शेवटच्या पानाकडे... ❤️🩹🫂
बऱ्याच दिवसांपासून फोनच्या त्या नोट्समध्ये काही शब्द पडून आहेत. काही अपूर्ण, काही अर्धवट, तर काही शेवटच्या श्वासासारखे पूर्ण. प्रत्येक ओळीत एक दिवस बंदिस्त आहे, प्रत्येक परिच्छेदात एखादी रात्र अजूनही जागी आहे.
कधीकाळी वाटायचं, हे सगळं कधीतरी पुस्तक बनेल. कोणीतरी वाचेल, समजून घेईल, आणि त्या शब्दांमध्ये माझा एक तुकडा शोधेल. पण आता तसं काही वाटत नाही.
आता फक्त एवढंच वाटतं, जे काही साठवून ठेवलं आहे, ते एकदाचं जगासमोर ठेवून मोकळं व्हावं. कारण काही गोष्टी जपण्यासाठी नसतात, त्या फक्त मनातून उतरवण्यासाठी असतात.
त्या नोट्स उघडल्या की अजूनही काही आठवणी हळूच खांद्यावर हात ठेवतात. काही शब्द अजूनही विचारतात,
"खरंच... इथंवरच..?"
उत्तर मात्र आजकाल कुठेच सापडत नाही.
पूर्वीसारखी नवीन वही घेण्याची ओढ उरलेली नाही.
कोऱ्या पानांचा गंधही आता मनाला हाक मारत नाही.
शब्द तर अजूनही खूप आहेत,
पण त्यांना जन्म देण्याइतकं बळ मनात उरलेलं नाही.
कधी कधी वाटतं,
लेखन थांबत नाही, फक्त लेखक शांत होत जातो.
मनात वादळं तशीच असतात,
पण त्यांना वाक्यांत बदलण्याची ताकद कुठेतरी मागे राहून जाते. कदाचित ही माझी शेवटची मांडणी असेल.
शेवटंचा कबुलीजबाब.
शेवटची उधळण.
हे सगळं इकडं-तिकडं टाकून एकदाचा मोकळा झालो,
की पुन्हा पेन हातात घेईन असं वाटत नाही. कारण लिहिण्यासाठी फक्त शब्द पुरत नाहीत,
त्यामागे जगण्याची एक हट्टी इच्छाही असावी लागते. आणि तीच इच्छा हल्ली नकळत विरघळून गेलीय.
म्हणून आता जे काही उरलंय,
ते स्वतः सकट फक्त संपवायचं आहे. सुरुवात करण्यासाठी नाही,
तर मनात वर्षानुवर्षे अडकून पडलेल्या प्रत्येक शब्दाला शांत निरोप देण्यासाठी.
कदाचित यानंतर मी लिहिणार नाही.
पण कधीतरी माझे हे शब्द कोणाच्या हातात पडले,
तर त्यांना एवढंच जाणवावं की, एक माणूस होता,
जो शेवटपर्यंत शब्द लिहित राहिला नाही,
तर शब्दांमध्येच हळूहळू विरघळत गेला होता.! 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🫂