इथं कोणीही काहीही कसाही का लिहेना, पण तो लिहितो आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण आजकालच्या जमान्यात एकमेकांपासून दुरावलेल्या माणसांना जोडणारी हीच एक खरीखुरी मिसिंग लिंक आहे. हे माझं मत काही उथळ विचारातून आलेलं नाही, तर या जगण्याच्या अथांग गढूळपणातून वर आलेलं एक सत्य आहे.
आज आपण ज्याला प्रगती म्हणतोय, ती प्रत्यक्षात माणसा माणसांमधल्या अंतराची एक मोजपट्टी झाली आहे. प्रत्येक जण आपापल्या सोयीच्या, वातानुकूलित कोशात बंदिस्त झालाय. कोणाला कोणाची सोयरसुतुक उरलेली नाही. शेजारी राहणारा माणूस रात्री मरून पडला, तरी सकाळी दूधवाला येईपर्यंत आपल्याला पत्ता लागत नाही. हे इतकं भीषण तुटलेपण आपण दररोज अंगावर पांघरून जगतोय. अशा या आत्मकेंद्री आणि कमालीच्या कोरड्या झालेल्या जगात, जर एखादा माणूस स्वतःला व्यक्त करायला पाहतोय, तर ते माझ्यासाठी एखाद्या क्रांतीपेक्षा कमी नाही. त्याचा तो लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे, या बधीर झालेल्या समाजाच्या छाताडावर मारलेली एक थाप आहे. तो कसं लिहितो, त्याचं व्याकरण कसं आहे, त्याला संदर्भांची अचूक जोड देता आली आहे की नाही, या सगळ्या पांढरपेशा आणि सुशिक्षित गप्पा मला फोल वाटतात. साहित्याचे निकष लावून लोकांच्या भावनांची नाडी तपासणारे आपण कोण लागून गेलो..? खरा माणूस हा असाच असतो, विस्कळीत, ओबडधोबड आणि स्वतःच्याच जगण्याच्या संघर्षात अडकलेला.
तो जेव्हा लिहितो, तेव्हा तो केवळ अक्षरे उमटवत नसतो. तो त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या जिवंत असण्याचा पुरावा देत असतो. ही जी आजकालची गंडलेली YZ पिढी अन् संस्कृती आहे ना, जिथे नाती फक्त स्क्रीनवरच्या लाईक्स आणि कमेंट्स पुरती उरली आहेत, तिथे हे असं कसंही लिहिलेलं वाक्य म्हणजे दोन माणसांच्या काळजाला जोडणारा एक उघडा पूल आहे. आपण सगळेच जण कुठेतरी आतून भुकेले आहोत, कोणीतरी आपल्याला ऐकावं, कोणीतरी आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी म्हणून. हे जे काहीतरी लिहिलं जातंय, ती प्रत्यक्षात या अथांग अंधारात एकमेकांना शोधण्यासाठी मारलेली एक आर्त हाक आहे. समुद्रात वाट हरवलेल्या जहाजाने जसा प्रकाशाचा कवडसा शोधावा, तसंच काहीसं हे आहे. वाचणारा जेव्हा या अशा लेखनातून जातो, तेव्हा तो त्यातल्या व्याकरणाच्या चुका शोधत बसत नाही. तो त्यात हरवून जातो, कारण त्याला त्या ओबडधोबड शब्दांमध्ये स्वतःचीच कुठेतरी हरवलेली 'मिसिंग लिंक' सापडते. त्याला जाणीव होते की, या अथांग एकलेपणात आपण एकटे नाही आहोत, आपल्यासारखाच दुसरा एक जीव तिथं कुठंतरी बसून आपल्याच वेदनेला शब्द देतो आहे. म्हणूनच म्हणतो, लिहीत राहणं हीच या काळाची सर्वात मोठी बंडखोरी आहे आणि ती टिकून राहिलीच पाहिजे.!🎭
#मनात_येईल_ते
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂