तिच्या आठवणींचे मृगजळ समोर ठेवून मी एका आभासी विश्वाचा महाल बांधत गेलो. ती कधीच माझ्या वास्तवाचा हिस्सा नव्हती, आणि नियतीच्या क्रूर चौकटीत ती कधी माझ्या आयुष्याचा भाग होऊही शकत नव्हती. पण मानवी मन हे अत्यंत अनाकलनीय असतं. जे मिळत नाही, त्यामागे धावण्यात त्याला एका वेगळ्याच सुखाचा भास होतो. मीही त्याच भासाच्या हिंदोळ्यावर झुलत राहिलो. तिच्या काल्पनिक सोबतीने मी माझ्या मनात एक स्वतंत्र, देखणा संसार थाटला. त्या संसारात तिच्याशी चालणारे मूक संवाद होते, तिचे मंद स्मितहास्य होते आणि तिच्या अस्तित्वाची एक सुगंधी जाणीव होती. या सुखाच्या अमली अंमलाखाली मी इतका गरगरत राहिलो, की अवतीभवतीचे ठोस वास्तव माझ्यासाठी धुसर बनत गेले. कादंबरीच्या पानांवर ज्याप्रमाणे एखादा वाचक स्वतःला विसरून जातो, तसाच मी माझ्याच कल्पनेच्या कादंबरीत मुख्य नायक होऊन वावरत होतो. या मोहमयी स्वप्नभूमीत मी इतका खोल रुतलो, की माझ्या खऱ्या, जिवंत आयुष्यातील संसाराला कधी सुरुंग लागला त्याचे धागेदोरे कधी विस्कटले, हे मला कळलेच नाही. मी माझ्या त्या काल्पनिक सुखाच्या शोधात ‘ययाती’सारखा भोगी झालो होतो, पण तो भोग केवळ मानसिक पातळीवरचा होता. एका अदृश्य, मृण्मयी मूर्तीची पूजा करताना, माझ्या घरातली सोन्यासारखी माणसं त्यांचा जिवंत जिव्हाळा आणि त्यांच्या डोळ्यांतील माझ्यासाठीची प्रतीक्षा मी पूर्णपणे नाकारत गेलो. जेव्हा स्वप्नांचा हा काचेचा महाल वास्तवाच्या एका छोट्याशा धक्क्याने चक्काचूर झाला, तेव्हा कुठे माझे डोळे उघडले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आज मागे वळून पाहताना फक्त राख उरलेली दिसते. माझ्या खऱ्या संसाराची राख. ज्या संसाराला मी फुलवायला हवे होते, तिथे आज केवळ पश्चात्तापाचा अंधार दाटून आला आहे. कल्पनेच्या अमृताचा घोट घेण्याच्या नादात, मी चालत्या-बोलत्या वास्तवाचे हलाहल प्राशन केले, हीच माझ्या आयुष्याची शोकांतिका ठरली.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂