गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

#१६४ ❤️‍🩹🫂

खरं सांगायचं तर कधीकधी वाटतं की, प्रेम वगैरे सगळा भ्रामक प्रकार आहे. माणूस स्वतःच्याच भोवती एक वर्तुळ आखतो आणि त्याला प्रेम नाव देतो. पण त्या वर्तुळात जेव्हा दुसरी व्यक्ती गुदमरू लागते, तेव्हा कळतं की आपण रचलेला हा खेळ किती जीवघेणा आहे. आज मी आरशात पाहतो, तेव्हा मला माझा स्वतःचाच चेहरा अनोळखी वाटतो. ज्या माणसाला मी माझं जग मानलं, ज्याच्या सुखासाठी मी माझ्या अस्तित्वाचे तुकडे केले, त्याच माणसाला आज माझ्या अस्तित्वाचा त्रास होतो आहे. याहून मोठं दुसरं कोणतं दुर्देव असू शकतं..?

माणूस जोडणं सोपं असतं, पण ते टिकवणं एक कला आहे. पण इथे तर मी ती कला जपायला गेलो आणि स्वतःच संपून गेलो. माझं प्रेम इतकं जड आणि असह्य व्हावं, की समोरच्याला त्याचा भार वाटावा..? मी तर फक्त सोबत मागितली होती. मी तर फक्त तिच्या सुख-दुःखात भागीदार होऊ पाहत होतो. पण माझ्या काळजीला जेव्हा हुकूमशाही समजलं गेलं आणि माझ्या वेड्या ओढिला बंधन मानलं गेलं, तेव्हा माझं काळीज फार फार तुटलं.

प्रेम हे अत्तरासारखं हवेत दरवळणारं असावं, असं मला वाटायचं. पण माझं अत्तर समोरच्यासाठी उग्र वास बनून गेलं. मी फोन केला की तिच्या चेहऱ्यावरची रेष बदलते, मी समोर आलो की तिची नजर चुकते. माझ्या शब्दांनी तिच्याशी सुसंवाद होत नाही, तर उलट खटके उडतात. आणि जेव्हा तुमची सर्वात लाडकी व्यक्ती तुमच्यापासून दूर जाण्यासाठी सबबी शोधू लागते ना, तेव्हा समजायचं की तुमचं प्रेम साफ अपयशी ठरलंय.

ऋतू बदलतात तशी माणसं बदलतात हे ऐकून होतो, पण डोळ्यांदेखत अनुभवणं फार कठीण असतं. मी विचार करतोय की, माझी चूक नक्की कुठे झाली..? मी जास्त प्रेम केलं की तिने कधी केलंच नव्हतं..? इथे कोणीच चुकीचं नसतं, फक्त वेळा चुकतात. कदाचित मी तिच्या आयुष्यात अशा वेळी आलो, जेव्हा तिला प्रेमाची नाही तर शांततेची गरज होती. आणि माझ्या प्रेमाने तिची ती शांतताच हिरावून घेतली.

म्हणून आता मी ठरवलंय. मी हळूहळू मागे सरकणार आहे. प्रेमाचा त्रास देण्यापेक्षा, प्रेमापोटी दूर जाणं जास्त प्रामाणिकपणाचं ठरेल. माझी आठवण काढून जर तिच्या चेहऱ्यावर हसू येणार नसेल, तर माझ्या असण्याने तिच्या कपाळावर आट्या तरी का पडाव्यात..? हृदय पोखरत चाललंय हे खरं आहे, पण तिच्या सुखासाठी आता स्वतःला बाजूला सारणं, हेच कदाचित माझ्या एकतर्फी प्रेमाचा शेवटचा आणि खरा आविष्कार असेल.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...