Gen Z चे YZ आंदोलन...
आज जंतरमंतर आणि संसद भवनाच्या परिसरात Gen Z आंदोलनाच्या नावाखाली जो काही तमाशा झाला, त्याला निव्वळ आणि निव्वळ पोरखेळच म्हणावा लागेल. खरं सांगायचं तर, हा लोकशाहीचा किंवा अधिकारांचा लढा नाही, तर ही सरळ सरळ वैचारिक दिवाळखोरी आणि उथळपणाचे प्रदर्शन आहे. आजकालच्या या नव्या पिढीला इतिहास माहिती नाही आणि वर्तमानाचे भान नाही. केवळ सोशल मीडियावर चार लाईक्स मिळवण्यासाठी आणि काही Reels बनवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च कायदा बनवणाऱ्या संस्थेच्या दारात जाऊन स्टंटबाजी करायची, हाच या आंदोलकांचा एकमेव अजेंडा दिसतोय.
कुठल्याही आंदोलनाला एक नैतिक अधिष्ठान असावं लागतं, एक ठोस वैचारिक बैठक असावी लागते. पण इथे काय दिसतंय..? कसलाही अभ्यास नाही, मागण्यांमध्ये कोणतीही स्पष्टता नाही, फक्त गोंधळ घालणे आणि स्वतःला मोठे 'क्रांतिकारक' म्हणून प्रस्थापित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. याला आंदोलनाच्या नावाखाली चाललेली 'वायझेडगिरी' नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं..? संसद भवन ही काय तुमच्या कॉलेजची कँटीन किंवा पिकनिक स्पॉट आहे का, जिथे जाऊन तुम्ही कसलेही नियम न पाळता हुल्लडबाजी करणार..?
मुख्य प्रवाहातील काही माध्यमं आणि स्वतःला विचारवंत म्हणवणारे काही पांढरपेशा लोक या उथळपणाचे 'युवा क्रांती' म्हणून कौतुक करायला लगेच पुढे सरसावतात, ही तर याहून मोठी शोकांतिका आहे. पण सामान्य जनतेला डोळे आहेत आणि त्यांना यामागचा फोलपणा स्पष्ट दिसतोय. लोकशाहीने प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार दिला आहे, पण त्या अधिकाराचा वापर जेव्हा निव्वळ स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेची थट्टा उडवण्यासाठी केला जातो, तेव्हा त्याला अराजकता म्हणतात. आज जंतरमंतरवर जे घडलं, ते देशाच्या सुजाण नागरिकाला अस्वस्थ करणारं आहे. या तथाकथित आंदोलकांनी आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सूत्रधारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, स्टंटबाजीने हेडलाईन्स मिळवता येतात, पण इतिहास घडवता येत नाही. हा निव्वळ पोरकटपणा असून, अशाने देशाचे किंवा या पिढीचे कोणतेही भले होणार नाही, हेच आजच्या या संपूर्ण प्रकरणाचे ढळढळीत सत्य आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂