मी जिच्यासाठी कोर्टाची पायरी चढलो, ती कदाचित परत आलीही असती, पण जर तिच्या मनात 'प्रेम' नावाचा एखादा कोपरा जिवंत असता तर ना..! माणसाचं कसं असतं, आपल्याला समोरच्याच्या डोळ्यांत जे पाहायचं असतं, तेच आपण शोधत राहतो. मला तिच्या डोळ्यांत आमचा संसार दिसत होता, आणि ती मात्र फक्त तिथून बाहेर पडायचा रस्ता शोधत होती.
माणसं जोडणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं ही एक कला असते. मी ती कला शिकायला गेलो, पण समोरच्याला चित्रच अर्धवट सोडायचं असेल, तर कॅनव्हासवर रंगांची उधळण करून काय फायदा..? मी आमचं लग्न वाचवण्यासाठी धडपडत होतो. प्रत्येक विखुरलेला धागा पुन्हा एकत्र गुंफायचा प्रयत्न करत होतो. पण तिचा बेत तर बहुतेक लग्नाआधीच ठरला असावा की, एक ना एक दिवस कायमचं माहेरी निघून जायचं, अन् ही पाटी तिने मनात बहुतेक केव्हाचीच कोरून ठेवली होती.
जेव्हा आमचं लग्न जुळलं, तेव्हा ती बोहल्यावर उभी राहिली, पण फक्त एक विधी म्हणून, एक औपचारिकता म्हणून. शरीराने ती तिथे होती, पण मन..? मन कुठल्यातरी वेगळ्याच विचारांच्या गर्तेत अडकलं होतं. आणि मी..? मी तर वेड्यासारखा, 'आता हीच माझं उरलंसुरलं आयुष्य, हीच माझं सर्वस्व' या भावनेने त्या अक्षता अंगावर झेलत होतो. मी तिच्यात माझं जग शोधत होतो आणि ती माझ्या जगात राहूनही स्वतःला परकी समजत होती.
पण शेवटी जे व्हायचं असतं, तेच होतं. आपण नाती कितीही घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी वाळूसारखी ती हातांतून निसटून जातातच. आता मागे वळून पाहताना वाटतं, आपल्यापैकी प्रत्येकाची गोष्ट खरंतर फार आधीच, वर बसलेल्या त्या दिग्दर्शकाने लिहून ठेवलेली असते. आपण फक्त या आयुष्याच्या रंगमंचावर उभे राहतो, आपल्याला मिळालेली स्क्रिप्ट वाचतो आणि आपली भूमिका वठवत राहतो.
या रंगमंचावर कुणाची एन्ट्री कधी व्हायची आणि कुणी कधी एक्झिट घ्यायची, हे सगळं त्या नियतीने आधीच ठरवलेलं असतं. आपण फक्त पडदा उघडण्याची आणि पडणारा पडदा पाहण्याची वाट पाहत राहतो. तिची एक्झिट झाली, हे दुःख आहेच, पण तिची एन्ट्रीच मुळात एका तात्पुरत्या भूमिकेसाठी होती, हे स्वीकारणं जास्त कठीण आहे. पण ठीक आहे, शेवटी #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂 हे असंच असतं. जगण्यासारखं खूप काही असतं, फक्त कोणासाठी तरी थांबायचं नसतं. मीही आता थांबणार नाही, कारण जोवर मी या रंगमंचावर उभा आहे, तोवर पडदा कायमस्वरूपी कधीच पडणार नाही.!🎭