सोन्याचा पिंजरा... ❤️‍🩹🫂

हे असं आहे तर सगळं. आपण आपलं एकेक पाऊल टाकत चाललोय असं वाटतं, पण खरं तर आपण एकाच जागी गरगर गिरक्या घेतोय. ही जी चाकोरी म्हणतो आपण, ती काही आपण स्वतः तयार केलेली नसते. समाज नावाचा एक अवाढव्य, आळशी अजगर असतो. त्याने आखून दिलेली ही वाट असते. त्या वाटेवरून सरपटत गेलं की लोक टाळ्या वाजवतात. पण चुकून कधीतरी आतला माणूस जागा होतो. त्याला वाटतं, 'बस्स, आता स्वतःच्या भाषेत बोलावं.' तो चार शब्द लिहितो. ते शब्द कोणाला सुखावण्यासाठी नसतात, ती फक्त आतल्या अंधाऱ्या खोलीत साचलेली धूळ झटकण्याची धडपड असते.

पण इथे तर सगळाच बाजार मांडून बसलेत लोक. कोणाला तुमचं सत्य नको असतं, त्यांना फक्त त्यांच्या सोयीचं मनोरंजन हवं असतं. तुमच्या त्या दोन ओळींनी कोणाच्यातरी सोयीस्कर सुप्त जाणिवांना धक्का लागतो. मग सुरू होतो हा 'DM' नावाचा आधुनिक नरक. तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे शब्द इतके सडतात की त्यांची दुर्गंधी यायला लागते. समोरचा माणूस, ज्याचा तुमच्या जगण्याशी तीळमात्र संबंध नसतो, तो अचानक तुमच्या सात पिढ्यांचा हिशोब काढायला लागतो. तो तुमच्या कुळाचा उद्धार करतो, कारण त्याच्या स्वतःच्या कुळात वैचारिक दारिद्र्याशिवाय दुसरं काही उरलेलं नसतं.

या अशा झुंडशाहीला पाहून हसू येतं आणि कीवही वाटते. आपली भाषा, आपलं संस्कृतीचं अभिमानगीत हे सगळं या असल्या ट्रोल गँगच्या उथळपणात वाहून गेलंय. आपण लिहितो कारण आपल्याला जगायचं असतं. पण हे लोक वाचतात कारण त्यांना कोणालातरी मारायचं असतं. या असल्या अडाणी, हिंस्त्र गर्दीला घाबरून जर आपण आपली लेखणी बोथट केली, तर आपणही त्यांच्यातलेच एक होऊ. त्यामुळे हा कुळाचा उद्धार वगैरे सोडून द्यायचा. हे जग असंच आहे; इथे शहाण्याला वेड्यात काढल्याशिवाय लोकांचा भात शिजत नाही. आपण आपली चाकोरी मोडत राहायची, कारण ती मोडल्याशिवाय आतला कोंब बाहेर येत नाही.!🎭

#मनात_येईल_ते

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट