू जाणूनबुजून त्या सत्याकडे दुर्लक्ष करत राहिलीस. कारण सत्य स्वीकारण्यासाठी धैर्य आवश्यक असते, आणि काही सत्ये स्वीकारली तर आयुष्याचे सर्व हिशेब बदलून जातात.
इतिहासात असे अनेकदा घडले आहे. पानिपतच्या रणांगणावर पराभव एका दिवसात झाला, परंतु त्याची चाहूल अनेक दिवस आधी लागली होती. तरीही ती गांभीर्याने घेतली गेली नाही. आपल्या नात्याबाबतही असेच झाले. शेवट अचानक झाला नाही. त्याची चिन्हं खूप आधीपासूनच दिसत होती.
एखाद्या गडाच्या तटांवर उभे राहिल्यावर आजही जाणवते, भक्कम गडकिल्ले एका क्षणात कोसळत नाहीत. आधी त्यांच्या भेगा दुर्लक्षित केल्या जातात. आपल्यातल्या विश्वासालाही अशाच भेगा पडत गेल्या, आणि आपण त्या पाहण्याचे टाळत राहिलो.
मला आता असे वाटू लागले आहे की मी तुझ्यात किती खोलवर गुंतत चाललो होतो, याची तुला पूर्ण जाणीव होती. आणि कदाचित हाच तुझ्या मनातील सर्वात मोठा संघर्ष होता. माझे प्रेम तुला नको नव्हते, मात्र त्या प्रेमाची किंमत तुझ्या वर्तमानाला चुकवावी लागू नये, एवढीच तुझी धडपड होती.
तुझ्या सुखी संसारावर माझ्या भावनांची सावलीही पडू नये, म्हणून तू हळूहळू माझ्यापासून दूर जाऊ लागलीस. संवाद कमी झाले, भेटी विरळ झाल्या, आणि अखेरीस आपलं नातं तुटलं नाही... ते फक्त शांत झालं. इतकं शांत की त्या शांततेचा आवाजही आज माझ्या मनात घुमत राहतो.
मी तुला दोष देत नाही. कारण काही निरोप विश्वासघातामुळे नसतात, ते जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दिले जातात. काही अंतरं द्वेषामुळे नसतात, ती कोणाच्यातरी आयुष्याचे नुकसान होऊ नये म्हणून स्वीकारलेली अपरिहार्यता असते.
आजही तुझी आठवण आली की मनात एकच प्रश्न वारंवार उभा राहतो की, जर हे सर्व तुला आधीच माहीत होते, तर मला इतके जवळ येऊच का दिलेस..?
कदाचित या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडेही नसेल. आणि म्हणूनच काही प्रेमकथा इतिहासात नोंदवल्या जात नाहीत. त्या केवळ दोन मनांच्या भग्न अवशेषांमध्ये जिवंत राहतात.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂