गुरुवार, २ जुलै, २०२६

#MH12 ❤️‍🩹🫂

प्रवास माणसाला फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात नाही, तर तो नकळत त्याला त्याच्या भूतकाळातही घेऊन जात असतो. माझ्याबाबतीत तर हे वारंवार घडतं. कामानिमित्त रोजचा प्रवास ठरलेलाच. प्रवासात दररोज नवे चेहरे भेटतात. कधी कधी तर दिवस इतका धावपळीत जातो की, स्वतःसाठी विचार करायलाही वेळ मिळत नाही.

पण नियतीला बहुतेक हे माझं शांत राहणं अजिबात आवडत नसावं.

म्हणूनच दररोजच एखाद्या चौकात, एखाद्या वळणावर किंवा महामार्गावर माझ्या समोरून अगदी भरधाव वेगाने एखादी गाडी जाते,

तिच्या नंबरप्लेटवर लिहिलेलं असतं... #MH12

आणि त्या क्षणी, अगदी अचानकच जणू कुणीतरी माझ्या छातीवर अलगद हात ठेवल्याचा भास होतो.

ती गाडी पुढे निघून गेलेली असते. पण माझं मन तिच्यामागे बराच वेळ धावत राहतं. इतरांना कदाचित तो फक्त एका जिल्ह्याचा नंबर वाटत असेल. पण माझ्यासाठी तो एक माझ्या संपूर्ण आयुष्याचा पत्ता आहे. त्या दोन अक्षरांत आणि आकड्यांत माझ्या आयुष्यातला एक सदाबहार ऋतू अजूनही श्वास घेतो आहे. जिथे अजूनही तुझं हसणं ऐकू येतं, तुझ्यासोबत अगदी विनाकारण तासनतास मारलेल्या गप्पा ऐकू येतात,  तुझ्या हातावरची ती मेहंदी आठवते, दररोज संध्याकाळी माझ्या कॉल/मेसेजची वाट पाहणारी तू आठवतेस, आणि खरंच... त्या सर्व आठवणींच्या रूपाने तू अजूनही माझ्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग आहेसच. आणि मी कुठे आहे कुणास ठाऊक..?

वेळेनं कॅलेंडरची पानं बदलली. नाती बदलली. आपले पत्ते ही बदलले. मोबाईल नंबर ही बदलले. पण काही आठवणींचे पत्ते मात्र आयुष्यभर बदलतच नाहीत, आणि त्यांना कुलूपबंद ही करता येत नाही. उलट अगदीच क्षुल्लक वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीने त्या पुन्हा उघडतात.
आणि माझ्यासाठी या सा-या आठवणी पुन्हा ताज्या मोकळ्या करणारी किल्ली म्हणजे... #MH12

मला ना कधी कधी स्वतःचंच फार फार हसू येतं. एखादी नंबरप्लेटही माणसाला रडवू शकते, यावर कोण विश्वास ठेवेल.? पण ज्यांनी मनापासून कुणावर प्रेम केलंय, ज्यांचा स्वतःचा जिवलग अशा एखाद्या शहरात विसावला आहे, त्यांना हे सांगावं लागत नाही. त्यांना माहीत असतं, आठवणींना चेहरा नसतो. त्या कधी एखाद्या गाण्याच्या रूपाने भेटतात, कधी एखाद्या पावसाच्या थेंबात, कधी एखाद्या फुलाच्या सुगंधात, आणि कधी..... फक्त एका नंबरप्लेटवर.!

आजही समोरून #MH12 लिहिलेली गाडी गेलेली दिसली की, नकळत माझं मन तुझ्या उंबरठ्याशी, तुझ्या गल्लीच्या वाटेवर धावत जाऊन पोहोचतं. आता तू त्या तिथे नाहीयेस हे मला ठाऊक असूनही तिथं येण्याचा माझा मोह आजतागायत सुटलेला नाही आणि कधी सुटणार ही नाही. तरीही कधीकधी मनात विचार येऊन जातो की, बस्स... आता नको ती जुन्या आठवणींची वाट तुडवायला. पण तितक्यात लक्षात येतं की, काही वाटा चालणं आपण तर सोडून देतो, पण त्या वाटा मात्र आपल्याला आठवणं कधीच सोडत नाहीत.

म्हणूनच आता माझ्या दररोजच्या प्रवासात मी फक्त गंतव्यस्थानी पोहोचत नाही, मी दररोज एकदा तुझ्यापर्यंतही जाऊन येतो. फरक इतकाच की, पूर्वी त्या प्रवासाच्या शेवटी तू भेटायचीस, पण आता फक्त डोळ्यांच्या कडा ओलावतात.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...