स्वप्नं सुद्धा किती अजब असतं ना..? आपण दिवसा ज्या गोष्टींचा विचार करायलाही घाबरतो, ती स्वप्नं रात्री अगदी सहज जगवून जातात. काल रात्री तू माझ्या स्वप्नात आलीस. नेहमीसारखीच. काहीही न बदललेली. चेहऱ्यावर तोच ओळखीचा सुखावणारा सुसंवाद घेऊन. आपण खूप गप्पा मारल्या. कितीतरी दिवसांचा साठलेला साचलेपणा त्या गप्पांमधून वाहून गेला. मी तुला सांगत होतो, चल, आज मला हवं तिथे गाडी ने. आणि तू..? तू काहीही न विचारता, कसलीही तक्रार न करता, लगेच त्या दिशेने गाडी वळवलीस. त्या प्रवासाला ना कुठलं बंधन होतं, ना वेगाची मर्यादा. फक्त एक निखळ आनंद होता. मस्त वाटलं गं, अगदी आतून रितं आणि हलकं वाटलं.
पण नेहमीप्रमाणे सकाळी गजर वाजला, डोळे उघडले आणि वास्तवाचा सूर्य डोक्यावर आला. सगळं स्वप्न विरून गेलं आणि मागे उरली ती एक अनामिक हुरहुर. सगळ्यात मोठं दुर्दैव कोणतं माहितीये..? हे इतकं सुंदर, अथांग स्वप्न मी तुलाच सांगू शकत नाही. जिच्यासोबत ते जगलो, तिलाच ते सांगता न येणं, यासारखी दुसरी कोणती शोकांतिका नसेल ना गं.
काही नाती अशी असतात, जी शब्दात पकडता येत नाहीत आणि शांततेनं सोडूनही देता येत नाहीत. आपलंही असंच काहीसं झालंय काय गं..? मी हे तुला सांगायला गेलो, तर कदाचित शब्दांचे अर्थ बदलतील. वास्तवाच्या चौकटीत या स्वप्नाला जागा मिळेल की नाही, कोण जाणे..!? भीती वाटते की, हे सांगण्याच्या नादात कधीकाळीच्या आपल्यातल्या त्या सुसंवादाला कुठेतरी गालबोट तर लागणार नाही ना..?
म्हणूनच, हे स्वप्न मी आता माझ्या मनातल्या एका कोपऱ्यात कायमचं कुलूप लावून बंद करतोय. तिथं फक्त तू असशील, मी असेन, तुझ्या हातातील त्या गाडीचं स्टिअरिंग असेल आणि आपण दोघं असू... वास्तवाच्या जगापासून दूर, आपल्या हव्या त्या दिशेला जाणारे. कधी कधी न बोलता जपलेलं मौन हे बोललेल्या हजार शब्दांपेक्षा जास्त श्रीमंत असतं, नाही का..? हे स्वप्न माझं मलाच सुखावत राहील... अगदी माझ्या शेवटापर्यंत.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂