जितेपणीच अमर झालो, जेव्हा मी तुझा झालो.! ❤️🩹🫂
कधी कधी मला स्वतःचंच हसू येतं. कारण माझ्या मनाला आता कळून चुकलं आहे की, तू कधीच परत येणार नाहीस, आपल्यामधलं सगळं काही कधीच पूर्वीसारखं होणार नाही. आणि हे सगळं काही माझ्या मनाने मान्यही केलं आहे. पण तरीसुद्धा माझ्या नजरा का कुणास ठाऊक अजूनही हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत.
आजही गर्दीतून चालताना नकळत प्रत्येक चेहरा तुझ्यासारखा वाटून जातो. एखाद्या पैंजणाचा आवाजही माझ्या जीवाला वेड लावून जातो. एखादी पाठमोरी आकृती अचानक तुझा भास देऊन जाते अन् मी वेड्यासारखा मागे मागे धावत राहतो. तुझ्याकडून ऐकलेला एखादा शब्द कुठेतरी ऐकला की माझा जीव क्षणार्धात जुन्या आठवणींचा मागोवा घेण्यात हरवून जातो. आपली गल्ली, आपला चौक, आपलं मार्केट या आठवणीतल्या प्रत्येक वळणावर मी दररोज थांबतो, त्या प्रत्येक ठिकाणी तुला बघतो. खरंतर तिथं तू नसतेसच, पण मी तू तिथं असण्याचा भास जगतो. पण तितक्यात अंतर्मनातून आवाज येतो की, "नाही... ती इथे नाही."
मला माहितीये, माझी ही सवय आता निरर्थक झाली आहे. पण काही सवयी या तर्काने नाही, तर प्रेमाने जिवंत राहतात, आणि आपल्याला जिवंत ठेवतात. तुला शोधण्यात माझा प्रत्येक दिवस संपतो. आणि तू न सापडण्यात प्रत्येक रात्र पुन्हा सुरू होते.
या सगळ्याचा खरंतर मला खूप खूप त्रास होतो. इतका की काही क्षण स्वतःपासूनही दूर दूर पळून जावंसं वाटतं. पण गंमत अशी की, या त्रासापासून मुक्त व्हावं असंही कधी मनापासून वाटत नाही. कारण या वेदनेच्या निमित्ताने का होईना पण तू अजूनही माझ्यात जिवंत आहेस.
तुला शोधण्याची ही सवय म्हणजे माझ्या प्रेमाचा शेवटचा श्वास आहे. ती संपली, तर कदाचित माझ्यातलं तुझ्यावरचं प्रेमही कुठेतरी हरवून जाईल, आणि ते मला अजिबात मान्य नाही.
लोक म्हणतात, पुढे निघून जा. विसरून जा. नव्याने जग. पण त्यांना कसं सांगू... काही माणसं आयुष्यातून जातात, मात्र मनातून कधीच जात नाहीत. त्यांच्यासाठी दार तर बंद झालेलं असतं, पण खिडक्या कायम सताड उघड्याच राहतात. आज मी तुला शोधतो, कारण मला खात्री आहे म्हणून नाही, तर तू कधीकाळी माझं संपूर्ण जग होतीस म्हणून.
मला माहितीये, कदाचित तू हे कधीच वाचणार नाहीस. कदाचित तुला याचं काहीच वाटणार नाही. पण माझ्या प्रत्येक दिवसाचा हा एक न बोललेला विधी आहे.. तुला जगणं, तुझी सोबत जगणं, तुला आठवण आणि इतरांच्या नकळत सतत माझ्या आजूबाजूला तुला शोधत राहणं.
आता आपल्या दोघांतील सगळं काही संपलं आहे, हे सत्य आहे. पण तरीही अजूनही मी फक्त तुझाच आहे, हीसुद्धा तितकीच खरी गोष्ट आहे. आणि बहुतेक म्हणूनच, प्रत्येक वेळी तू मला न सापडूनही, मी तुला शोधतच राहतो. कारण काही प्रेमकथा एकत्र येऊन पूर्ण होत नाहीत, त्या आयुष्यभर कोणाची तरी वाट पाहण्यातच अमर होऊन जातात.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂