कधी कधी आयुष्य आपल्याला आरशासमोर उभं करत नाही, तर आपल्या आईबाबांच्या चेहऱ्यासमोर उभं करतं. त्या चेहऱ्यावर काळाने अलगद उमटवलेल्या सुरकुत्या म्हणजे केवळ वाढतं वय नसतं, त्या असतात आपल्या आयुष्याच्या उरलेल्या ऋतूंची निःशब्द गणितं. प्रत्येक सुरकुती जणू हेच सांगत असते की वेळ कुणासाठीही थांबत नाही.
अलीकडे त्यांच्याकडे पाहताना मनात एक अनामिक हुरहूर दाटून येते. पूर्वी जे हात मला धरून चालायला शिकवत होते, तेच हात आता किंचित थरथरू लागले आहेत. जे डोळे माझ्या प्रत्येक वेदनेआधी माझं दुःख ओळखायचे, त्या डोळ्यांत आता थकव्याची एक हलकीशी छाया दिसू लागली आहे. आणि त्या छायेची जाणीव मला अस्वस्थ करून रात्रभर जागं ठेवते आहे.
आपण मोठे होतो, कमावतो, जगाशी दोन हात करतो, परंतु आईबाबा वृद्ध होत आहेत, ही वस्तुस्थिती स्वीकारण्याइतके मोठे आपण कधीच होत नाही. कारण त्या क्षणी आपल्या आतलं लहान मूल अजूनही त्यांच्या कुशीत डोकं ठेवून निर्धास्त झोपायचा हट्ट धरून बसलेलं असतं.
मनात कधी कधी एक बालिश विचार येतो. वाटतं, जगातील प्रत्येक आईबाबांना अमरत्व लाभलं असतं तर..? देवाने बाकी काही दिलं नसतं तरी चाललं असतं, पण एवढं एक वरदान दिलं असतं, तर किती लेकरांची भीती कायमची संपली असती. किती घरांना विरहाचा अर्थच कळला नसता.
पण वास्तवाला स्वप्नांची भाषा कधीच समजत नाही. त्याला फक्त वेळेची भाषा समजते. आणि वेळ हा जगातील सर्वात कठोर शिक्षक आहे. तो प्रत्येकाला एक दिवस अशी शिकवण देतो, जिची परीक्षा द्यायची इच्छा कुणालाच नसते.
ही जाणीव मनाच्या एखाद्या खोल कप्प्यात सतत जिवंत असते की, आज नाही तर उद्या... उद्या नाही तर कधीतरी... अशी एक सकाळ उगवेल, ज्या दिवशी घर तेच असेल, भिंती त्याच असतील, आठवणी त्याच असतील, पण "आई" म्हणून हाक मारली तरी प्रतिसाद येणार नाही, आणि "बाबा" म्हणून दारात उभं राहिलं तरी ओळखीचं हास्य दिसणार नाही.
त्या दिवशी खरं तर घर रिकामं होणार नाही, रिकामं होणार आहे मन. कारण माणसं जात नाहीत, त्यांच्यासोबत आपल्या आयुष्यातला एक संपूर्ण काळ निघून जातो. त्यांच्या पावलांच्या आवाजासोबत आपल्या अस्तित्वाचं एक सुरक्षित छप्परही अदृश्य होतं.
कदाचित म्हणूनच आज त्यांच्या प्रत्येक हसण्याकडे मी जास्त वेळ पाहतो. त्यांच्या प्रत्येक बोलण्याला मनात साठवून ठेवतो. कारण उद्या आठवणी उरतील, पण त्या आठवणींना नवीन क्षणांची साथ मिळणार नाही.
आयुष्याचा सर्वात मोठा विरोधाभास हाच असावा की ज्यांच्या आधारावर आपण उभं राहायला शिकलो, जगायला शिकलो, चांगलं वाईटाची ओळख करू शकलो, त्यांच्याशिवाय ही उभं राहण्याची तयारी आयुष्य आपल्याकडून आपल्याही नकळत करून घेतच असतं.
तरीही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात आजही तेच लहान मूल हट्टाने बसलेलं आहे. देवाकडे हात जोडून एकच निरागस मागणं करत आहे, "बाकी काही नको... फक्त आईबाबांना माझ्यापेक्षा जास्त आयुष्य दे. कारण त्यांच्याशिवाय उरलेलं आयुष्य जगणं म्हणजे श्वास घेणं असेल, पण जगणं कधीच नसेल."
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂