शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

#१६७ ❤️‍🩹🫂

माणूस कधीकधी नियमांच्या चौकटी इतक्या अचूक आखतो की, त्यात स्वतःच जिवंतपणी अडकलाय हे त्याच्या लक्षातच येत नाही. इतकी वर्षं... हो, बरीच वर्षं आपण एकाच छताखाली काढली. तू रचलेल्या अटी, तू घातलेल्या शर्ती आणि मी त्या निमूटपणे पाळण्यात घेतलेली धन्यता.! या सगळ्या बंधनांना मी माझं कर्तव्य मानलं आणि त्या कर्तव्याच्या ओझ्याखाली असा काही दबून गेलो की, ज्याच्यासाठी हे सगळं करतोय, ते मूळ सत्यच विसरून गेलो.

तुझ्या प्रत्येक अटीचा आदर करता करता, मी माझ्या मनाच्या कोपऱ्यातलं एक नितांत सुंदर सत्य विसरलो. माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेलं ते जीवापाड, अथांग प्रेम.! व्यवहाराची गणितं मांडता मांडता, भावनांचं हे सुवर्णगणित सोडवायचंच राहून गेलं गं. किती विचित्र आहे ना हे..? आपण दोघं एकत्र होतो, एकमेकांच्या श्वासांइतके जवळ होतो, पण तरीही माझ्या मनातलं ते सर्वात महत्त्वाचं वाक्य तुझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. तुला सांगावयाचं राहूनच गेलं की, माझं तुझ्यावर खूप खूप खूप प्रेम आहे... आय लव्ह यू..!

माणसाला बोलायला शब्द कमी पडतात तेव्हा ती अडचण असते, पण जेव्हा शब्द असूनही बोलता येत नाही, ती खरी शोकांतिका असते. मी याच शोकांतिकेत जगलो. मला वाटलं, माझं वागणं, माझं तुझ्या शब्दाबाहेर न जाणं म्हणजेच माझं प्रेम. पण प्रेम हे केवळ वागण्यातून नाही, तर कधीतरी शब्दांतून ओठांवर यावं लागतं, हे समजायला मला इतकी वर्षं लागली.

आज मनावरचे हे सगळे बंधनांचे मुखवटे गळून पडलेत. आज मला त्या शर्तींची, त्या नियमांची अजिबात पर्वा नाही. आज मला फक्त तुझ्या डोळ्यांत डोळे घालून, आजवर साचलेला तो सगळा अथांग प्रेमाचा साठा रिकामा करायचा आहे. मला माहिती आहे, मी खूप उशीर केलाय, पण उमलायला उशीर झाला म्हणून फुलाचा सुवास काही कमी होत नाही, हो ना गं..!? 🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...