प्रिय मित्र गुप्ता जी... ❤️🫂

प्रिय मित्र गुप्ता जी... ❤️🫂

One Man Show.... 🔥 🔥 

पत्रास कारण की, आज तुमचा वाढदिवस.

सर्वप्रथम मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

देवाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला भरभरून आनंद द्यावा, एवढीच प्रार्थना.


खरं सांगायचं तर, तुझा वाढदिवस हा फक्त तुझा राहत नाही. तो आमच्यासाठीही एक सण बनून जातो. विशेषतः वहिनी आणि समर्थच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की जाणवतं, काही माणसं फक्त स्वतःचं आयुष्य जगत नाहीत, ती आपल्या माणसांचं जगही उजळवत असतात.

कधी कधी मला वाटतं की, काही नात्यांना नाव देण्याचा प्रयत्नच करू नये. कारण शब्दांची मर्यादा असते, पण माणसाच्या जिव्हाळ्याची नसते. काही नाती रक्ताची नसतात, तरी ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही जवळची असतात. त्यात अपेक्षा नसतात, हिशेब नसतात. असतो तो फक्त जिव्हाळा.


माझ्या आयुष्यातला असाच एक जिवंत, उबदार आणि निस्वार्थ अध्याय म्हणजे तू. एक माणूस म्हणून, माणूसकीचं नातं जपणारा माणूस म्हणून तू इतका मोठा आहेस की तुला मिठीत घ्यायला गेलं की हात कमी पडतात, आणि तुझ्याबद्दल लिहायला बसलं की शब्द अपुरे पडतात.


'मित्र', 'दोस्त', 'सखा' हे शब्द जेव्हा जेव्हा कानावर पडतात, तेव्हा सर्वप्रथम डोळ्यांसमोर तुझाच चेहरा उभा राहतो. कारण त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तू तुझ्या जगण्यातून सिद्ध केलायस, आणि अजूनही करतो आहेस.


रात्र असो की पहाट... आनंदाचा क्षण असो की संकटाची वेळ... मी फक्त हाक दिली, आणि तू मागे वळून पाहिलंस, असं कधी झालंच नाही. तू नेहमी धावत आलास. माझं दुःख स्वतःचं मानलंस आणि माझा आनंद स्वतःच्या चेहऱ्यावर मिरवलास.


माझी झोळी तुझ्या मायेने, तुझ्या आधाराने आणि तुझ्या प्रेमाने इतकी भरून गेली आहे की, आयुष्यभर ते ऋण फेडण्याचा प्रयत्न केला तरी कमीच पडेल.


पण या सगळ्यात एक खंत कायम मनाला टोचत राहते. तुला ज्या वेळी माझी सर्वाधिक गरज होती, त्या वेळी मी तुझ्यासोबत नव्हतो. त्या क्षणाची सल आजही मनात तशीच जिवंत आहे, आणि नेहमीच राहणार. आश्चर्य म्हणजे, तू त्या गोष्टीचा साधा उल्लेखही कधी केला नाहीस. उलट पूर्वीसारखंच प्रेम दिलंस. तेव्हा जाणवलं, मोठेपणा शब्दांत नसतो, तो क्षमा करण्यात आणि नातं आहे तसंच जपण्यात असतो.


आज या तुझ्या वाढदिवशी मी मोठमोठी वचने देणार नाही, पण एवढं मात्र नक्की सांगतो की, पुन्हा आयुष्याने अशी वेळ आणली, तर त्यावेळी तुझ्या खांद्याला खांदा लावून, तुला भावनिक आधार द्यायला उभा असलेला पहिला माणूस नक्कीच मी असेन. 🫂


बाकी काय... मजेत असतोसच, आणखी मजेत रहा. हसत असतोसच, आणखी हसत रहा. विशेषकरून स्वतःची काळजी घे. कारण आता तुझ्या हृदयाची धडधड फक्त तुझ्यासाठी नाहीये. त्या धडधडीवर वहिनीचं हसू आणि आपल्या लाडक्या समर्थचं संपूर्ण जग अवलंबून आहे. आणि हो...

माझ्या आयुष्यात तू आहेस, हीच माझ्यासाठी देवाने आजवर दिलेली सर्वात सुंदर भेट आहे.


खूप खूप प्रेम मित्रा... खूप खूप प्रेम.. ❤️🫂


आणि पुन्हा एकदा... 

वाढदिवसाच्या मनःपूर्वक, मनापासून खूप खूप खूप शुभेच्छा! ❤️🎂🫂

लोकप्रिय पोस्ट