नमस्कार मित्रांनो...
मैत्री म्हणजे काय.? रोज शेकडो फ्रेंड रिक्वेस्ट येणं, सोशल मीडियावर फोटोंचा पाऊस पाडणं, की वाढदिवसाला स्टेटस ठेवून व्ह्युज मोजणं..? मैत्रीची व्याख्या इतकी पोकळ आणि वरवरची कधीच असू शकत नाही. आजच्या या धावपळीच्या दुनियेत, जिथे आभासी नात्यांचा बाजार भरलाय, तिथे मला माझ्या मनाचा एक कोपरा नेहमीच आठवतो. मला डझनभर मित्रांची गर्दी नकोच आहे. मला हवीये ती फक्त एक-दोन माणसांची साथ, पण अशी साथ जी जीवाभावाची असेल. अगदी आपल्या थ्री इडियट्स मधल्या रँचो, राजू आणि फरहान यांच्या सारखी.!
मला आठवतं, जेव्हा आपण महाविद्यालयिन जीवनाच्या उंबरठ्यावर असतो, तेव्हा सगळ्यांनाच एक भीती असते... भविष्याची, करिअरची, अपयशाची. पण त्या गर्दीत जर दोन अशी वेडी माणसं भेटली, जी तुमच्या पाठीवर हात ठेवून म्हणतात, अरे, ऑल इज वेल..! तू फक्त लढ, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, तेव्हा जग जिंकल्यासारखं वाटतं. खरी मैत्री ती नसते जी तुम्हाला श्रीमंतीत किंवा सुखात शोधत येते. खरी मैत्री तर ती असते, जी तुम्ही रडत असताना तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसत नाही, तर उलट तुम्हाला हसवायला एखादी फालतू आणि वेडसर अतरंगी ट्रीक शोधून काढते.
रँचोने राजू आणि फरहान यांच्यासाठी काय नाही केलं..? फरहानच्या फोटोग्राफीच्या स्वप्नांना पंख दिले आणि राजूच्या मनातली भविष्याची अनाठायी भीती काढून टाकली. आपणही आपल्या आयुष्यात असाच एक रँचो शोधत असतो, किंवा स्वतः कोणासाठी तरी रँचो बनू इच्छितो. ज्याच्या समोर आपल्याला मुखवटा घालावा लागत नाही, ज्याच्या समोर आपण जसे आहोत तसे उघडे-वाघडे, आपले दोष, आपली भीती घेऊन उभे राहू शकतो. जेव्हा अख्खं जग तुमच्यावर हसत असतं किंवा तुमच्यावर शंका घेत असतं, तेव्हा तुमचे ते एक-दोन मित्र जगाविरुद्ध जाऊन तुमच्या बाजूने उभे राहतात. तो विश्वास, तो आधार म्हणजेच खरी मैत्री.
खरं सांगायचं तर, आज या मैत्री दिनाच्या निमित्ताने मला त्या सगळ्या फॉरवर्डेड मेसेजेसचा कंटाळा आलाय. मला आठवतोय तो शांत निवांत क्षण, जिथे आम्ही दोघं-तिघं एकत्र एकाच गाडीवर ट्रिपल बसून चहाची टपरी गाठायचो. एकमेकांचे पाय खेचणं, यथेच्छ टोमणे मारणं, आणि तरीही आतून एकमेकांसाठी जीव तुटणं, हेच तर नातं असतं. मित्र अपयशी झाला की वाईट वाटतंच, पण तो जेव्हा पहिला येतो तेव्हा जास्त वाईट वाटतं, हा थ्री इडियट्स मधला संवाद किती सहजपणे मनाला स्पर्श करून जाणारा आहे ना..? कारण त्यात एक हक्काचा अधिकार असतो, एक गोड मत्सर असतो, जो फक्त आणि फक्त जिवाभावाच्या नात्यातच असू शकतो.
आज जागतिक #मैत्री_दिनाच्या_निमित्ताने मी माझ्या त्या एक-दोन जीवाभावाच्या मित्रांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही आहात म्हणून हे आयुष्य सुंदर आहे, तुम्ही आहात म्हणून या संघर्षाच्या वाटेवर चालताना पायातलं बळ कायम आहे. आपण जास्त बोलत नाही, रोज भेटत नाही, पण मला ठाऊक आहे, मी मध्यरात्री जरी हाक मारली, तरी धावून येणारे तुम्हीच असाल. हीच माझी मैत्री, हाच माझा संसार आणि हेच माझं ऑल इज वेल आहे.!🎭
#मनात_येईल_ते #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂